“वाटा वाटा वाटा गं”……..
चाळीतल्या किंवा सोसायटीतल्या गणेशोत्सवाची मजा काही न्यारी नि तशीच मराठीतल्या ‘शब्द एक अर्थ अनेक’ ची गंमतही न्यारीच !😀👇👇👇
वाटा वाटा वाटा गं……..
“आज्जीss, ! दार उघड लवकर !!!”
रोहिनची हाक नि पाठोपाठ दाराची कडीसुध्दा जोरात वाजल्याचा आवाज आला. सोसायटीतल्या सार्वजनिक गणपतीच्या आरत्या म्हणायला सगळी बाल-गोपाळ मंडळी खाली उतरली होती.
“आले रेss बाबा, दोन मिनिटं धीर धर“ म्हणत मी लगबगीनं दार उघडायला उठले.
“काsय ? झाल्या का म्हणून बाप्पाच्या आरत्या ?
झांजा आल्या का तुझ्या वाट्याला ?
आधी हात-पाय -तोंड धुवायचं हं “
“आज्जी, तुला एक गंमत सांगायची आहे, मी आलोच,”
असं म्हणतच रोहिन शिरला बाथरूममध्ये.😊
“अगं ते मंत्र… समथिंग म्हणतात नं“
हात-पाय धुवून झाल्यावर स्वारीची सुरूवात झाली😀
“काय सांगतोयस रोहिssन ?🤔🤔“
“ते नाही काs, ‘ओम यज्ञेन..’ etc म्हणतात, आरत्यांनंतर “
“हां हां, मंत्रपुष्पांजली ! त्याचं काय ??”
“ते म्हणण्याच्या आधी जोशीकाका त्या व्हाॅलेंटिअर्सना, ‘मुलं पहा कशी शिस्तीत आपापल्या गोलात अंतर ठेवून उभी आहेत.
चला चला लवकर, अरे ती फुलं वाटा पटापट’ असं जोरजोरात सांगत होते.“
“हुं ss!! मsग ?”
“तू नाही का परवा म्हणत होतीस की, ‘डोसे करणं इझी आहे पण ते पीठ वाटा, चटणी वाटा, हे करायचा कंटाळा येतो हल्ली’ !
मी कन्फ्यूज झालो की एवढी डेलिकेट नि ब्युटीफुल फुलं वाटा म्हणून का सांगतायत हे ?”
“😀 अरेs *वाटा* चा एक अर्थ ‘डिस्ट्रिब्यूट करा‘ असाही होतो नं 😀”
“नंतरच्या ॲक्शन वरून कळलं मला ते !☺️
नि हेही कळलं की, ‘शब्द एक अर्थ अनेक’ वाली अजून एक गंमतै ही ! देs टाळ्ळी !!👋
हीच गंमत तुला सांगायला मी इगर होतो.“
“रोहिssन, तुला आता मराठी भाषेतल्या गंमती आवडायला लागल्यायत नि note ही करता यायला लागल्यायत बर्रका !”😀
वाटा शब्दाची माझ्या कीचनमधल्या वाटा शी आठवण ठेऊन सांगड घातली पठ्ठ्यानं नि त्याच्या टप्पोरया डोळ्यात तरळलेला त्याबाबतचा आनंद पाहून मी मनोमन सुखावले खरंतर !😊
“आज्जी, पण आत्ता ‘झांजा वाट्याला’ असं काहीतरी म्हटलंस तेs?🤔
वाट्या तर *वाटी* चं plural आहे नं ??”
शब्द असा बरोब्बर पकडतो नं रोहिन😀 की आमच्या ह्या ‘शब्दांच्या खेळात जर्रा म्हणून शब्द खाली पडू देत नाही’ .😛
“अरेs, *वाट्याला* म्हणजे शेअर केल्या का झांजा कुणी तुझ्याबरोबर ? असं विचारत होते”
“ काssय ? शेअर ?? 😲 अजून एक वेगळंच मिनिंग ?”
“ हुंss !! आपल्या झांजा शोधेपर्यंत तुला धीर नव्हता मगाशी म्हणून तस्साच खाली गेलास. झांजांचा नंबर कमी नि मुलांचा नंबर जास्त असला की शेअर कराव्या लागणार नं त्या ?
राईट ?? So ‘आल्या का वाट्याला ?’ असं विचारलं.”😊
“अगं, लेल्या चा फोन होता. ‘रात्री ॲान लाईन Bridge खेळणार का‘ ते विचारायला.
अरेच्चा ! रोहिन तू कधी आलास ? केला नीट नमस्कार बाप्पाला ?” फोनवरचं बोलणं संपल्यामुळे आबाही ‘आजी-नातवाच्या’ संवादात सामिल झाले.
‘घ्याs! रोहिन आल्यानंतर आमचा एवढाs संवाद झाला तरी ह्यांना पत्ताच नाही. एकदा मित्राचा फोन आला की…😏’ मी मनातल्या मनात हे बोलत असतानाच, “मssग, तुम्ही काय सांगितलंत आबा ?“ रोहिननं उत्सुकतेनं विचारलं.
“सकाळी किंवा दुपारी दिवसा खेळणं शक्य आहे. रात्रीचं कसं जमणार ब्वाॅ? आधीच माझ्या झोपेचा प्राॅब्लेम आहे. ‘You carry on ! मला नाही जमायचं. आपल्या वाटा वेगळ्या आहेत’ असं चोख सांगून टाकलं त्याला.”
आबांच्या तोंडून * वाटा * ऐकलं मात्र नि लग्गेच रोहिन माझ्याकडे बघून हळुच हसला.
“तुमचा ‘भाषिक खेळ चाललाय वाटतं !
चालून्दे !! मी जरा बातम्यांचा खेळ बघतो 😊”
आमची नजरानजर चटकन् आबांच्या नजरेनं टिपली नि ते टिव्हीकडे वळले.😀
“ रोहिन, *वाट* चा एक अर्थ रस्ता-मार्ग म्हणजेच ‘way’ असाही होतो. आबा म्हणाले, त्या *वाटा* म्हणजे ह्या वाट चं अनेकवचन !”
“आज्जी, कित्ती वेगवेगळी मिनिंग्ज आहेत गं ! 🤓 इंटरेस्टिंग आहे. आज्जीss….”
रोहिन पुढे काही बोलणार तोच डोअर-बेल वाजली. समोरच्या ब्लाॅकमध्ये रहाणारया वहिनी दारात उभ्या.
“आज्जी, घाईघाईत खाली उतरले नि चावी बरोबर घ्यायला विसरले. तुमच्याकडे ठेवलेली स्पेअर चावी द्या जरा !“
“तुम्हाला कळलं की नाही ? दिक्षितांच्या दोन मुलांमध्ये जोरात वाद चालू आहेत सध्या !“
दार उघडून चावी परत देताना उभ्या उभ्या वहिनींचं गाॅसिप सुरू झालं. मी हळुच मागे वळून पाहिलं तर रोहिन आरत्यांच्या पुस्तकातली चित्र पहाण्यात गर्क होता. बहुतेक ‘वादाची गोष्ट’ रोहिनच्या कानावर पडली नसावी असा अंदाज आल्याने मला ‘हुश्श’ झालं. 😊
“म्हणजेss कारण तसं नेहमीचंच !
‘प्राॅपर्टीतला वाटा !!
चालायचंच म्हणतात नं, घरोघरी…”
असं म्हणत म्हणत वहिनी तर त्यांच्या घरी गेल्या, पण रोहिनच्या कानांनी *वाटा* शब्द बरोब्बर टिपला.
“आज्जी, त्यांनी पण *वाटा* म्हटलं का ? आता ह्याचं काय मिनिंग आहे ?”
“सांगते हं !” म्हणून प्राॅपर्टी आणि त्यातला वाटा हे सगळं (‘वादा’चा भाग वगळून😊) सोप्प्या शब्दात नि थोडक्यात समजावलं रोहिनला.
“रोहिsन, आबांच्या बातम्या संपल्या का बघ बरं ! म्हणजे मी पानं वाढायची तयारी करते.“ पटकन विषय बदलून रोहिनला छोट्टंसं काम दिलं नि मी कीचनकडे वळले.
पण कसचं काय !🤨
“आज्जी, ‘बातम्या संपायला ५ मिनिटं आहेत अजून’ असं म्हणाले आबा. “पण…” आबांचा निरोप घेऊन कीचनमध्ये रोहिन आला खरा परंतु चेहरयावर प्रश्नचिन्ह होतं.🤔
“पण… काय रोहिन “
“तिथे टिव्हीतले काका, ‘वाटाघाटी निष्फळ ठरल्या असं म्हणत होते.
“अरे , *वाटाघाटी* म्हणजे चर्चा किंवा बोलणी”
“ काssय ??😳 अमेझिंग आहे.
पण तू एक गाणं म्हणतेस त्यात किती वेगळं मिनिंग आहे नं आजी ??”
“कोणतं रेss”
“ ते नाही का ..
‘वळत वळत गाडी कशी डोंगरात जातेs
वाटातून घाटातून दिसेनाशी होतेs’
हे तर समजायला इझी आहे. पण * चर्चाss*
म्हणजेss”
“मssग आहेच मुळी….” माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच …
“ ‘आहेच मुळी आमची मराठी तशी
बोलायला भारी नि अर्थाला खाशी’
राईट👍 आज्जी ??”
रोहिनच्या मिश्किल नजरेत,
‘राईट ✅असल्याचा विश्वास ‘ तरळत होता.
तो बघतांना नकळत मी हात मिळवला 🤝 नी, *वाटा* ची चर्चा सुफळ संपूर्ण झाल्याच्या आनंदात पुढच्या तयारीला लागले. 😄
- — लेखन : अनुजा बर्वे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
छान लेख आहे, आपल्या मराठी चे अनेक शब्द विविध अर्थांनी नटलेला आहे 👌👌म्हणी, वाक्प्रचार यांची मजा तर काही औरच आहे.