Thursday, January 23, 2025
Homeसेवाहवा हवाई भाग ३

हवा हवाई भाग ३

चंदीगढ : पहिले पोस्टींग ७२-७३

पहिले पोस्टींग, पहिला पगार, पहिली २०० रुपयांची चाट –पहिली बर्फातून हवाई सफर…….

गुडमॉर्निंग सर, माझ्या कडक सॅल्युटला रिटर्न सॅल्युट देत, स्क्वाड्रन लीडर ओ पी चतुर्वेदींनी माझे चंदिगढच्या नंबर १२ विंगच्या अकाऊंट्स सेक्शनमधे, ‘वेलकम यंग मॅन’, असे म्हणत स्वागत केले व तात्काळ लांब लांब दणकट तिजोरीच्या किल्यांचा एक जड जुडगा हाती देत मला सांगितले, ‘आजपासून तू या किल्या सांभाळायच्यास’! माझ्या बरोबरचे रिपोर्टींगला आलेले कोर्समेट्स सरदारजी गुम्मन व हरालू परतले अन् मी जो कामाला चिकटलो तो चिकटलोच.

सकाळची एयरमनची सेक्शन रिपोर्टींग परेड घेणे, युनिफॉर्म, हेअरकट, शूपॉलिश, लेट कमिंग, सिक रिपोर्ट सर्वाचा अहवाल तयार करून बॉस विंग कमांडर एम पी नायरांना त्वरित देणे, यापासून ते रोजच्या रोज हजारो रुपयांचे पे व अलौन्सेस, टीए क्लेम्स वगैरे रोख पैसै देण्याचे व सर्वात शेवटी त्याचा रोजचा हिशोब नीट लागल्याशिवाय स्ट्रॉंग रुम बंद न करणे वगैरे गुंतागुंतीच्या कामाला जुंपले. काम जोखमीचे, एका नव्या पैशाचा फरक देखील शोधून काढावा लागे. सध्या सारखे कॅलक्युलेटर्स, नोटांचे काऊंटिंग मशीन असे नखरे तेंव्हा नव्हते. प्रत्येक नोटांची शंभराची पुडकी बांधून त्याला रबर बँडने पॅक करताना मला बँकेतील कॅशियरची आठवण येई. नाण्यांच्या २०-२०च्या ढिगांना कागदाच्या सुरळ्यात पॅक करणे म्हणजे एक दिव्य काम होते. हात काळे पडत. कोणीही हाताळलेल्या घाणेरड्या कळकट फाटक्या कुबट वासाच्या नोटांना वागवणे मला अतिशय जिवावर येई. सगळा सेक्शन गेला तरी पैसे टॅली होईपर्यंत हाताखालचे एक-दोन एयरमन व मी पुन्हा पुन्हा नोटा मोजणी करणे, पेड-नॉटपेड व्हाऊचर्सचा घोळ सोडवणे, एखाद्याला जादा पैसे गेले आहेत असा संशय आला तर त्याला परत बोलाऊन पैसे मोजायला लावणे आदी किचकट व जिकिरीची कामे मला रोजचीच झाली.

मेसमधे रोज दुपारच्या जेवणाला उशिरा रुमवर परतलो की आधीच्या राहाणाऱ्यांनी भिंतीवर अति कमी वस्त्रातील ललनांचे उत्तान फोटो लाऊन सजवल्या होत्या, त्यांच्या रूपाचा आस्वाद घेत पडून राहायला लागे. कारण रुममधे आम्ही तीन जणांच्या कॉट्स सोडून फक्त चालत दरवाज्याला जाण्याची जागा शिल्लक उरे.

जुलैची उमसभरी घामाची चिकचिक वाढवणारी गर्मी. रात्रीच्या जेवणाला ऑफिसर्स मेस रुलप्रमाणे पांढऱ्या शर्टपँटवर कंपलसरी टाय होता. नसेल तर सिनियर्स परत पाठवत. मला बारमधे रस नव्हता. कधी कधी मी कोक, लिमका, ऑरेंज सॉफ्ट ड्रिंकची चव घेत भोजनाला जात असे. असे पहिले आठवडे गेले व माझ्या जीवनातील पहिली मंथली पे परेड आली ३१ जुलैला. मी नवा म्हणून माझ्या नेक्स्ट सीनियर – फ्लाईट लेफ्टनंट आर स्वामिनाथन ने ऑफिसर्सच्या पगार वाटपाचे सोपे काम दिले. प्रत्येक अधिकाऱ्याची पगाराची पाकिटे बनवून तयार केली गेली होती. मला फक्त ती त्यांच्या हातात देऊन अॅक्विटन्स रोलवर त्याची पगार मिळाल्याची सही घ्यायची होती. मोठ्या हॉलमधे माझ्या हाताखाली ३-४ एयरमनही होते. नेमक्या त्या दिवशी मला २० रुपयाच्या कोऱ्याकरकरीत शेंदुरी नोटाही ज्यांचा पगाराचे पॅकेट बनवले गेले नसेल त्याला देण्यासाठी वेगळ्या दिल्या होत्या. काही वेळ सर्व सुरळीत चालले होते. मात्र नव्या शेंदुरी रंगाच्या नोटा पाहून प्रत्येकाला त्या हव्याहव्याशा वाटायला लागल्या.

तेवढ्यात एस. ए. ओ.(सिनियर अकाऊंट्स ऑफिसर) विंग कमांडर नायरांना बॉस, एओसीनी (एयर ऑफिसर कमांडिंग) ताबडतोब बोलावले. त्यांच्या जवळ पीक कॅप नव्हती. तेंव्हा सर्वात जवळ ऑफिसर्स मेस म्हणून मला त्यांनी मला रुमवर पिटाळले. मी बॉसची आज्ञा म्हणून धावत पळत पीक कॅप आणून दिली. त्या मधल्या काळात त्यांनी स्वतः जातीने २० रुपयांच्या नोटांचे -पैशाचे व्यवहार केले. ते कॅप घेऊन गेले. मी सर्व काम झाल्यावर उरलेले पैसे मोजत राहिलो. २०० रुपये कमी होत होते! त्या दिवशी मला पहिला पगार मिळाला होता. ४०० रुपये ! खूप शोधाशोध करूनही काही कळले नाही कसे पैसे गेले. शेवटी खिशातून २००रुपये परत सेफमधे ठेवत मी माझा पगार सेलिब्रेट केला! काम किती जोखमीचे आहे. क्षणार्धाचे दुर्लक्ष झाले तर काय अवस्था होते, ते मी पहिल्या फटक्यात अनुभवले.

(फोटोत दिसणारी हीच ती पीक कॅप कॅडेट असताना घेतली होती..!)

पुढेही असे काही वेळा पैसे गमवायचे प्रसंग आले. पण अर्धा पगार गमावण्याचा धसका काही और होता. घरी कळाले तेंव्हापासून आई म्हणे, तुझ्या पगाराचा दिवस आला की अजुनही मला काळजी वाटते. या सगळ्यातून मी वेळात वेळ काढून एम कॉमच्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास करत असे. ते पाहून मित्र म्हणत, ‘बस कर यार. ऐश कर. दारू पी. कसला अभ्यास आणि काय. चल पिक्चर चलते है’ त्यांच्या आग्रहाखातर सिनेमा थेटरात आम्ही पोचत असू. तेंव्हा सेनेतील लोकांना टॅक्स माफ असे म्हणून उण्यापुऱ्या दीड रुपयात बाल्कनीची तिकिटे आरामात मिळत. चंदीगडच्या १७-१८ सेक्टर मधील केसी, नीलम, किरन सिनेमाघरात आवडलेल्या गाण्यांकरता मी पाकिजा, धर्मेंद्र-तनुजाचा – ‘दो चोर’ दोनदा पाहिला. रात्री गोडसर दही व स्टफ्ड पराठे हा ठरलेला मेनू असे. शेवटी ‘मिठी लस्सीदा वड्डा गिलास’ ओठांवरून पुढे सरकला की टाकी फुल्ल ! (अशा पिक्चरची न्यारी सफर आजही आमच्या चर्चेचा विषय बनते ! जेंव्हा एयर कमोडर म्हणून नंतर रिटायर झालेले अनंत महाबळेश्वरकर सर विमाननगरच्या जॉगर्स पार्कमधे भेटतात अन अशाच जुन्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो झालं…!)

एकदा माझी ओळख माधवनगरच्या आमच्या शेजारच्या केळकरांच्या नातेवाईक रमेश जोशीशी झाली. त्यांना एयरमन क्वार्टर न मिळाल्याने ते नवरा-बायको १९ सेक्टरच्या एका आउट हाऊसमधे राहायचे. त्या दोघांना अगत्य दांडगे. ऑफिसर असूनही त्यांच्या आदरातिथ्यात मी रंगून जायचो. हवाईदलातर्फे दरवर्षी साजरे केल्या जाणाऱ्या गणेशचतुर्थीसाठी मराठी नाटकाच्या तालमी त्या वेळी त्यांच्या घराच्या अंगणात होत असत. मला त्यावेळी तालमी पहाण्यात मजा वाटे. मात्र त्यावेळी हे माहित नव्हते की काही वर्षांनी मी ही नाटकात इतका बुडून जाईन !

असेच एक-दोन महिने गेले. ७१ची लढाई नुकतीच सरली होती. लोकांचा सेनेवरील विश्वास द्विगुणित झाला होता. त्या सुमारास चंदीगडला हवाईदलाचा गणपती व महाराष्ट्र मंडळाचा गणेशउत्सव एकत्र होता. त्यांनी मराठी नाटक ठीकठाक बसवले होते. चंदिगढसारख्या पंजाबी मुलखात सेनादलाच्या गणेशपुजेची विसर्जनाची लांबच लांब मिरवणूक मी प्रथम अनुभवत होतो. मोठमोठ्या ट्रकवरून ५० पेक्षा जास्त गणेश मूर्तींची स्थापना झालेल्या गाड्या विविध आर्मी युनिट्सच्या फेटेवाल्या मराठी जवानांच्या समवेत लेझीम-ताशा-हलगीच्या दणदणाटात निघाल्या होत्या. हजारोंच्या संख्येने स्थानिक लोक, प्रामुख्याने सरदारजी बेभान होऊन नाचत होते ! सुखना लेकमधे गणपती बोळवताना लेकचा काठ गुलालाने व गणपती बाप्पामोरया गर्जनेने दणाणून गेला होता.

एक दिवस मला बॉसनी बोलाऊन सांगितले, तुला नंबर ८ विंग आधमपुरला ५० दिवसच्या टीडीवर जावे लागेल. टीडी म्हणजे टेंपररी ड्युटी – ९० दिवसापेक्षा कमी काळासाठी दुसऱ्या स्टेशनवर कामासाठी जाणे. झाले मी गाशा गुंडाळून बसने जालंधरवरून होशियारपुरच्या मार्गावरील आधमपुरला पोहोचलो. तेथील एका अकाऊंट्स आधिकाऱ्याला हॉस्पिटलमधे एडमिट केले होते. तर दुसऱ्याला अर्जंट सुट्टीवर पाठवले होते. तिथे माझे बॉस होते, स्क्वाड्रन लीडर व्ही. एस. (विठोबा शंकर) कोठारे. मी पोहोचल्यानंतर आजारी पडलो. तेथे होती अति थंडी. मी नवखा असल्याचे व थंडी बाधल्याचे त्यांनी ताडले.
ते स्वतः आपल्या घरी घेउन गेले. स्वेटर व रजयांची मोठी गुंडाळी मला मिळाली. पुढे मी बरा झालो. मित्र जे गुप्ता भेटला. नंतर कानपूर व श्रीनगरला असताना आम्ही एक रुम शेअर केली.

एकदा त्यांच्या घरी एका मुलाच्या बर्थ डे पार्टीला त्यांनी मला आवर्जून बोलावले. मजा अशी की त्यांच्या त्याच मुलाच्याबरोबर मी सन ९६-९७ मधे तिसऱ्यांदा श्रीनगरला मेसमधे एकत्र राहात होतो! तो तोवर हवाईदलात एनडीएतून भरती होऊन फ्लाईंग ब्रांचमधे शशांक कोठारे विंग कमांडर रँकवर पोहोचला होता. तोवर त्याचे वडील वारले होते.
कोठाऱ्यांनी काही टिप्स दिल्या. एकदा मला म्हणाले, ‘या एयरमन लोकांवर सर्वस्वी अवलंबून राहू नये. ते केंव्हा तोंडघशी पाडतील नेम नाही’. एकदा मजा झाली. म्हणाले, ‘सेफच्या किल्ल्यासाठी फार जागरुक राहावे. नेहमी लक्षात असू दे की किल्ल्या एक तर सेफ उघडलेली असेल तर त्या सेफलाच लटकवलेल्या हव्यात. सेफबंद केली असेल तर नेहमी त्या आपल्या खिशात हव्यात. दुसरीकडे कुठेही असता कामा नयेत’. असे म्हणत मला सेफची चावी देण्यासाठी त्यांनी आपल्या खिशात हात घातला. शर्ट-पँटचे खिसे चाचपायला चालू केले. पटकन आलोच म्हणून घरी जाऊन किल्ली आणून मला दिली. मग म्हणाले, ‘पहा आधीचा युनिफॉर्म धुवायला टाकताना त्यात किल्ल्या तशाच राहून गेल्या! असं तुझ्या हातून व्हायला नको बरं का’!
ते बोलायचे इंग्रजीत, मात्र बट म्हणायची वेळ आली की हमखास ‘परंतु’ एवढाच शब्द मराठीतून म्हणत. त्यामुळे मजा वाटे. त्यांना काहीतरी आठवून पटकन फोन डायल करायला आवडे. पण रिंग वाजायच्या आत त्यांना आपण कोणाला फोन लावणार होतो त्याचा विसर पडे ! रिंग वाजायला लागली की बऱ्याचदा ते समोरच्याला विचारायचे, ‘कायरे, मी आत्ता कोणाला फोन लावला आहे’? आता समोरच्याला काय माहित ते कोणाला फोन करणार होते ते’!

एकदा एका ऑफिसरनी पैसै हरवल्याने कमी पडायला लागले म्हणून वैतागाने माझ्या टेबलावर पैशाची बॅग फेकली. त्यातील नोटा-नाणी खाली पडली. तो सीनियर. त्यात सरदार. मला उर्मटपणाने म्हणायला लागला, ‘तूच उचल. वादावादी झाली. कोठारे आले. त्यांनी त्याला दम भरला. म्हणाले, ‘तो तर उचलणार नाहीच, पण आता तू बऱ्याबोलाने पैसे उचलून त्याच्या हातात दिले नाहीस तर तुला आत्ताच्या आत्ता सेल (जेल) मधे टाकीन. तो वरमला. मात्र नंतर एका पार्टीत दारू पिऊन मला मागून येउन धडक दिलीन. मारायला धावला. मी त्याच्या पोटात गुद्दे मारुन पाडला. नंतर मात्र तो दोस्त झाला.

साधारण नोव्हेंबर १९७२च्या सुमारास कोठारे सर एकदा मला म्हणाले, ‘काय रे तुला होशियारपुरला यायचे आहे काय ? भृगु संहिता पाहायला ? तेंव्हा मी म्हणालो होतो, ‘छे, मला भविष्य पहाण्यात मुळीच रस नाही’. मात्र त्यानंतर जवळजवळ २३ वर्षानंतर नाडी भविष्यात मला विलक्षण रस निर्माण झाल्यावर होशियारपुरची भृगु संहिता पहायला तांबरमहून मुद्दाम २५०० किमी अंतर काटून जाण्याचा योग आला तेंव्हा त्यांच्या त्या विचारण्याची प्रकर्षाने आठवण झाली. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळ यावी लागते हेच त्यावरून सिद्ध होते.

हेच कोठारे नंतर विंग कमांडर बनून माझे कानपुरात काही काळ बॉस होते. पार्टीत त्यांच्यासारखे ग्रेसफुल डान्स करणारे कपल नव्हते. तासंतास डान्स फ्लोअरवर त्यांची उपस्थिती असे. तरुणपणी या नाचाच्या बळावर त्यांनी विग आडनावाची पंजाबी तरुणी गटवली होती असे ते केंव्हातरी म्हणाले होते. कानपुरात असताना ते आमच्या नाटकांच्या तालमींना अधुन मधुन हजर असत. एकंदरीत चंदिगढला परतल्यावर मी बराच ‘शहाणा’ झालो होतो.…

आता एक किस्सा आठवला की मजा वाटते! मात्र जेंव्हा ते घडत होते तेंव्हा एका पिडली पायलट ऑफिसरची अर्थात माझी चांगलीच बोबडी वळली होती ! ती घटना पुढच्या भागाची उत्सुकता वाढवेल.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन:देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. प्रिय वाचक हो,
    देवेंद्र आणि अलका भुजबळांनी न्यूज स्टोरी टुडे वर माझे हवाईदलातील दिवस आणि किस्से दर शुक्रवारी प्रकाशित करायला प्रोत्साहित केले आहे.
    यातील भाग काही हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. https://alkaoaksebookshoppy.online/
    वर जाऊन ईबुक माध्यमातून वाचायला मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments