Wednesday, July 2, 2025
Homeलेखहवा हवाई : ३५

हवा हवाई : ३५

आठवणीतील “छाया” !

ही स्कूटरची किल्ली आणि ही माझी मुलगी… जा फिरा…!
अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी आठवल्या की अंग शहारते. प्रथम पत्नी छायाने माझ्या एका पत्रातील मजकूरातून लिहिलेल्या संदर्भांना पकडून मुंबई ते नवी दिल्लीपर्यंत रेल्वेने एकटीने पहिल्यांदा प्रवास करून तिथे दुसरी ट्रेन जी फक्त १० मिनिटांच्या फरकाने निघते त्या गाडीत एका हातात मोठी सूटकेस व दुसऱ्या हातात हँडबॅग घेऊन बसून चार तासांचा प्रवास करत अंबाला कँट स्टेशनवर उतरायचे. समोरच्या बसस्टॉपवरून चंदिगडच्या बसमधे चढायचे, वाटेत चंदिगडच्या शहरात ट्रिब्यून सर्कलपाशी उतरून सायकल रिक्षाकरून ऑफिसर्स मेस मध्ये यायचे… हा थ्रिलर प्रवास ती करून येत आहे असे मी मित्रांना फुशारकीत सांगितले तर त्यांनी मला मूर्खात काढले !
‘अरे तू एक शहाणा, ती वेडी, पण तिला तिच्या आईवडिलांनी असे बिनधास्तपणे जा असे म्हटलेच कसे ?’

‘कुठे मुंबई, कुठे दिल्ली, तिथून अंबाला नंतर बसने चंदीगड तिथून सायकल रिक्षाने मेस तिला पहिल्यांदा इतका लांब प्रवास एकटीने प्रथम करवायला तुला फुशारकी वाटते? उद्याच्या उद्या नीघ. हवाईदलाच्या आसाम कुरीयरने दिल्लीला जाऊन तिला नवी दिल्लीला स्टेशनवर घ्यायला जा.’ अशी सज्जड तंबी मित्रांनी दिली !
तसा मी दिल्लीला गेलो. मुंबईहून आलेली अमृतसर जनता एक्स्प्रेस ट्रेन प्लॅटफॉर्मच्या एका बाजूला वेळेवर बरोबर पोचली. याच प्लॅटफॉर्मच्या दुसर्‍या बाजूला नवी दिल्ली ते अमृतसर पश्चिम एक्स्प्रेस पुढच्या दहा मिनिटात सुटायला आधीपासून लागलेली होती.

माझ्या अंदाजाने छाया उतरायच्या तयारीत दरवाज्यात उभी असेल असे होते. म्हणून मी येत्या गाडीला पूर्ण पास होईल अशा बेताने प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला जाऊन उभा होतो. छायासारखा पेहराव असलेली व दुरून तशीच दिसणारी एक व्यक्ती मला दिसताच मी त्या डब्याकडे धावलो. पण ती भलतीच होती ! यात वेळ गेल्याने मी आता पश्चिम एक्स्प्रेसचे डबे वाकून पहात व तोंडाने तिचे नाव मोठं मोठ्याने घेत शोधायला लागलो.
एका डब्यात ती बसलेली दिसली! मी पटकन आत जाऊन तिचे सामान घेऊन तिला पुढे घालून चालत्या गाडीतून खाली उतरवली! ती जर मला दिसली नसती तर काय अनर्थ झाला असता या विचाराने माझी छाती धडधडत होती !

पण तिला मी घ्यायला रेलेवे प्लॅटफॉमवर का आलो याचे आश्चर्य वाटले होते. अंबाल्याला रेल्वेतून उतरून समोरच्या बसस्टॉपवरून चंदिगडच्या बसमधे चढायचे, वाटेत चंदिगडच्या शहरात ट्रिब्यून सर्कलपाशी उतरून सायकलरिक्षाकरून ऑफिसर्स मेस मध्ये यायचे… हे तिला माझ्या पत्रात वाचून माहित होते. एक दिवस काका पु. ना. ओकांच्या ग्रेटर कैलाशच्या घरी राहून रीतसर पुन्हा पश्चिम एक्सप्रेसने प्रवास करून अंबाल्यात उतरून बसने चंदिगडच्या दैनिक ट्रिब्यून सर्कलला उतरून आम्ही सायकल रिक्षाने ऑफिसर्स मेसला पोचलो.

त्या नंतरचा आमचा २ आठवडे काळ आनंदाचा होता. ती आल्याच्या दुसर्‍या रविवारी आम्ही पिंजोर गार्डन पहायला स्कूटरवरून गेलो होतो. तेंव्हा तिथून परतताना रात्री आठच्या सुमारास अंधारातून जाणाऱ्या म्हशींचा धक्का स्कूटरला बसल्याने तोल जाऊन तिच्या डोक्याला मार लागून ती मला सोडून गेली…!  ती तारीख होती ११ जुलै १९७६ ची गुरूपौर्णिमा…
त्यानंतर छाया परत कधीच भेटली नाही. काळाच्या ओघात घाव भरले. मी सावरलो. पुन्हा डाव मांडला. पण तिच्या आई-वडिलांना तिची क्षती जाणवत होती. मात्र अलकाने त्यांना आपलेसे केले. तिच्या भावांना बहीण मिळाली. आजही आमचे प्रेमभावाचे संबंध आहेत…

असे अनेक प्रसंग आठवून मनाला चटका लावून जातात तर त्यातील थ्रिल आजही धक्कादायक वाटते. हे सर्व घडायला माझी हवाई दलातील कारकीर्द कारणभूत होती. त्या शिवाय असे रोमांचकारी अनुभव कसे मिळाले असते ?
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. विंग कमांडर शशिकांत ओक सर,

    आपण लिहिलेला हवा हवाई – भाग ३५ हा केवळ एक संस्मरण नाही, तर प्रेम, धैर्य, साहस, आणि शोक यांची एक हळूवार गुंफण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४