‘मड व्होल्क्यानो‘
नमस्कार मंडळी.
आपण “अंदमानची सफर” ह्या लेखमालेचा पहिला भाग २५ ऑक्टोबर २०२४ रोजी वाचला असेलच. परंतु या लेखमालेत खंड पडला म्हणून आज पुनश्च वाचू या लेखमालेतील पहिला भाग.
– संपादक
मातीचा ज्वालामुखी, बाराटांग, अंदमान
‘ज्वालामुखी’ पृथ्वीवरील निसर्गनिर्मित आपत्ती आहे. ज्यामुळे पृथ्वीच्या भूपृष्ठावर होणाऱ्या ज्वालामुखीतून उष्ण लाव्हारस, ज्वालाग्राही राख आणि विषारी वायू बाहेर पडतात. ज्वालामुखी काय असते हे आपण सिनेमात, टीव्हीवर पाहिलेले असते किंवा त्याविषयी वाचलेले असते परंतु ‘मातीचा ज्वालामुखी’ याबद्दलची सर्वसाधारणपणे प्रत्येक माणसाला माहिती असायची शक्यता कमीच आहे म्हणून या लेखाची निर्मिती केली आहे.
जगातील बेचाळीस भौगोलिक प्रदेशात दोन हजार पाचशे आठ मातीचे ज्वालामुखी आहेत. जागतिक स्तरावर महत्त्वाचे असलेले ‘मड व्होल्क्यानो’ (Mud Volcano) हे ठिकाण भारतातील केंद्रशासित प्रदेश अंदमान बेटावर आहे.
अंदमानची राजधानी
श्री विजयपुरम (जुने नाव पोर्ट ब्लेअर) इथे विमान व बोटीने उतरल्यावर साधारण शंभर किलोमीटरवर अंतरावर ‘मड व्होल्क्यानो’ हे ठिकाण आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणच्या मूळ आदिवासींच्या जंगलातून पुढे वाटचाल करावी लागते. ‘जरावाज (Jarawas) ट्रायबल रिझर्व्ह’मधून प्रवास करण्यासाठी भारतीयांना आपले आधार कार्ड आणि परदेशस्थ नागरिकांना आपले पासपोर्ट दाखवून चेक पोस्टवर रितसर नोंदणी करून पुढे जावे लागते. त्यानंतर पंधरा-वीस मिनिटांचा प्रवास करून बाराटांग जेटीपर्यंत समुद्रमार्गे पोहोचावे लागते. त्यानंतर वीस-तीस मिनिटे बसचा किंवा दहा मिनिटे गाडीचा प्रवास पार करून या ठिकाणी पोहोचता येते. म्हणजे ‘श्री विजयपुरम’ ते ‘मड व्होल्क्यानो’ या प्रवासास साधारण साडेतीन ते चार तास लागतात. रस्त्यावरून या चिखलाच्या ज्वालामुखीपर्यंत पोहोचण्यासाठी खडकाळ, मातीच्या वाटेवरून आणखी साधारण दीडशे मीटर चालावे लागते. झाडांच्या मुळांमध्ये माती अडकून नैसर्गिक पायवाट तयार झालेली आहे, ज्याला उत्कृष्ट लाकडाचे कुंपण वापरून ते अधिक आकर्षक बनवलेले आहे. आजपासचे दाट जंगल आणि त्या जंगलातील पक्षी पाहात आपण पुढे जाऊ शकतो. त्या पक्षांचा किलबिलाट मनाला भावणारा आहे.
आम्ही गेलो तेव्हा पाऊस पडून गेलेला होता आणि सूर्याच्या किरणांनी झाडाचे प्रत्येक पान चमकत होते, तो नजारा अनुभवत आम्ही पुढे वाटचाल केली. या वाटेवर एक सुंदर अशी लाकडाची झोपडी बनवलेली आहे ज्याला लाकडी पायऱ्या आहेत आणि ही झोपडी झावळ्यांनी साकारलेली आहे. त्याच्या आत बसण्यासाठी लाकडी बैठकीची सोयसुद्धा केलेली आहे. फोटोग्राफीचे वेड असणाऱ्यांसाठी हे क्षणभर विश्रांती घेत फोटो काढण्यासाठीचे उत्तम ठिकाण आहे.
‘मड व्होल्क्यानो’ हे छोटे चिखलाचे खड्डे भूगर्भातील सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाने उत्सर्जित होणाऱ्या नैसर्गिक वायूंद्वारे तयार केले जातात, जे चिखल वरच्या दिशेने ढकलतात. अधिक विस्ताराने सांगायचे म्हणजे हा मड व्होल्कॅनो संपूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियांनी तयार झालेला असून, जमिनीखाली खोलवर अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक वायूंच्या दबावामुळे हा व्होल्कॅनो सक्रीय होतो. यातील वायू जमिनीखाली दबलेल्या जैविक पदार्थांच्या सडण्याच्या प्रक्रियेमुळे तयार होतात. या वायूंच्या जमिनीच्या आतील दबावामुळे त्या ठिकाणची माती वर ढकलली जाते. त्या ठिकाणी छोटी मोठी विवरे म्हणजे गोलाकार खड्डे तयार होतात. जमिनीच्या वर ही माती येताना बुळुकबुळुक असा विशिष्ट आवाजही ऐकू येतो. माती किंवा चिखल हा ओले असते आणि बाहेर आल्यावर ते तिथेच पडून सुकून कडक होते. हे आश्चर्यकारक दृश्य नाही, कारण बहुतेक वेळा फक्त वाळलेल्या किंवा चिखलाच्या लहान बुडबुड्यांचा ढीग पाहायला मिळतो. पावसाळ्यात मात्र माती इकडे तिकडे पसरते. ‘अंदमान’ हे जगातील काही ठिकाणांपैकी एक आहे जिथे हे मातीचे हे ज्वालामुखी आढळतात.
अंदमान बेटांच्या समूहामध्ये अकरा मातीचे ज्वालामुखी आढळून आले आहेत, त्यापैकी आठ बाराटांग आणि मध्य अंदमानमध्ये आहेत. इतर तीन उत्तर अंदमानमध्ये सापडतात. चिखल किंवा ओली माती बाहेर टाकल्या जाणाऱ्या या मड व्होल्कॅनोला अंदमानातील स्थानिक लोक ‘जाल्की’ वा ‘ ‘जलकी’ असे संबोधतात. ज्वालामुखीची राख ही बारीक वाळू (सिलिकॉन) सारखीच असते आणि ती माणसाची नैसर्गिक त्वचा शुद्ध करणारी असते. सल्फर, मॅग्नेशियम आणि झिंक यांसारख्या खनिजांमध्ये समृद्ध आहेच शिवाय ती त्वचेचे मृत बाह्य स्तर काढून टाकते आणि त्वचा स्वच्छ करते. जस्त जळजळ बरे करण्यास मदत करते.
कधीतरी मड व्होल्क्यानोतून मोठ्या प्रमाणात ‘मिथेन’ वायू बाहेर पडतो. या ज्वलनशील वायू पेट घेऊ शकतो त्याने जंगलात आग पसरू शकते.
या ‘मड व्होक्यानो’ ची अधिक चांगली कल्पना यावी, यासाठी आपण पुढील लिंक वर क्लिक करून तो पाहू शकता.
निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी अंदमानातील या ‘मड व्होक्यानो’ला भेट द्यायला विसरू नका !
क्रमशः
— लेखन : प्रतिभा सराफ. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800