Thursday, November 21, 2024
Homeपर्यटनअंदमानची सफर : ५

अंदमानची सफर : ५

लक्ष्मणपूर किनारा

शहीद द्वीप (जुने नाव नील आयलँड) या बेटावर साधारण सहा किलोमीटर लांबीचा राधानगर किनारा आहे. याचे नाव लक्ष्मणपूर किनारा असेही आहे. ‘लक्ष्मणपूर समुद्रकिनारा – दोन’ या भागाला भेट देण्यासाठी आम्ही सकाळी पाच वाजता इथे पोहोचलो याचे कारण जेव्हा समुद्राला ओहोटी असते तेव्हाच आपल्याला इथे जाता येते. आपण जेव्हा या भागाला भेट देण्यासाठी जाल तेव्हा भरती ओहोटीच्या वेळा नक्की पाहून जा म्हणजे निराशा पदरी पडणार नाही.

इथे आपण ‘कोरल वॉक’ म्हणजेच चक्क मृत झालेल्या प्रवाळांवरून चालत जातो. साधारण अर्धा किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे ज्यावरून चालण्यासाठी आपल्याला उत्तम प्रकारची पादत्राणे सोबत असण्याची गरज आहे. उंच- सखल भाग आणि खडकांमधून अधेमधे साचलेले पाणी आहे. शिवाय असंख्य प्रकारचे जलचर आणि सरपटणारे प्राणी, किडे -कीटक त्या भागात आहेत. खेकडे आणि विंचू यांच्यापासून खास सावधगिरी बाळगावी लागते. काही अंतर चालल्यावर आपल्याला आश्चर्यकारक नैसर्गिक पूल (कोरल ब्रिज निर्मिती) पाहायला मिळतो. अंदमान सहलीच्या जाहिरातींमध्ये तसेच सिनेमांमध्ये आपण हा पूल पाहिलेला असतो. त्याच्यासमोर फोटो काढणे ही आपली सहलीतील महत्त्वाची आठवण असते.

मृत प्रवाळांविषयी जाणून घेण्यासाठी तसेच जैवविविधतेचे निरीक्षण करण्यासाठी म्हणून मार्गदर्शक सोबत असण्याची आवश्यकता आहे, जो स्थानिक मार्गदर्शक आम्हाला मिळाला त्याने आम्हाला योग्य प्रकारे माहिती दिली.
आपण या समुद्राच्या किनाऱ्यावरील खडकाळ वाटेवर चालत असताना जी जैवविविधता दिसते, जी आपल्याला सामान्यतः स्नॉर्केल/स्कुबा डायव्हिंग करताना दिसते. जिवंत कोरल रीफ दिसतात. कोरल रीफ  म्हणजे शेकडो ते हजारो लहान वैयक्तिक कोरलच्या वसाहतींनी बनलेले असतात, ज्याला पॉलीप्स म्हणतात . कोरल रीफ विविध प्रकारचे स्पंज, ऑयस्टर, क्लॅम, खेकडे, समुद्री तारे, समुद्री अर्चिन आणि माशांच्या अनेक प्रजातींसह विविध प्रकारच्या सागरी जीवांचे सुरक्षितपणे राहण्याचे ठिकाण आहे. हाडांची शस्त्रक्रियेसाठी सर्जनद्वारे कोरलचा वापर केला जातो. हे कॅल्शियम पूरक म्हणून, कर्करोगासाठी, हृदयरोगासाठी आणि इतर परिस्थितींसाठी देखील वापरले जाते, असे काहीसे वाचनात आले.

या समुद्रकिनाऱ्यावर काही ‘ब्रेन कोरल’ पाहायला मिळाले त्यांचा आकार साधारण लांबट गोलसर असून आपल्या मेंदूवर जशा घड्या असतात तशा काहीशा दिसून आल्या. हे प्रवाळ खडकांचा पाया मजबूत करतात. येथे असलेल्या ब्रेन कोरल हे साधारण चॉकलेटी रंगाचे होते. प्रवाळ खडक वादळाच्या घटनांदरम्यान ९७ टक्के लहरी ऊर्जा शोषून घेऊ शकतात आणि या कार्यात प्रवाळ महत्त्वाची भूमिका बजावतात.

‘मधमाश्याचे प्रवाळ’ इत्यादीसारखे अनेक आकार आणि रंगांचे प्रवाळ इथे पाहायला मिळाले. ‘खाद्य कोरल’ हे सुद्धा या किनाऱ्यावर आहेत जे आपण चक्क खाऊ शकता !
समुद्री काकडी, समुद्री अर्चिन, विविध प्रकारचे शंख (शंख) त्यात जिवंत गोगलगाय, काही मृत कोरल, राक्षस क्लॅम (जे तुम्ही स्पर्श करता तेव्हा बंद होतात), मोलस्क, विविध प्रकारचे, आकार आणि रंगांचे मासे, निमो मासे (विदूषक मासे) इथे पाहायला मिळले. काही रंगीबेरंगी गोष्टी ज्या स्पर्श केल्यावर परत येतात. या सर्व गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आणि जैवविविधतेबद्दल जाणून घेण्यासाठी, एका मार्गदर्शकाला सोबत घेऊनच वाटचाल करा नाहीतर या लहानसहान पण महत्त्वाच्या अनेक गोष्टी आपल्याला कळणारच नाहीत !

समुद्रकिनाऱ्यावरचे रंगीबेरंगी जग म्हणजेच ही जैवविविधता पाहण्यास सुरुवात केली आणि आपण अर्धवट झोपेत मध्यरात्री इथे आलेलो आहोत हे विसरूनच गेलो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृपया कोणत्याही प्रवाळाला स्पर्श करू नका कारण यामुळे ते मरतात, या आमच्या मार्गदर्शकाच्या सूचनांचे आम्ही काटेकोरपणे पालन केले.

अंदमानमधील इतर समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे, येथे तुम्हाला चहा, अल्पोपहार, नारळ पाणी इत्यादी विकणारे काही छोटे विक्रेते आहेत. सूर्योदय वा सूर्यास्ताचा आनंद घेता येईल अशा वेळेस इथे येऊ शकता, फक्त भरती ओहोटीच्या वेळा जाणून घ्या.
शहीद द्वीप या बेटावर खरेदी करा. हे सर्वात वाजवी ठिकाण आहे कारण सर्व इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा स्वस्त आहे. शंख शिंपल्यांच्या पर्स, कानातल्या अंगठ्या, नेकलेस, शोपीस, की- चेन, टी-शर्ट्स इथे अगदी वाजवी दरात मिळतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्ही इथे खरेदी केली.

लक्ष्मणपूर किनारा – दोन ‘नैसर्गिक कमान पुलां’ साठी किंवा हावडा ब्रिजसाठी ओळखला जातो, तो मुळातून जाणून घेण्यासाठी आपण या किनाऱ्याला जरूर भेट द्या. समुद्राच्या ओहोटीच्या वेळी किनाऱ्यावर प्रवाळ आणि सागरी जीवांचे विपुल प्रमाणात दर्शन पर्यटकांमध्ये लोकप्रिय का आहे हे प्रत्यक्ष अनुभवले !
हा किनारा, तेथील परिस्थिती आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

क्रमशः

— लेखन : प्रतिभा सराफ. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. अंदमानच्या सफरीतला लक्ष्मण किनारा सुंदर तर्‍हेने शब्दांकित केला आहे.विविध प्रवाळांची मनोरंजक माहिती वाचायला मिळाली.
    मस्तच अंदमानची सफर.
    -राधिका भांडारकर,पुणे.

    मनापासून धन्यवाद राधिकाताई🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments