Wednesday, December 18, 2024
Homeपर्यटनअंदमानची सफर - ८

अंदमानची सफर – ८

एलिफंट बीच (Elephant Beach)  हे अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये स्थित स्वराज द्विप (जुने नाव Havelock Island) बेटातील एक लोकप्रिय बीचचे ठिकाण आहे. हे आश्चर्यकारक प्रवाळ खडक, समृद्ध सागरी जीवन आणि जलक्रीडा उपक्रमासाठी मुख्यत्वे प्रसिद्ध आहे.

एलिफंट बीचवर जाण्यासाठी तुम्हाला ‘हॅवलॉक क्रूझ’ जेट्टी (पोर्ट) वरून स्पीड बोट मिळते किंवा जुगल ट्रेक हा एलिफंट बीचवर जाण्याचा आणखी एक मार्ग आहे. हॅवलॉक जेट्टीवरून लहान क्रूझ बोटीने सुमारे ४० मिनिटांत एलिफंट बीचवर पोहोचता येते. रस्त्याने जेट्टीपासून राधानगरच्या बाजूने आठ किमी अंतरावर असलेल्या फॉरेस्ट कॅम्पपर्यंत आणि तेथून चालत एलिफंट बीचवर जाता येते. त्यामुळे आम्ही पहिला पर्याय निवडला. स्पीड बोटीतून समुद्रातून प्रवास करताना समुद्राच्या पाण्यावर जणू नक्षी काढत उडणाऱ्या पाण्याचा अनुभव घेतला.

एलिफंट बीच पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे कारण म्हणजे त्याचे अस्पर्शित नैसर्गिक सौंदर्य! समुद्रकिनारा मऊ, पांढऱ्या वाळूने जणू सजवलेला आहे असा भासतो. अंदमान समुद्राच्या निळ्याशार पाण्याचे काय वर्णन करावे ? ती तर प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. सभोवतालची हिरवीगार निसर्गरम्य असा रमणीय भूप्रदेश या सौंदर्यात आणखी भर घालतो ज्यामुळे इथे विश्रांतीसाठी तसेच फोटोग्राफीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक नियमित येतात.

‘एलिफंट बीच’ अंदमान हे सागरी जीवनाच्या समृद्ध वैविध्यतेचे माहेरघर आहे. येथील रंगीबेरंगी प्रवाळ खडक रंगीबेरंगी मासे आणि इतर समुद्री जीवांनी भरलेले आहेत, ज्यामुळे ते स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथील पाणी स्पटिकासम स्वच्छ असल्यामुळे समुद्राच्या आतील सर्व स्पष्ट दिसते.

एलिफंट बीच वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंग, सी वॉकिंग, कयाकिंग आणि जेट स्कीइंग, ग्लास बॉटम बोट राईड, स्पीड बोट, बनाना आणि सोफा बोट राईड इ. जलक्रीडा उपक्रम उपलब्ध आहेत. ‘स्नॉर्कलिंग’ हा प्रत्येक पर्यटकांसाठी मोफत दिला जाणारा उपक्रम आहे परंतु यासाठी पर्यटकाचे वय आठपेक्षा जास्त आणि साठ वर्षांपेक्षा कमी असावे लागते.

‘ग्लास बॉटम बोट राईड’ हा पूर्ण ग्रुपने एकत्रितपणे करण्याजोगा उपक्रम होता जो आम्ही केला. बोटीच्या तळाचा भाग हा काचेचा असतो त्यामुळे अगदी समुद्रकिनाऱ्यापासून आत पुढे जाताना प्रवासात आपल्याला अनेक माशांच्या प्रजाती तसेच प्रवाळांचे अनेक आकार आणि रंग पाहायला मिळाले. स्नॉर्कलिंग करताना अगदी किनाऱ्याजवळ एक मीटर इतक्या कमी उंचीच्या पाण्यातसुद्धा प्रवाळ आणि मासे पाहायला मिळाले. या समुद्रकिनाऱ्यावर काही अंतरापर्यंत उथळ पाणी असल्यामुळे पोहण्याचाही आनंद भरपूर घेता आला. शिवाय मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तिथे उपस्थित होते त्यामुळे सुरक्षितता वाटत होती.

एलिफंट बीचवर खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स उपलब्ध होते तिथे व्हेज, नॉनव्हेज असे अनेक पर्याय होते याशिवाय चेंजिंग रूम, वॉशरूम्स यासोबत पर्यटकांना विश्रांती मिळावी यासाठी व्यवस्थित शेड असणारे लाकडी बेंचेसचे छोटेखानी आकर्षक अशी निवासस्थाने बनवलेली आहेत. अनेक प्रकारचे शंख शिंपल्यांचे दागिने आपण स्थानिक विक्रेत्यांकडून आपण खरेदी करू शकता.

एलिफंट बीचला पर्यावरणीय आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. समुद्रकिनाऱ्याचे नाव हत्तींच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. एकेकाळी हे हत्ती बेटावर वृक्षतोड करण्यासाठी वापरले जात होते. अधूनमधून पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याजवळ हत्ती दिसतात आणि कधी कधी ते या पाण्यामध्ये मनसोक्त डुंबतातही !

एलिफंट बीच हे नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधतेचे प्रतीक आहे. जगभरातील पर्यटकांना त्यामुळेच त्याचे आकर्षण आहे. पर्यटनाद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेत मोलाची भर पडते, याचीही पर्यटकांनेही जाण ठेवावी !
क्रमशः

— लेखन : प्रतिभा सराफ. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. अंदमान समुद्राच्या निळ्याशार पाण्याचे काय वर्णन करावे?
    ती तर प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे असं लेखिका प्रतिभा सराफ म्हणतायत ते अगदी खरं आहे.
    ताई आपली अंदमान लेख मालिका प्रत्येक लेखातून मला
    पुन्हा पुन्हा अंदमानला घेऊन जात आहे.पुनःप्रत्ययाचा आनंद देत आहे. सेल्युलर जेलची सफर घडवून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं दिव्य दर्शन घडवत आहे.
    प्रतिभाताई आपल्यातल्या उत्तुंग प्रतिभेला मनापासून सलाम
    राजेंद्र वाणी
    दहिसर मुंबई

  2. प्रतिभाताईंचा एलिफंट बीचचा अनुभव खूप छान आहे.
    वाचकाला तिथे जाऊन या अनुभवाचा पुनर्प्रत्यय घ्यावा असा मोह नाही झाला तरच नवल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Purnima anand shende on निसर्गोपचार : ३
Manisha Shekhar Tamhane on निसर्गोपचार : ३