महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात कार्यरत असताना, विशेषतः मंत्रालयात माझी नेमणूक असताना मंत्रालयात कामे, बैठका अशा विविध कारणांमुळे गावोगावीच्या समाज बांधवांच्या माझ्याशी भेटी होत.
अशीच एका समाज बांधवाशी झालेली माझी भेट आधी ओळखीत आणि नंतर मैत्रीत बदलल्या गेली, ते म्हणजे अजितकुमार सासवडे होत.
विशेष म्हणजे, ते जेव्हा जेव्हा मंत्रालयात त्यांच्या कामानिमित्त, बैठकांसाठी येत तेंव्हा तेंव्हा सहज म्हणूनच मला भेटत असत. कुठल्याही योग्य/अयोग्य कामांसाठी त्यांनी माझ्याकडे कधीच शब्द टाकला नाही किंवा अमुक तमुक करा म्हणून कधी गळ घातली नाही.
अशा या आपल्या मित्राची नुकतीच वरिष्ठ अधिकारी पदावर पदोन्नती झाली. या बद्दल त्यांचे अभिनंदन करून जाणून घेऊ या, त्यांची जीवन कहाणी…
अजितकुमार राजाभाऊ सासवडे यांचा जन्म 20 जानेवारी 1966 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण सन 1975 ते 1981 पर्यंत गुरुकुल दे. कु. विद्यालय, कुंथलगिरी येथे झाले. त्यानंतर त्यांनी आयटीआय मधून ऑटोमोबाईल कोर्स केला.
आयटीआय च्या कोर्समुळे त्यांना 1985 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा परिवहन विभागात औरंगाबाद येथे नोकरी लागली. या नोकरीत ते 1992 पर्यंत होते.
सरकारी नोकरीं लागली म्हणून अजितकुमार स्वस्थ बसले नाहीत. या नोकरी दरम्यान त्यांनी औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयातून 1988 साली बी ए ची पदवी विशेष प्राविण्या सह संपादन केली. 1990 साली ते माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज मधून एल एल बी च्या परीक्षेत मेरीट मध्ये पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तर तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात त्यांनी गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक तर एम फील च्या परीक्षेत गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला.
उच्च शैक्षणिक पात्रता ग्रहण केल्यानंतर अजितकुमार राज्यशास्त्र प्राध्यापक म्हणून खुलताबाद येथील
चित्सिया वरिष्ठ महाविद्यालयात 1993-94 मध्ये रुजू झाले.
पुढे त्यांची 1995 मध्ये त्यांची निवड विधी सहायक, विधी व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई – शाखा खंडपीठ औरंगाबाद म्हणून झाली. या सेवेत ते 1999 पर्यंत राहिले.
या ही नोकरीत समाधान न मानता अजितकुमार सातत्याने स्पर्धा परीक्षा देत राहिले. या कष्टाचे फळ मिळून ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत यशस्वी झाले. त्यांची 1996 साली सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था गट ब या पदासाठी निवड झाली. तेव्हापासून त्यांनी कधी मागे वळून बघितलंच नाही.
अजितकुमार यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागात फेब्रुवारी 1999 पासून
पुणे, सातारा, नागपूर, औरंगाबाद जालना, मुंबई, ठाणे इत्यादी ठिकाणी उल्लेखनीय सेवा बजावली.
नुकत्याच मिळालेल्या पदोन्नतीनंतर त्यांची नियुक्ती प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग मुंबई गट अ पदावर झाली आहे कोकण, मुंबई, नाशिक असे तीन महसूल विभाग (14 जिल्हे) असे त्यांचे मोठे कार्यक्षेत्र आहे.

अजितकुमार यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात प्रामुख्याने सन 1999 -2000 साली उत्तमचंद ठोळे जैन छात्रालय, औरंगाबाद यांचेकडून सन्मानपत्र, माननीय जिल्हा न्यायाधीश तथा सहसचिव विधी व न्याय विभाग, औरंगाबाद यांच्याकडून सन 1996 व 1997 मध्ये उत्कृष्ट कामाचे प्रमाणपत्र, ध्वजनिधी संकलना बाबत डिसेंबर 2005 मध्ये तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या हस्ते सन्मान, अति उत्कृष्ट सेवेबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाकडून ऑक्टोबर 2006 पासून दोन आगाऊ वेतनवाढी, 23 सप्टेंबर 2019 रोजी
कुंथलगिरी शाळेत गुरुकुल भूषण पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
खरं म्हणजे अजितकुमार यांचं सर्व कुटुंबच उच्च विद्याविभूषित आहे. त्यांचे वडील स्व. राजाभाऊ आबाराव सासवडे हे बीएस्सी आणि गणित विषयात एम एड झालेले होते. ते लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात प्राचार्य होते. थोरली बहीण कोमल यांनी समाजशास्त्र विषयात एम ए केले आहे. थोरले बंधू सुधीर, शाखा अभियंता म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागातुन निवृत्त झाले आहेत. लहान बंधू मुनिराज हे बेंगलोर येथील अत्यन्त प्रतिष्ठित अशा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेत फौंडेशन कोर्सचे प्राध्यापक व विभाग प्रमुख आहेत. तर सर्वात धाकटे बंधू डॉ मनोज हे एम एस असून औरंगाबाद येथे नेत्र तज्ञ आहेत. अजितकुमार यांच्या पत्नीही एम ए, एल एल बी आहेत. मुलगा राज्यशास्त्र घेऊन बी ए झाला असून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.

अजितकुमार यांनी केवळ पुस्तकी शिक्षणच घेतलं नाही तर त्यांनी वक्तृत्व स्पर्धा, नाट्य अभिनय, यातही नेहमी हिरीरीने सहभाग घेतला. इतकंच नाही तर ते उत्कृष्ट मल्लखांबपटू देखील राहिले आहेत, हे विशेष !
अजितकुमार यांची जीवन कहाणी पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की त्यांनी झालं तेवढ्या शिक्षणावर आणि मिळालेल्या, त्यातही सरकारी नोकरी वर समाधान न मानता उच्च शिक्षण, उच्च पद असं ध्येय ठरवलं आणि ते प्रयत्नपूर्वक साध्य केलं .
अजितकुमार यांच्या यशाचं हेच गमक आजच्या युवकांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर त्यांचंही यश निश्चितच आहे.
अजितकुमार यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐
– देवेंद्र भुजबळ. 9869484800