शुद्ध हरपतेय तिची
श्वास कोंडलाय
जीव गुदमरतोय
खोल खोल काळ्या गर्तेत
कोणी लोटलंय तिला
काळ्या गहिऱ्या
थारोळ्यात बुडत
जातेय ती
पीचतेय, संपून जातेय
तिरमिरीत उठून
जायचंय तिला
मरण कवटाळयाला..
इतके सोपे असते का ते ?
का जगणं
सुंदर असतं?
प्रसंग अतिरंजित करताहेत ते.
सर्वांची बोटे रोखली
गेली आहेत तिच्याच वर
उठताना ही
तीव्र वेदना शरीरभर
पसरून जातेय
दुःख उत्कट असते का ?
का जीवनाची असोशी?
कानांत ओतलाय त्यांनी
जणू लाव्ह्याचा रस
तरीही तिला ऐकू येतोय
बाळाचा टाहो
तिच्या स्त्रीत्वाचा हुंकार
चाचपडत उठतेय
बाळ रडतंय
धडपडत जातेय
बाळापाशी
त्याचे इवले इवले हात
ओठ लुचताहेत तिला
ती शांत शांत पहुडलीय
जिवंत का मृत ?
— रचना : सौ.स्वाती वर्तक. खार. मुंबई
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800