Sunday, July 13, 2025
Homeलेखअथर्वशीर्ष : अभिनव उपक्रम

अथर्वशीर्ष : अभिनव उपक्रम

भारतीय तत्त्वज्ञान हे आनंदाचे तत्त्वज्ञान असून संपूर्ण जीवन प्रवास शांत चित्ताने करीत आनंदाचा वेध घ्यायला प्रवृत्त करणारे आहे. धर्म अर्थ, काम व मोक्ष या चारहींचा उचित स्विकार भारतीय वैदिक, औषनैषदिक तत्त्वज्ञानाने केलेला आहे.

सध्याच्या काळाचा विचार केला तर या चतुर्विध पुरुषार्थांपैकी फक्त मधल्या दोनच पुरुषार्थाचा विचार सर्वत्र रुजत चालला आहे असे चित्र आहे. पण शांती, समाधन, तृप्ती व निरपेक्ष आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर धर्म व मोक्षाच्या चौकटीत अर्थ व काम यांचा समावेश आवश्यक आहे. आणि म्हणूनच सकल कारणासह दुःखानिवृत्ती व शाश्वत आनंदांची प्राप्ती करून घ्यायची असेल तर बालवयापासूनच या तत्वज्ञानाची कास धरायला हवी.
आपल्या संस्कृतीने दिलेला हा अक्षय ठेवा पुढच्या पिढीच्या हातात सुपूर्त करायलाच हवा या अंतः प्रेरणेने या लिखाणाला सुरुवात केली आहे.

तरूण पिढीच्या भाषेत त्यांना समजावून सांगता यावे म्हणून संवादात्मक शैलीचा स्विकार या उपक्रमास केला आहे.

समानशीलेषु सख्यम्‘ असे म्हणतात ते अगदीच खरे आहे. कारण मी या लेखनाला सुरूवात ज्या अन्तःप्रेरणेतून केली त्याच अन्तःप्रेरणेतून सिंगापूर निवासी नीला बर्वे या अभिवाचनासाठी उद्युक्त झाल्या. मोबाईल इत्यादी साधनांवर वाचायला त्रास होणाऱ्यांपासून फक्त ऐकायचीच आवड असणाऱ्या प्रत्येकापर्यंत हा आनंदाचा ठेवा पोहोचलाच पाहिजे या तळमळीतून त्या हे काम करीत आहेत. हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून त्या प्रयत्नरत आहेत.

नीला बर्वे 

या लेखातील विचार हे माझे श्रीगुरु प. पू. डॉ. श्री. द. देशमुख यांचे आहेत. माझे लेख वाचून जर कोणी वाचक प्रभावित झाला व प.पू. डाॅ. श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या मूळ वाङ्ममयाकडे वळला तर त्याचे पूर्ण समाधान होईल याची मला खात्री आहे. कारण माझे लेखन म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यरूपी समुद्रातील केवळ एक अंश आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.

भवतालच्या जगाकडे कुतूहलाने पहातांना अनेक प्रश्न चिकित्सक असणाऱ्या मुलांच्या मनात निर्माण होत असतात. या वयोगटाचे प्रतिनिधित्व करणारा राघव हा त्याच्या आई- बाबांचे गुरू प.पू.डाॅ. श्री. द. देशमुख उपाख्य डाॅ. काका यांच्याकडे मनात उद्भवणाऱ्या शंकांचे निरसन करायला जातो. व्यवसायाने डाॅक्टर असलेले काका हे अद्वैत वेदान्ताचे प्रसारक आहेत. त्यांनी दशोपनिषदांवर ओवीबद्ध टिका लिहीली आहे. शांकर वेदान्त, प्रस्थानत्रयी व संत वाङमयाचे ते गाढे अभ्यासक आहेत. संसारसागरातील गीता दीपस्तंभ, संक्षेप शारीरक भावदर्शन, नैष्कर्म्यसिध्दी भावदर्शन,
बृहदारण्यकसम्बन्धभाष्यवार्तिक भावदर्शन, असे काहीसे दुर्लक्षित व दुर्बोध असणारे ग्रन्थ आजच्या काळाच्या कसोटीवर सर्वांना समजतील अश्या भाषेत सुलभतेने लिहिण्याची शैली त्यांना अवगत आहे. त्यामुळेच या ग्रन्थांचांही वाचक व साधक वर्ग त्यांनी निर्माण केला आहे.

याशिवाय विकास जीवनाचा, समर्थ वाग्वैजयंती, स्तोत्रावली, साधक सोपान अशी जवळपास 100 च्या वर त्यांची ग्रन्थ संपदा आहे. सकलकारणासह दुःख निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती हेच अध्यात्माचे एकमेव प्रयोजन आहे, याचा ते आयुष्यभर प्रचार करत आले आहेत. आनंदाने जगण्यासाठी शास्त्राभ्यास हा करायलाच हवा असे त्यांचे ठाम मत आहे.

अथर्वशीर्ष संवादमाला या लेखमाले अंतर्गत मी संवाद रूपाने काकांचा व 14-15 वर्षाच्या राघवचा अथर्वशीर्षासंबंधी होणारा काल्पनिक संवाद लिहिते आहे. तर नीला बर्वे या अभिवाचन करत आहेत. आपणा सर्वांच्या शुभेच्छा आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत.
आपण पुढील लिंकवर हे अभिवाचन पाहू शकता.

https://youtu.be/31_NAjGUr1E

अर्चना कुलकर्णी

– लेखन : सौ. अर्चना सांगवीकर कुलकर्णी.
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments