“अंतरंग” या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात एक वाचक म्हणून, प्रेक्षक म्हणून अदिती आली होती. कार्यक्रम झाल्यावर अदितीने माझी भेट घेतली. बोलता-बोलता अदितीने तिचा “मनोगंध” हा काव्यसंग्रह मला भेट म्हणून दिला. ‘त्यावर मला परीक्षण लिहायला आवडेल असं मी तिला म्हणालो’.
काही दिवसांनी “मनोगंध” हातात घेतला. एकामागून एक कविता वाचू लागलो. त्या कवितांचे टिपण करू लागलो. असं करता करता सर्व ४४ कवितांवर मी सुंदर परीक्षण लेख लिहीला.
तो लेख लिहीत असताना, कविता वाचत असताना अदितीच्या प्रतिभेचे आणि संवेदनांचे सर्व भाव सहजपणे माझ्यासमोर येत गेले. रोजच्या जीवनातील अनुभवांचे चित्रण त्या कवितातून केले होते, असे मला त्यात जाणवले.
आठवी, नववीत असताना ख्यातनाम कवींच्या प्रेरणेतून अदितीने काव्यलेखन सुरू केले. त्या शालेय जीवनात अदितीच्या मनावर ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा प्रभाव पडत गेला. परंतु त्यावेळी अदितीने इंग्रजीतून कविता लिहिल्या.
इंग्रजी कविता लिहिल्यानंतर, अदिती मराठी कवितांकडे वळली. कारण आपण आपल्या भाषेत जास्त चांगला विचार करत असतो. त्यामुळे प्रतिभासंपन्न अदिती मराठी भाषेत यथार्थपणे कविता लिहू लागली.
मानवी मन, एकाकीपण, मनातील विचार, वेगवेगळे संवेदनशील भाव या सर्वांवर अदिती कविता लिहित गेली. या अशा कविता अनुभवल्यावर मीही आश्चर्यचकित झालो. इतके सुंदर विचार या कवितातून अदितीने मांडले आहेत.
मी लिहिलेला परीक्षण लेख अदितीला पाठवला. तो वाचल्यावर तिला फार आनंद झाला. त्यावर प्रतिक्रिया म्हणून तिने एक लेख लिहिला. अशा तऱ्हेने आमची मैत्री झाली.
पुढे कोणत्या ना कोणत्या साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही भेटत राहिलो. आमच्या ठाण्याच्या व्ही. पी. एम. ठाणा कॉलेजने माजी विद्यार्थी या नात्याने आम्हाला “प्रेरणा कवितेची” या कार्यक्रमाकरता निमंत्रीत केले होते. त्यावेळी आम्हा दोघांची मुलाखत त्या ठिकाणी घेतली गेली होती.
त्यानंतर अदितीने महाराष्ट्रातील लोकप्रिय वर्तमानपत्रासोबत ‘Thane Anthem‘ लिहीले. हे सर्व सुरू असताना अदितीने, चित्रपटात गीतकार म्हणून लिखाणाला सुरुवात केली. ती गाणी नामवंत गायक शंकर महादेवन, उदित नारायण, जावेद अली, कीर्ती किल्लेदार, आदर्श शिंदे यांनी गायली आणि T-Series व इतर दर्जेदार म्युझिक कंपन्यांतर्फे प्रसारित झाली.
अदितीने बी एम एम पदवी मिळवल्या नंतर एम. ए. केले. शिक्षणानंतर तिने जाहिरात क्षेत्र निवडले . त्यातच तिने पुढे जॉब केला. यानंतर अदितीने पूर्णवेळ लेखन क्षेत्रात आपले करियर करायचे ठरवले. यातूनच मालिका लेखन, गीत लेखन होत गेले.
अदितीचा करिअर ग्राफ वर चढत असताना कोरोना महामारीचा काळ सुरु झाला. या काळातही ती थांबली नाही. आपल्या लेखनाचा धडाका तिने लावून धरला. यातून हळूहळू अदिती वेब सिरीजकडे वळली. कॅफे मराठीच्या यूट्यूब चॅनलवर ३-५ मिनिटाचे छोटे-छोटे एपिसोड तयार होत गेले. ही वेब सिरीज एक लेखक म्हणून मला फार आवडली.
हल्लीच्या काळात किती नाही म्हटले, तरी लिव्ह-इन रिलेशनशिपचे वारे वाहू लागले आहेत. आता ही खूप कॉमन गोष्ट होऊन गेली आहे. आज तरुण वयातील अनेक जोडपी, लग्नापूर्वी एकमेकांना समजून घेण्याकरता, एकमेकांसोबत (quality time ) पूर्ण वेळ एकत्र राहत असतात. यामुळे एकमेकांचे गुणदोष, सवयी लक्षात येतात. त्यातून ते जास्त कम्फर्टेबल होतात. अशावेळी त्या जोडप्यांमध्ये मजेशीर वाद होतात, गमती-जमती घडत असतात. त्याच मजेशीर गोष्टी कॅफे मराठीच्या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या समोर येतात.
या वेब सिरीजचे टायटल ‘मी, माझी Gf आणि…’ असे आहे. ही सिरीज सॅम (समीर सोनटक्के) आणि माऊ
(साक्षी गुप्ते) या मध्यवर्ती पात्रांवर आहे.
सॅम आणि माऊ लिव्ह-इन मध्ये राहत असतात. त्या दोघांच्या लिव्ह-इन आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी, महत्वाचे वादविवादात्मक मुद्दे अगदी खेळकररीत्या अदितीने शब्दबद्ध केले आहेत. प्रत्येक एपिसोडमध्ये एक वेगळा विषय असतो. ज्यामुळे एका जोडप्याच्या आयुष्यातले वेगवेगळे किस्से लज्जतदार, मिस्कीलपणे प्रेक्षकांसमोर येत असतात. अशी ही वेब सिरीज प्रत्येक तरुण मुलाला, मुलीला आवडते. असा हा वेब सिरीजचा अनुभव आहे.
हे एक कलात्मक टीमवर्क आहे, तरी यात अदितीला विसरता येत नाही. कारण शब्द, भावना, संवेदना, पात्र रचना, विचार आणि साहित्यातील कलात्मकता या सर्व गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच सुंदर नाट्य, प्रसंग संवाद तयार होतो. या कलात्मक शिल्पावर, हा सगळा दृश्य अविष्कार अवलंबून असतो. म्हणून अदितीसारख्या संवेदनशील लेखिकेमुळे, ही वेब सिरीज अतिशय परिणामकारक झाली आहे.
तरुणाईच्या चांगल्या, वाईट, खोडील सवयी या वेब सिरीजमधून समोर आल्या आहेत. यामुळे हल्लीच्या युवा पिढीला, ती त्यांच्या आयुष्याशी साधर्म्य साधते. या युवा पिढीचे अंतरंग यातून खऱ्या अर्थाने उलगडते. असे चित्रण कॅफे मराठीने यात केले आहे.
येत्या काळातही अदितीने अशाच प्रकारे आपले लेखन सुरू ठेवावे. तिच्या प्रत्येक लेखात, गीतात, काव्यात आणि संवाद लेखनात एक वेगळा भावनिक अर्थ आहे. अदितीच्या प्रतिभेला सखोलता आहे. तिच्या “मनोगंध” या काव्यसंग्रहात ते प्रकर्षाने दिसून येते. आजच्या युवा पिढीची एक सक्षम लेखिका म्हणून अदितीला ओळखावे, असे मला वाटते.
– लेखन : रुपेश पवार
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
Great Aditi
Sundar lekh Rupesh