जावई म्हणजे सासूचा लाडका ! कारण तो साक्षात विष्णूचे रूप असतो. मग त्याचे लाड, कौतुक करण्यासाठी नेहमीच सासवा खूपच उत्सुक असतात.
हिंदू संस्कृतीत ‘अधिक मास’ म्हणजेच ‘पुरुषोत्तम मास’! या महिन्यात जावयाला आणि ब्राह्मण .. सुवासिनींना ३३ च्या संख्येने दिलेला गोड धोंडे आणि भेटवस्तू म्हणजेच धोंडे वाण होय.
सध्या अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास सुरु आहे. सर्व सासवांना जावयांना वाण देऊन पुण्य कमवायचे असते. त्यामुळे कोणी 33 अनारसे, बत्तासे, म्हैसूर पाक किंवा पेढे यांचेही वाण देतात. आपण यंदा लाडक्या जावईबापूं साठी खास वाण म्हणुन नारळाचे शाही धोंडे देऊया. मग लागूया लगेंच तयारीला.
साहित्य :
२ मोठ्ठया नारळाचा चव,
2 मोठ्या वाट्या साखर,
अर्धी वाटी खवा,
2 चमचे खसखस,
1 चमचा वेलची पावडर,
पाव चमचा जायफळ पूड,
पाव वाटी ड्राय फ्रुट्सचे काप,
2 वाट्या बारीक रवा,1 वाटी मैदा,
मीठ, तळण्यासाठी शक्यतो साजूक तूप,
गरज लागली तर लाटताना लावण्यासाठी पाव तांदूळाची पीठी.
कृती :
प्रथम एका बाऊल मध्ये रवा, मैदा घालून त्यामध्ये पाव चमचा मीठ घालावे. 2 चमचे साजूक तूप गरम करून ते त्यावर घालावे. पीठ भिजवताना निम्मे दूध व निम्मे पाणी घालून किंवा पाणी घालून कणकेप्रमाणे भिजवावे. रवा थोडा फुगतो त्यामुळे त्याचा विचार करून भिजवावे. साधारण अर्धा तास ओल्या कापडाखाली झाकून ठेवावा.म्हणजे छान मुरेल. आता सारण करण्यासाठी नारळ खोवून घ्यावा. एका कढईत खवा छान भाजून घ्यावा व खाली काढून घ्यावा. आता कढईत नारळाचा चव घालुन त्यात साखर मिक्स करून ते गॅसवर कढई मध्ये शिजवायला ठेवावे. लहान कढईमध्ये खसखस छान भाजून ती थोडी कुटून घ्यावी. सारणात ती घालून ड्रायफ्रुटसचे काप घालून वेलची व जायफळ यांची पूड घालावी. साखरेचा पाक झाल्यामुळे सुरुवातीला थोडे सैल होईल पण नंतर ते हळू हळू घट्ट होऊ लागेल. ते सारखे परतावे लागते. नाहीतर करपण्याची शक्यता असते. चांगले घट्ट झाले की त्यात खवा घालून पुन्हा सर्व छान मिक्स करून छान खरपूस परतून घ्यावे. आता हे सारण खाली काढून ताटात पसरून थंड करून घ्यावे.
आता पीठ छान मुरले असेल. ते छान मळून शक्य असेल तर खलबत्त्यात थोडे कुटून घ्यावे. म्हणजे पीठ छान एकजीव होऊन त्याला हलकेपणा येईल व पारी लाटायला सोपी जाऊन एकदम सॉफ्ट बनते. पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावेत. त्याच्या पातळ पुऱ्या लाटून त्यात सारण भरावे व व्यवस्थित बंद करून घ्यावे. असे सारे धोंडे बनवून घ्यावेत. मग कढईत तूप गरम करून त्यात धोंडे सोडावेत व गॅस बारीक करून मंद आचेवर गुलाबी रंगावर खुसखुशीत धोंडे तळून घ्यावेत. लगेंच खायचे असतील तर गरम गरम खावेत. नाहीतर तर ते छान थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावेत.
धोंडे थंड सुद्धा खायला छानच लागतात.
वैशिष्ट्य :
सारणात खवा थोडा भाजून घातल्यामुळे टेस्ट तर बेस्ट येतेचा, पण हेल्दीही बनतात. एक वेगळाच रिचनेस येतो साध्या धोंड्यांनाही, शिवाय अजून टेस्ट सुरेख येते. ड्रायफ्रुट्स मुळे ते अधिक पौष्टिक बनतात. जावयांसाठी खास शाही पद्धतीचे हे धोंडे 10..12 दिवस छान राहतात. त्यामुळे परगावी वाण घेऊन जायचे असतील तर बिनधास्त नेऊ शकता कारण पुरणाचे धोंडे परगावी नेणे अवघड असते. दरवर्षी अनारशाचे वाण देण्या ऐवजी हे धोंडे वाण हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. चवीला तर सर्वांना नक्की आवडणारच. हे गोड शाही धोंडे खाऊन जावईबापू नक्कीच खुश होतील. हे धोंडे हेल्दी सुद्धा असल्यामुळे सारेच खुश होतील. सर्वजण मनसोक्त आस्वाद घेऊ शकतात. मग नक्की करा यंदा हे खास शाही धोंडे !
— लेखन : सौ.स्नेहा मुसरीफ. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
