Saturday, July 12, 2025
Homeबातम्याअधिस्वीकृती पत्रिकेसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करावी - देवेंद्र भुजबळ.

अधिस्वीकृती पत्रिकेसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करावी – देवेंद्र भुजबळ.

पत्रकारांसाठी शासनाच्या असलेल्या योजना, सवलती, तरतुदी यांचा लाभ मिळण्यासाठी संबंधित पत्रकाराकडे अधिस्वीकृती पत्रिका असणे बंधनकारक आहे.त्यामुळे संबंधित वृत्तपत्रास मंजूर असलेल्या अधिस्वीकृती पत्रिकेच्या कोट्यापेक्षा, त्या त्या वृत्तपत्रात अधिक पत्रकार असल्यास, ते अधिस्वीकृती पत्रिकेसाठी पात्र ठरत असूनही केवळ “त्या वृत्तपत्राच्या कोट्यात बसत नाही” या कारणामुळे ते अधिस्वीकृती पत्रिकेपासून आणि त्याद्वारे मिळणारे लाभ यापासून वंचित राहतात. यास्तव वृत्तपत्रांसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करण्याची शिफारस राज्य अधिस्वीकृती समितीने शासनाकडे करावी, अशी सूचना निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केली. ते ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई, कोकण विभागीय माहिती कार्यालय, ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, नवी मुंबई प्रेस क्लब, ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशन, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने “पत्रकारितेची पाठशाळा – बातमी मागची गोष्ट” या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ही कार्यशाळा ठाणे महानगरपालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

श्री भुजबळ पुढे म्हणाले की, पत्रकारांसाठी शासनाच्या वतीने आरोग्य योजना, कल्याण निधी योजना, गृहनिर्माण संस्था, पत्रकार भवन या साठी जागा आणि काही प्रमाणात आर्थिक मदत, म्हाडा, सिडको च्या घरांमध्ये २ टक्के आरक्षण, एस टी महामंडळाच्या बस मध्ये मोफत प्रवास, शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांना आणि आता निकष पूर्ण करणाऱ्या डिजिटल माध्यमांना जाहिराती अशा विविध प्रकारे सहाय्य करण्यात येते. पण हे सर्व लाभ मिळण्यासाठी पत्रकार अधिस्वीकृती धारक असण्याची प्रमुख अट आहे. त्यामुळे या अटींची काटेकोरपणे पूर्तता करण्यासाठी पत्रकारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत राहतील, याची काळजी घेतली पाहिजे.

पत्रकारितेतील करार पद्धतीमुळे पत्रकारांना श्रमिक पत्रकार कायदा, १९५५ मधील तरतुदींनुसार मिळणारे संरक्षण, वैद्यकीय आणि इतर अनुषंगिक लाभ मिळेनासे झाले आहे. त्यामुळे देश भरातील पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन करार पद्धतीने काम करीत असलेल्या पत्रकारांना १९५५ च्या कायद्यातील संरक्षण आणि अनुषंगिक लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली .

याच कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आणि प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या, प्रसारमाध्यमातील विविध व्यक्तींवर लिहिलेल्या “माध्यमभूषण” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि दै.ठाणे वैभवचे संस्थापक व जेष्ठ पत्रकार नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यशाळेस ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी; कोकण विभागीय माहिती उपसंचालक श्रीमती अर्चना शंभरकर; शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याणनिधी समितीचे सदस्य कैलास म्हापदी; ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे; नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला; ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक सोनावणे; ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे; ठाणे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रफुल वाघोले; ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि जिल्ह्यातील विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ऑर्गोनॉमिक्स प्रोग्राम मॅनेजमेंट एक्सपर्ट आणि प्रेरणादायी वक्त्या डॉ. मोना पंकज यांनी दैनंदिन कामकाज आणि ताणतणाव व्यवस्थापन याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

पर्यावरण अभ्यासक विजयकुमार कट्टी यांनी पर्यावरण संवर्धन आणि पत्रकारिता याची सांगड कशाप्रकारे घालता येवू शकेल याविषयीचे मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक भाषणात, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी अधिस्वीकृती पत्रिकेबाबत थोडक्यात माहिती देत, शासन निर्णयानुसार सर्व पत्रकारांनी अधिस्वीकृती पत्रिकेसाठी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावेत.८ तसेच अर्ज करताना येणाऱ्या अडचणी लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे आवाहन केले.

उपायुक्त उमेश बिरारी यांनी अशा कार्यशाळा पत्रकारांना नव्या दृष्टीकोनात विचार करण्यास प्रेरणा देतात, असे सांगून सर्व पत्रकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

श्री.कैलास म्हापदी यांनी त्यांच्या पत्रकारितेतील अनुभव कथन करीत बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजनांबाबत माहिती दिली. पात्र पत्रकारांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.

श्री.संजय पितळे यांनी शासनाकडून पत्रकारांना देण्यात येणाऱ्या लाभांच्या अटी सुलभ करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह;  संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागूल; संचालक (माहिती) (माध्यम आराखडा) किशोर गांगुर्डे;  संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ.गणेश मुळे; कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालक (माहिती) अर्चना शंभरकर; ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी; अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे;  उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी आणि जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

चर्चासत्र, प्रश्नोत्तरे आणि अनुभव कथनाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ही कार्यशाळा पत्रकारांसाठी केवळ माहितीपर नव्हे तर व्यावसायिक दृष्टिकोनातून व शासन-प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांच्यातील सकारात्मक संबंध वृद्धिंगत होण्यास तसेच पत्रकारितेतील नव्या वाटा शोधण्यासाठी ही “पाठशाळा” महत्त्वपूर्ण ठरली, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केला.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

Previous article
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments