नमस्कार मंडळी.
आज अनंत चतुर्दशी. बाप्पाला निरोप द्यायची, बाप्पा सगुण रुपातून निर्गुण रुपात जाण्याची वेळ ! अकरा दिवसांचा बाप्पांचा सहवास अगदी लळा लावून जातो. पण विसर्जन तर करायलाच हवे. नेमक्या त्या क्षणाच्या भावना काही कवी, कवयित्रींनी कवितेतून मांडल्या आहेत.
— संपादक
१. बाप्पाला निरोप
चतुर्थीला बाप्पा
घरोघरी आला
लहान थोरांना
बहु मोद झाला – १
निसर्गानुरूप
फुलांची आरास
बाप्पा सभोवती
सजावट खास – २
करुनी मोदक
लाडू, पंचखाद्य
अर्पिला भक्तांनी
बाप्पाला नैवेद्य – ३
दर्शन घेताच
मनीं समाधान
गजर बाप्पाचा
ठेवी अवधान – ४
बाप्पाचा मनास
वाटतो जिव्हाळा
त्याच्या सान्निध्याचा
लागे सर्वां लळा – ५
तुजला देते मी
प्रेमाची शिदोरी
पुढील वर्षाला
बाप्पा या सत्वरी – ६
दहा दिवसांचा
बाप्पा सहवास
निरोप देताना
अडकतो श्वास – ७
— रचना : श्रद्धा जोशी. डोंबिवली
२. 💦 गणेश विसर्जन..
नको सोडून जाऊ गजानन,
कसे करूं मी गणेश विसर्जन..
जय गणेश जय गणेश देवा,
म्हणून करतो मी रोज आरती..
नैवेद्यास म्हणे मोदकच ठेवा,
चालत आली परंपरा भारती..
केलेस माझ्या पापाचे क्षालन,
कसे करूं मी गणेश विसर्जन..
विघ्नहर्ता तूच आहे बुद्धिदाता,
सृष्टीचा निर्माता भोळा शंकर पिता..
जगतजननी पार्वती तुझी माता,
तूच आमचा अन्नदाता..
दहाच दिवस होता विराजमान,
कसे करूं मी गणेश विसर्जन…
नेसून भरजरी सोवळे पितांबर,
कंठीमाळ कानी सोन्याचे डूल
प्रगटला धर्तीवर वाहन ते उंदीर,
बैसला सिंहासनी
हाती कमळाचे फुल..
भक्तांवर असे दृष्टी सर्वसमान,
कसे करूं मी गणेश विसर्जन..
— रचना : सुभाष कासार. नवी मुंबई.. 💦

३. विसर्जन..
मातीचा बनवला
बाबांनी गणपती
आरासे सजवला
बुध्दीदेव अधिपती
रोज मोदक वेगळे
मजा आली किती
माय असे सुगरण
सर्वांवर करे प्रिती
आबांनी शिकवले
खूप स्तोत्र आरती
दर्शना आप्त येती
कळली गोड नाती
विविध गुण दर्शन
सगळे करी स्तुती
विनंती आरंभी ती
देवा द्यावी सुमती
दिवस भुर्र उडाले
सरे लवकर अति
आपले घरा जाती
परत का रे भूपति
विसर्जन कुंडीमधे
डोळे ते पाणावती
जास्वंद रोप लावी
सोनेरी होई माती
पर्यावरण सांभाळू
मातीशी जोडूनाती
निसर्ग देई आशिष
सगळे आपलेहात
— हेमंत मुसरीफ. पुणे
४. मार्गस्थ व्हायचे
अनंत चतुर्दशी शुभ दिन आला
बिनतारी संदेश मिळाला
‘अनंताचा’ अर्थ उमजला
मागे आता नच वळून पाहायचे
पुढे जायचे, पुढे जायचे
सुख दुःखाचे गाठोडे डोईवर
उगा न मिरवायचे
निर्मल, निर्झर हा तव प्रेमाचा
तुला वाटतो शांति सुखाचा
निःस्वार्थ प्रेम ही ओझे वाटे
देती क्षणात झिडकारुनी
निर्माल्याची फुले फेकूनी
हाच एक न्याय जगाचा
माझे माझे रडगाणे गाऊनि
उगा तुझा भार भूमीवर
स्वीकारून संदेश प्रभूचा
मार्गस्थ हो ! मार्गस्थ हो॥
दहा दिवस जल्लोष करोनी
गोड – धोड नैवेद्यखाऊनि
तृप्त गणराय होऊनी
दुर्वा, मोदक इथेच सोडूनी
बाप्पा गेले कैलासाला
मात पित्याला भेटायला
शाश्वत वास्तव्याला॥
वेडया घे संदेश समजूनी
आयुष्य तुझेही निर्माल्य जाहले
सोड मोह हा अशाश्वताचा
स्थावर – जंगमाचा
मार्गी जे पांथस्थ भेटले
चार दिसाचे ते सहवासी
तुझ्या सारखे ते प्रवासी
उगा का त्यांच्यात गुंतसी
हे माझे सगे माया आभासी
न्याय जगाचा घे समझो नी
नश्वर देह दे इथेच सोडूनी
अलिप्त हो या जगापासूनी
मार्गस्थ हो ! मार्गस्थ हो ! मार्गस्थ हो !
बिनतारी घे संदेश समजूनी
प्रमाण ‘त्याची’ इच्छा मानूनी
मार्गस्थ हो ! मार्गस्थ हो ! मार्गस्थ हो !
— रचना : सुलभा गुप्ते.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
💦 बाप्पाला निरोप देण्यासाठी.. सर्वांच्याच रचना फारच छान 👌
अगदी अचानक आणि आजच पाठविलेली.. माझी रचना देखील.. आपण आठवणीने प्रकाशित केली.. त्याबद्दल.. मनस्वी धन्यवाद…. 🎉
🙏🌹🙏