उद्धव कानडेंचा फोन आला. म्हणाले, “विजयराव, वारसा नावाचा एक अंक आहे. फार सुरेख अंक आहे. त्यावर तुम्ही काहीतरी लिहावं अशी इच्छा आहे.” त्याचवेळी अंकाचे कार्यकारी संपादक जयंत येलुलकर त्यांच्यासोबत होते. त्यांच्याशी देखील फोनवर बोलणे झाले. परंतु दिवाळी अंकावर परीक्षण कोठे लिहावे असा प्रश्न होताच. कारण अलीकडे अनेक दैनिके साहित्यकृतीं विषयी परीक्षण प्रकाशित करणे टाळतात. तिथे दिवाळी अंकाच्या परिक्षणाची दखल कोण घेणार ?
दोन दिवसांनी साहित्य परिषदेत गेलो. उद्धवजींनी एक अत्यंत सुंदर लिफाफा माझ्या हाती ठेवला. लिफाफ्यावर महाराष्ट्र साहित्य परिषद, सावेडी शाखा, अहमदनगर असा उल्लेख !
घरी आलो. लिफाफा उघडला आणि शिंपला उघडून मोती हाताला लागावा तसे झाले. अहमदनगर येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, सावेडी शाखेचा वारसा हा दिवाळी अंक हाती आला. मी आजवर जितके अंक पाहिले त्यात साहित्य कमी आणि जाहिराती अधिक अशीच परिस्थिती होती. जाहिराती छापायच्या, पैसे गोळा करायचे आणि वर्षभराची बेगमी करायची. मिळेल ते साहित्य त्यात घुसवायचे आणि अंक प्रकाशित करायचा. ना साहित्य दर्जेदार, ना अंक दर्जेदार ! असेच बहुतेक अंक.
परंतु जाहिराती नसलेला, उत्तम मुद्र्णमूल्य, साहित्यिकमूल्य, पाण्यात कागदी होडी सोडणाऱ्या अज्ञात हाताचं कृष्णधवल रंगातलं बघत रहावं असं मुखपृष्ठ. अंक बघून मन प्रसन्न झालं. एखाद्या सिनेमाला उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट संगीत, असे सगळेच पुरस्कार मिळावेत तसा दिवाळी अंक विभागातील उत्कृष्ठ मुखपृष्ठ, उत्तम बांधणी, सत्वपुर्ण साहित्य असेच सगळेच पुरस्कार एकाच वेळी प्राप्त करण्याची कुवत असणारा अंक म्हणजे ‘वारसा.’
अंक चाळला आणि या अंकाचे कार्यकारी संपादक जयंत येलूलकर यांना भेटण्याची इच्छा झाली. कारण इतका देखणा, नीटनेटका, साहित्यिक मूल्य सांभाळणारा दिवाळी अंक प्रकाशित करणारा माणूस कसा असेल हे बघण्याची उत्सुकता माझ्या मनात निर्माण झाली.

जयंत येलूलकर यांना भेटायचं मनात होतं खरं. पण त्यांचा फोन नंबर देखील माझ्याकडे नव्हता. अंकातून त्यांचा नंबर घेतला. ते अनायसे पुण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अतिथी गृहात वास्तव्याला होते. साहजिकच मी त्यांना भेटायला निघालो. भेटीपूर्वी ते ढवळे कि पिवळे हे मला माहित नव्हते, आणि मी काळा कि गोरा हे त्यांना ज्ञात नव्हतं. परंतु त्यांना भेटलो आणि हा माणूस देखील अंकाइतकाच प्रसन्न असल्याचे लक्षात आले.
साहित्यसेवा आणि समाजसेवा हाच नरेंद्र फिरोदिया यांचा हेतू असल्याचे जसे लक्षात येते. आणि त्यांच्या परिघात वावरणारे जयंत येलूलकर देखील अत्यंत निर्मल मनाचे आहेत हेही लक्षात येते.
अंक बघताना अहमदनगरचे तरुण उद्योगपती नरेंद्रजी फिरोदिया यांचं पाठबळ या अंकाच्या पाठीशी उभं असल्याचं जाणवतं. परंतु आर्थिक पाठबळाइतकंच उत्कृष्ठ निर्मितीसाठी झटणारा संपादक महत्वाचा असतो. आणि जयंत येलूलकरांनी त्यांचे काम अत्यंत चोख केले आहे.

हा अंक बघताना एका उद्योजकाची साहित्यवरील निष्ठा बघून मनस्वी आनंद होतो. अंकाला एवढं आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या नरेंद्रजींना निम्म्या अंकात त्यांच्या उद्योगाच्या जाहिराती छापता आल्या असत्या. परंतु उद्योगापेक्षा साहित्य, साहित्यिक त्यांना अधिक महत्वाचे वाटले असावेत. त्यामुळेच त्यांनी केवळ मलपृष्ठावर दोन जाहिराती छापल्या आहेत. परंतु त्या जाहिराती छापताना देखील उद्योगाची जाहिरात यापेक्षा सामाजिक बांधिलकी हाच हेतू प्रमुख असल्याचे लक्षात येते.
मलपृष्ठवरील ‘आशा फिरोदिया एज्युकेशनल फाउंडेशन’ च्या जाहिरातीतील ‘आज मुलं शिकली तर उद्या देश घडेल‘ हे वाक्य काळजात घर करते. नरेंद्र फिरोदिया यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करते.
बालपणीच्या आठवणी हा अंकाचा विषय. साहित्य, कला आणि राजकीय क्षेत्रातील यशाला गवसणी घालणाऱ्या मान्यवरांचे त्यांच्या बालपणीच्या आठवणींविषयीचे लेख ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ या सुभाषिताची आठवण करून देतात. पदमश्री पुरस्कार प्राप्त उद्योजक अरुणजी फिरोदिया, रंगनाथ पठारे, रामदास फुटाणे, पोपटराव पवार, चंदू बोर्डे, बबनराव ढाकणे, अभिनेता सयाजी शिंदे, यांचे लेख जगण्याची, संकटांना तोंड देण्याची, यशाला गवसणी घालण्याची प्रेरणा देतात.
बालपणीच्या आठवणींविषयी लिहायचे म्हटले कि बहुतेक जण मी कसा घडलो हेच सांगतात. परंतु पदमश्री अरुणजी फिरोदिया त्यांच्या आईच्या बालपणीच्या आठवणी सांगण्यात जास्त रमले. असे का झाले असावे हे तो लेख वाचताना लक्षात येते. त्यांच्या आईने तीन वर्षात तिसरी ते अकरावी असे आठ वर्ग पूर्ण केल्याचे वाचून तर फार मोठी प्रेरणा मिळते.
रंगनाथ पठारे यांचा लेख मुलांच्या मनात वडिलांच्या विषयी आकस कसा निर्माण ते दाखवतो.
पोपटराव पवारांच्या लेखातून मुलांच्या ठायी असणारा अंगभूत खोडसाळपणा ठसठशीत होतो.
सयाजी शिंदे यांनी त्यांच्या वडिलांची आठवण सांगितली आहे. त्यांचे वडील एका ब्राम्हणाची जमीन कसायचे. त्याचवेळी ‘कसेल त्याची जमीन‘ असा हक्क प्रदान करणारा कुळकायदा आला. परंतु, ‘दुसऱ्याचं आमाला नगं‘ असं म्हणत सयाजी शिंदेंच्या वडिलांनी जमीन नाकारली. आज प्रत्येकजण दुसऱ्याला लुबाडण्यासाठी सरसावत असताना हि आठवण समाजाला फार मोठा आदर्शाचा पाठ घालून देते.
मान्यवरांच्या आठवणी नंतर ललित विभागातील काही लेख आणि कथा आपले लक्ष वेधून घेतात. त्यातील प्रा. डॉ. संजय कळमकर यांचा “जेव्हा हाडे बोलू लागतात” हा लेख असाच मार्मिक आहे.
कविता या विभागात उद्धव कानडे, इंद्रजित भालेराव, राजन लाखे, ज्योत्स्ना चांदगुडे, अशा अनेक मान्यवर कवींच्या कविता या अंकात आहेत. अंकातील सगळ्याच कवींच्या कविता लक्षवेधी आहेत. परंतु वेदनेला माय मानणारी उद्धव कानडे यांची कविता लक्ष वेधून घेते. हे नाकारता येणार नाही. आली कविता छापली कविता असे नाहीच. बहुतेक कविता पाणीगणिक एक अशाच. बऱ्याच कवितांना श्रीधर अंभोरे यांची अत्यंत समर्पक रेखाचित्रे.
अंक हाती घेतानाच प्रसन्न वाटते. अंक वाचावा असं वाटतं. आणि एकेक लेख वाचताना आपल्याही नकळत आपण अंकात गुंतत जातो. दिवाळी अंक कसा असावा याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषेद सावेडी शाखा, अहमदनगर यांचा वारसा हा दिवाळी अंक.
सगळेच अंकातील बहुतेक साहित्य अत्यंत दर्जेदार म्हणावे असेच आहे. परंतु अपवाद असतातच. त्यानुसार काही मान्यवरांनी देखील काहीतरी लिहायचे म्हणून लिहिले आहे असे जाणवले. अशा वेळी मान्यवरांनी अंकाच्या साहित्यिक दर्जाला बाधा येईल असे लेखन केले अथवा करायच्या म्हणून शब्दांच्या कसरती केल्या, रचायचा म्हणून शब्दांच्या उतरंडी रचल्या तर त्यातून जन्माला आलेले साहित्य कसदार नसेल तर त्या लेखनाला बाजूला ठेवण्याचे धारिष्ट्य संपादक मंडळाने दाखवायला हवे.

– लेखन : विजय शेंडगे. कवी आणि लेखक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800