हजारो अनाथांची माई सिंधूताई सपकाळ यांचे काल ह्रदयविकाराने निधन झाले. लक्ष लक्ष बालके पोरकी झाली.
त्या माईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहणाऱ्या कविता पुढे सादर करीत आहे.
१
अनाथांची माई
तीच ही सिंधूताई
जिणे तिचे केविलवाणे
परी डगमगली नाही
संशयी पतीने
केली मारहाण किती
फेकिले तिला गोठ्यात
नव मासांची गर्भवती
प्रसवली चिंधी गोठ्यात
गोमातेने दिधला आधार
ना सासर अथवा माहेर
ती असे एकटी निराधार
बांधले बाळ पदरात
गात फिरली आगगाडीत
शमविण्या भूक उदराची
भाजली भाकरी स्मशानात
दीपक नामक बालक
जाहली त्याची आई
हीच ती सिंधूताई
आज हजारो अनाथांची माई
पतीस ठणकावून सांगे
“नव्हे मी आता बाई,
मी सिंधूताई
समस्त अनाथांची माई”
दीप आता विझला आई
अंधार पसरला ठाई
शांती लाभो पुण्यात्म्यासी
हीच श्रद्धांजली वाही

– रचना : अरूणा मुल्हेरकर. अमेरिका
२
सिंधूताई
अनाथांची आई
घेतला पोरक्यांचा कैवार
दिला दोन घासांचा आधार।
नाही पाहिली जात-पात
नाही केला भेदभाव।
वंचितांना दिला न्याय
ठेवून उरात करुणेचा
भाव।
नाही दिल्यास चार भिंती
दिली मायेची ही सावली।
ममतेची देऊन अनुभूती
पोरक्यांची तू आई झाली।
आता त्यांनी कसे जगावे
वियोगाचे दूःख कसे सहावे।
तुझ्यासम दुसरी होणे नाही
जिवांना त्या कैसे समजावे।
ये परतूनी परत,
भांडून त्या देवाशी।
तुझ्या अनाथ लेकराला
घे दोन मिनिटं पोटाशी।

– रचना : वर्षा फाटक
३
सिंधू स्तोत्र
तिचे जगणे कीर्तन
वेदनेचा हो गजर
विपत्तीच्या खडकाला
सिंधू निश्चयी पाझर
माता एकटी अनाथ
सिंधू सावरे सत्वर
किती बाळवृक्षी मग
फुलवला हो बहर
पथावर ती राखली
सदा सावध नजर
जसा सिंधू माथ्यावर
शोभे शालीन पदर
मृदू माया अंतरात
सिंधू बाहेर नीडर
नऊवारीत माऊली
संस्कृतीची हो कदर
निंदा घाव देणाऱ्यांनी
केला वंदून आदर
दिव्य कर्तृत्व अमृत
सिंधू अजर अमर
विवंचना सूर्य माथी
तापला अष्टौप्रहर
सिंधू घोट घोट प्याली
विरोध कडूजहर
भावदुष्काळाशी युद्ध
सेवाशौर्याचा कहर
सातासमुद्रापल्याड
कीर्ती सिंधूची लहर
– रचना : डॉ सचिन चिंगरे
४
अनाथांच्या आई
सिंधुताई सपकाळ
होत्या अनाथांच्या आई..
गेल्या पाखरांना सोडून,
कशाची होती एवढी घाई…?
उठा आता माई लवकर,
पाखरे साद तुम्हाला देती…
तुमच्याशिवाय त्यांचा,
हात हाती कोण घेती….!!
खूप घाई केली तुम्ही माई,
या पुन्हा आपल्या घरा परतुनी…
आई !! माई भूक लागली खूप,
आवाज येतोय प्रत्येक घरातूनी..!!
सर्व जगाची जननी झाल्या,
अन् अनाथांच्या मायेचा पदर….
ओले झालेत डोळे साऱ्यांचे,
दृश्य आयुष्याचे झाले धूसर..!!
तुम्हीच साथ सोडली तर,
अनाथांना आधार कोण देणार…?
आई सारखी माया करून,
प्रेमाने जवळ कोण घेणार..
प्रेमाने जवळ कोण घेणार….
– रचना : श्वेता उदमले
५
एक युगातली माय
नाव सिंधू तसे तिचे
हृदयही हो अगाध
ताई झाली जगताची
अन…
पोरकी लेकरं सनाथ
झाली आबाळ जीवाची
साथ जोडीदाराची ना
लेक जन्मास घाली
माय गोठ्यात झाली ना
आधी आपण अनाथ
एक लेक पदरात
साऱ्या अनाथांच्या साठी
पान्हा फुटला उरात
किती दुःख साठविले
सागराच्या सम तळी
कणखर बाणा तिचा
भाग्य माय होणं भाळी
कसं विसरू तुला ग
माय अनाथांची आई
पाळण्यात रडणाऱ्या
बाळ ओठी हाक माई
माझी प्रेमळ ती माई….
उगा केलीस तू घाई…..
अशी भेटणार नाही….
आता कुणाला तू आई…..
आज रडली पद्मश्री
शांत कविताही झाली
एक युगातली माय
कायमचीच निमाली

– रचना : डॉ.मंजूषा कुलकर्णी
६
अनाथांची माय ..
अनाथांची तू माय
सिंधुताई सपकाळ
करुणेचा सागर
दुधावरील जणु साय
मायेची सदा पाखर
केली साऱ्या लेकरांवर
व्हावे कसे उतराई
प्रेमळ अशी माझी माई
कुंकुम टिळा भाळी
हास्य निखळ वदनी
झाली निर्माण पोकळी
माय गेली तू सोडूनी
साऱ्या जणांची जननी
वंदीतो तुज मनोमनी
तुझ्या सम तूच माय
हृदयी वसे तव सय
– रचना : नेहा हजारे. दुबई
अनाथांची माय माऊली सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली अर्पण करणाऱ्या सर्व कवयित्रीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद
सिंधुताई सपकाळ आज स्वर्गवासी झाल्या व त्यांनी सांभाळ केलेली अनाथ मुले/मुली पोरकी झाली. स्वत: कठिण परिस्थितीतून जाऊनहि अनाथ बालकांच्या त्याच आधार झाल्या. सर्व लेख व कविता खुप खुप भावपूर्ण आहेत. या थोर समाजसेविकेला मी माझी आदरयुक्त श्रद्धांजली वाहते. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो व त्यांचे समाजसेवेचे कार्य पुढे सुरू राहून वृद्धींगत होवो.
सिंधुताईंना श्रद्धांजली वाहणार्या सर्वच कविता भावपूर्ण…
अतिशय भावपूर्ण रचना