Thursday, September 18, 2025
Homeयशकथाअनाथांची माय

अनाथांची माय

जेष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सकपाळ
यांचे काल रात्री पुणे येथे हृदयविकाराने निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. २००८ च्या मायबोली मध्ये प्रसिद्ध झालेला त्यांचा प्रेरणादायी, संघर्षशील जीवनप्रवास येथे देत आहे.

१९९० सालची गोष्ट. मे महिन्यात, भर दुपारी एक बाई आमच्या घरी आल्या. ठिगळं लावलेलं लुगडं, रुपयाएवढं कुंकू आणि पायात चपला नाहीत. माझ्या बाबांशी काहितरी काम होतं त्यांचं. या बाईंचं मोठ्या आवाजातलं बोलणं मला आत व्यवस्थित ऐकू येत होतं. त्यांचे कुठे कुठे ३-४ अनाथाश्रम होते, आणि तिथे राहणार्‍या मुलांसाठी त्यांना पैशांची आवश्यकता होती.

बाबांचा कामानिमित्ताने अनेक धार्मिक संस्थाशी संबंध होता, आणि या बाईंना तिथून आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न बाबा करणार होते. मग जरा वेळाने बाबांनी मला बोलावलं. म्हणाले, ‘या सिंधूताई. यांना घेऊन डॉ. XXXX यांच्या घरी जा.’
बाहेर प्रचंड ऊन होतं. बाबांनी रिक्षेसाठी पैसे दिले आणि डोक्यावर रुमाल, खिशात कांदा असा जामानिमा करून मी निघालो. सिंधूताईंनी डोक्यावरून पदर घेतला फक्त. पायात चप्पल नव्हतीच. मे महिन्याच्या त्या भयंकर उन्हातही सिंधूताईंच्या पायांना चटके कसे बसत नाहीत, याचाच विचार मी बराच वेळ करत होतो. डॉक्टरकाकांचं घर तसं फार लांब नव्हतं, पण उन्हाच्या झळांमुळे रस्त्यावर एकही रिक्षा नव्हती. म्हणून पायीच जाणं आलं. चालता चालता मग त्यांनी नाव काय, कुठल्या वर्गात वगैरे चौकशी केली. त्यांचं बोलणं वेगळंच होतं. खूप प्रेमळ. आवाजही वेगळाच. खडा, खणखणीत, पण मऊ. उत्तर देताना त्यांना ‘सिंधूताई’ म्हटलं, तर मला म्हणाल्या, ‘बाळ, मला माई म्हण.’

माईंना घेऊन डॉक्टरकाकांकडे पोहोचलो, तर घरात बरीच गर्दी होती. या डॉक्टरकाकांनी तेव्हा नुकतंच दक्षिणेतल्या एका बुवांचं शिष्यत्व पत्करलं होतं. अकोल्यातली प्रॅक्टीस सोडून, ते आंध्र प्रदेशातील त्या बुवांच्या आश्रमात जाऊन राहणार होते. हवेतनं अंगठ्या, घड्याळं काढणार्‍या त्या बुवांना गरिबांसाठी एक मोठा दवाखाना सुरू करायचा होता, आणि त्यासाठी म्हणून डॉक्टरकाकांनी आपला बंगला, त्याभोवतीची ८-१० एकर जमीन, ३-४ गाड्या असं सगळं त्या बुवांना देऊन टाकायचं ठरवलं होतं. आम्ही गेलो तेव्हा त्या बुवांच्या शिष्यांचा कसलासा सत्संग सुरू होता. डॉक्टरकाकांनी मला आत बोलावलं, पण माईंना बाहेरच थांबवलं. आत भरपूर कुलर्स लावलेले होते, आणि एक खूप स्थूल आजोबा ‘मानवसेवा हीच माधवसेवा’ असं काहीबाही बोलत होते. बाहेर माई काकांना त्यांच्या आश्रमांबद्दल सांगत होत्या. खर्च वाढले आहेत, मुलांना शिकवायचं आहे, सरकार पैसे देत नाही, वगैरे. माईंचं जोरात बोलणं इथेही आत ऐकू येत होतं. सत्संग सुरू असताना शांततेचा भंग झाल्याने ते आजोबाही बोलायचे थांबले.

काकांनी माईंना खिशातून पाच रुपये काढून दिले, आणि आत येऊन मला म्हणाले, ‘एवढ्या उन्हात कशाला आलास ? आता तू थांब इथेच. ड्रायव्हर घरी सोडेल तुला. त्या बाईंना मी जायला सांगितलं आहे. आणि तुझ्या बाबाला सांग की या बाई भिकारी आहेत. त्यांचा अनाथाश्रम वगैरे काही नसेल. उगीच फसवण्याचे धंदे.’

माई अजूनही बाहेरच उन्हात उभ्या होत्या. माईंना घेऊन घरी परत गेलो नाही, तर बाबा रागवतील, असं सांगून मी तिथून सटकलो. घरी परत येताना वाटेत माईंना काही घरं उघडी दिसली, आणि माई सरळ तिकडे वळल्या. माईंनी परत त्यां घरी आश्रम, मुलं असं सगळं सांगितलं, आणि ‘माझ्या मुलांसाठी मला भीक घाल ग माये’, असं म्हणून माईंनी पदर पसरला. मी थिजलोच. माईंनी अशी भीक मागितल्यानं मला प्रचंड शरमल्यासारखं झालं. पण माईंना भीक मागताना काही वाटत नसावं. उलट कोणीतरी दोन पाच रुपये पदरात टकल्याने त्या खुशीत होत्या. भीक मागणं, ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट, हे त्या दिवशी मला पुरेपूर कळलं.

माईंची पुढे बरीच वर्षं भेट झाली नाही. पण त्यांच्याबद्दल अनेकदा पेपरमध्ये यायचं. त्यात त्यांच्या भीक मागण्याचे, हालअपेष्टांचे उल्लेख असायचे. कधी लता मंगेशकर, मनमोहन सिंह, बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना त्यांचे फोटो असायचे. पण तरीही ‘सिंधूताई सपकाळ’, म्हणजे माईंचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर यायच्या त्या हातात पाच रुपयाची नोट गच्च धरून उन्हात अनवाणी उभ्या असलेल्या, आणि माझा हात धरून भीक मागणार्‍या माई.

माई मुळच्या विदर्भातल्या. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरं वळायचं काम करायचे. गाव अतिशय मागासलेलं. शहरी सुविधांचा स्पर्श नाही, कुणाला शिक्षणाचा गंध नाही, अशीच सगळी परिस्थिती. चिंधी (सिंधू) ही सर्वांत मोठी मुलगी. पाठी एक भाऊ, एक बहीण. त्या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील त्यांना घेऊन पिंपरीमधी गावात आले. मुलीनं शिकावं अशी वडलांची इच्छा. पण आईचा मात्र सक्त विरोध. मग ते माईंना गुरं राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या.

माई मुळच्याच बुद्धिमान, पण जेमेतेम मराठी चौथीपर्यंत शिकता आलं. अल्पवयातच लग्न झालं आणि चिंधी साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नात माईंचं वय होतं अकरा वर्षं आणि नवर्‍याचं वय तीस वर्षं. घरी प्रचंड सासूरवास. ढोरासारखी मेहनत करावी लागे. घरात सगळे पुस्तकद्वेष्टे. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बीळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अक्षरांवरून आधाशासारख्या नजर फिरवायच्या.

अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. त्या सांगतात,  “तेव्हा गुरं वळणं हाच व्यवसाय असायचा. गुरंही शेकड्यांनी असायची. त्यांचं शेण काढता काढता कंबरडं मोडायचं. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणार्‍यांना मजुरी पण शेण काढणार्‍यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथं मी बंड पुकारलं. लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली.”

माई हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली होती, आणि अडाणी गावकर्‍यांना नवीन नेतृत्व मिळालं होतं. गावकरी डोईजड होण्याची शक्यता होती. माईंच्या पोटातील मूल आपलं असल्याचा प्रचार मग दमडाजीनं सुरू केला. नवर्‍याच्या मनात माईंच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला, आणि पूर्ण दिवस भरलेल्या माईंना त्यानं बेदम मारून घराबाहेर काढलं. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकलं. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवर्‍यानं हाकलल्यानंतर गावकर्‍यांनीही हाकललं. माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनंही पाठ फिरवली.

दोन घासांसाठी भीक मागण्याची वेळ माईंवर आली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वेस्टेशनवर त्या भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेलं एखादं फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वेरुळांच्या कडेनं फिरायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळे स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणं सुरू झालं. त्या गायच्या,

ये ऊन किती कडक तापते
बाई अंगाची फुटते लाही
दोन दिसाचा शिळा तुकडा वाढा
चालेल आम्हा वाढा
दार नका लावू
पुन्हा येणार नाही..

माई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथेही त्यांनी कधी एकटं खाल्लं नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकार्‍यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच माईंना संरक्षण दिले. माईंभोवती ते रिंगण घालून झोपायचे. २१ वर्षांच्या होत्या माई तेव्हा. पण एक दिवस हे संरक्षणही संपले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नाही. त्यांच्याबरोबर जेवणारे भिकारी त्यांच्यापासून दूर झाल्याचं त्यांना जाणवलं आणि लक्षात आलं की तिथे कायम राहता येणार नाही. वाट फुटेल तिथे माई चालत राहिल्या. आश्रय कुठेच मिळाला नाही. उघड्यावर तर रात्री झोपणं शक्य नव्हतं, म्हणून माईंनी स्मशान गाठलं.

त्या स्मशानातच राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचं काय ? एक मृतदेह आला. अंत्यसंस्कार झाले. मडकं फुटलं. पण मडक्यात थोडं पाणी तसंच होतं. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे मागे आशेने चालू लागल्या. एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडं पीठ आणि सव्वा रुपया दिला. भिन्न काळोख दाटला होता. चिता अजून धगधगत होती आणि माईंच्या पोटात भूक इतकी पेटली होती की ‘दगड चावता आला असता तर दगडही चावून खाल्ला असता.’ माईंनी मडक्यातल्या पाण्यात पीठ कालवले, आणि चितेवरच्या निखार्‍यावर भाजले. कडक भाकरी तशीच खाल्ली.

माई काही दिवसांनी तिथूनही बाहेर पडल्या, आणि भीक मागत, काम शोधत चिखलदर्‍याला पोहोचल्या. तिथे रस्ताबांधणीला सुरुवात झाली होती. स्थानिक आदिवासी आणि मध्य प्रदेशातील मजूर तिथे काम करत होते. कंत्राटदाराने माईंना कामावर ठेवण्यास नकार दिला. सकाळ-संध्याकाळ कुटकी (भात), डाळ आणि आठवड्यातून एकदा ताक, या बोलीवर माईंनी तिथल्या मजुरांची मुलं सांभाळण्यास सुरुवात केली. चिखलदर्‍याचं काम संपल्यावर हे मजूर पुण्याला आले, आणि माई त्यांच्याबरोबर निघाल्या.

एकदा असंच पुण्यात कुठेसं रस्त्यावर माईंना एक मुलगा रडत बसलेला दिसला. आपलं नाव ‘दिपक गायकवाड’ एवढंच त्या मुलाला सांगता येत होतं. आसपासच्या लोकांनाही काहीच माहिती नव्हती. त्या मुलाला घेऊन माई पोलीस स्टेशनात गेल्या तर पोलीसांनी माईंना हाकलून लावलं. माईंनी आठवडा पोलीस स्टेशनबाहेर बसून काढला पण पोलीसांनी तक्रारही नोंदवून घेतली नाही. माईंनीच मग त्या मुलाचा सांभाळ करायचं ठरवलं. पुढे महिनाभरात अशीच २-३ मुलं त्यंना रस्त्यावर भीक मागताना भेटली, आणि माईंनी त्यांनाही आपल्या पदराखाली घेतलं. निराश्रिताचं जगणं किती भयंकर असतं ते त्यांनी अनुभवलं होतं. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये, हे त्यांची इच्छा होती. या मुलांमुळे आपल्याही जगण्याला काही अर्थ मिळेल, असं त्यांना वाटलं. पण या मुलांचा सांभाळ करायला पैसा कुठून आणायचा? स्वतःचंच पोट तिथे भरलं जात नव्हतं, आणि आता जोडीला ४ मुलं होती. आणि त्या मुलांनी भीक मागणं माईंना मंजूर नव्हतं.

दिपक गायकवाड

त्यावेळी भारत-रशिया मैत्री करारावर पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सह्या होणार होत्या. या ऐतिहासिक करारासाठी मोठा समारंभ योजला होता. कडेकोट बंदोबस्त होता. माईंच्या लक्षात आलं की आपण इथे व्यासपीठावर जाऊन दोन शब्द जर बोलू शकलो तर इथे जमलेल्या हजारो प्रेक्षकांच्या मनांत आपण जागा करू शकू आणि मग आपल्या संकटातून मार्ग निघू शकेल. त्यांनी हळूच सभागृहात प्रवेश केला. झाडूवाली असेल म्हणून कोणीच त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. व्यासपीठावर एक काश्मिरी माणूस आपल्या व्यथा सांगत होता. तो भाषण संपवून खाली उतरताच माईंनी थेट व्यासपीठावरच उडी घेतली. दुसरा वक्ता अजून उठायचा होता. त्याआधी माईंनी सरळ माईक धरला आणि भाषण सुरू केलं. त्यांचा खणखणीत आवाज आणि कविता ऐकून सगळे स्तब्ध झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला, आणि माईंना जे हवं होतं ते मिळालं. आता त्यांना मदत नक्कीच मिळणार होती.

कार्यक्रम संपला आणि श्री. सुनील दत्त समोर आले. त्यांनी माईंशी हस्तांदोलनच केले. माई थक्क झाल्या. सर्वजण माईंचं कौतुक करत होते, पण त्यांचं तिकडे लक्ष नव्हतं. त्यांना भूक लागली होती. शेवटी त्यांनी हळूच विचारलं, ‘खाना है क्या ?’ कार्यक्रमानंतर आमंत्रितांसाठी बडा खाना मांडलेलाच होता. माई गेल्या आणि त्यांनी पूर्ण ताट भरून अन्न घेतलं. तिथेच जमिनीवर बसून जेवू लागल्या. एवढं ताटभर अन्न त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं होतं.

त्या जेवत असतानाच दगडूशेठ हलवाई मंदिर समितीचे तात्यासाहेब गोडसे तिथे आले आणि त्यांची विचारपूस केली. तात्यासाहेबांनी माईंच्या मुलीला, ममताला, सांभाळण्याची तयारी दाखवली, आणि ममता पुण्याच्या सेवासदनमध्ये दाखल झाली. त्याच कार्यक्रमात आकाशवाणीचे यशवंत खरातही होते. माईंचा खडा आवाज त्यांनी ऐकला होताच. त्यांनी माईंना आकाशवाणीवर कार्यक्रम करायला माईंना आमंत्रण दिलं. त्या मुलांना बरोबर घेऊन मुंबईला निघाल्या. पण स्वतःच्या मुलीला माईंनी दुसर्‍यांना सांभाळायला का दिलं ?

माई सांगतात, “रस्त्यावर बेवारस सोडलेली मुलं माझ्याकडे सांभाळायला होती. मी जे काही सोसलं होतं त्यानंतर माझा हा मार्ग मी निश्चित केला होता. माझ्या मुलीला मी त्यांच्याबरोबर सहज सांभाळू शकले असते. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर ? मी काय केलं असतं ? ज्या मुलांना मी सांभाळणार होते, ती मुलं तशीच पाणी पिऊन झोपली असती. पण माझी मुलगी त्यांच्याबरोबर असती तर माझी माया जागृत झाली असती. तिला मी अंधारात नेऊन गुपचूप दोन घास खाऊ घातले नसते का ? मला अन्याय करायचा नव्हता. म्हणूनच मी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातले आणि पुढे निघाले. माझ्यातली आई चुकली असती तर मग माझ्याच्याने इतर मुलांचा सांभाळ झाला नसता.”

आकाशवाणीवर गाऊन माईंना ३५० रु. महिना मिळू लागले. दूरदर्शनवरही त्यांच्या गाण्याचे २ कार्यक्रम झाले, आणि जमा झालेले पैसे घेऊन माई चिखलदर्‍याला परतल्या. एक झोपडी बांधून त्यांनी आपला आश्रम थाटला. हळूहळू मुलांची संख्या वाढू लागली. रस्त्यावर सापडलेली, कचराकुंडीत फेकलेली, अनाथ झालेली मुलं माईंनी आपली मानून चिखलदर्‍याला आणली.

त्याचवेळी महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवरील मेळघाटच्या जंगलात व्याघ्र प्रकल्पासाठी स्थाननिश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावांतील आदिवासी निर्वासित होणार होते, आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवासींची बाजू शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कोणीच लक्ष देत नाही, हे पाहून जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयावर २-३ मोर्चेही नेले. तेव्हाचे वनमंत्री छेदिलाल गुप्ता यांच्या कानावर हा प्रकार गेला, आणि त्यांनी आदिवासींचे पुनर्वसन झाल्याशिवाय व्याघ्र प्रकल्प सुरू होणार नाही, असं आश्वासन माईंना दिलं. अजून एक लढाई माई जिंकल्या, पण अशा अनेक लढाया त्यांना रोजच लढाव्या लागत होत्या.

चिखलदर्‍याचा परिसर ख्रिश्चन मिशनर्‍यांनी व्यापला आहे. माईंचं अनाथालय त्यांना त्या परिसरात नको होतं. त्यांनी माईंवर अनेकदा दबाव आणला. ‘तुझी मुलं आम्हाला दे, आम्ही तुला पैसे देतो’, म्हणून अनेकदा त्यांच्याकडून निरोप आला. मेळघाटच्या जंगलात मजा करायला येणार्‍या राजकारण्यांसाठी बंगल्यावर मुली धाडाण्यास दडपण आणलं गेलं. मात्र ही मुलं हिसकावून घ्यायचा प्रयत्न झाला, तेव्हा माई अक्षरशः चवताळून उठल्या. अमरावतीपासून ते थेट दिल्लीपर्यंत माईंनी तक्रारी केल्या, पण उपयोग शून्य. पण एवढं होऊनही माई चिखलदर्‍यातून पळ काढत नाही, हे पाहून मिशनर्‍यांच्या गुंडांनी माईंवर हल्ला केला. एका महिन्यातच दोन हल्ले झाले. माई तरीही बधल्या नाहीत. मुंबईला निघाल्या असता त्यांच्यावर तिसरा हल्ला झाला, आणि त्यात त्या जबर जखमी झाल्या. त्यानंतर मात्र माईंनी त्या परिसरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

माईंचा पहिला मुलगा दिपक त्यांना पुण्याला सापडला होता. माईंच्या एका मुलाखतीत दिपकचा उल्लेख वाचून सासवडहून कोणी त्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत चिखलदर्‍यास आले. दिपकच्या आजोबांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी थोडी जमीन आपल्या बेपत्ता, अनाथ नातवासाठी ठेवली होती. दिपकने आता आपल्या गावी परत जावं, अशी त्या नातेवाईकांची आणि माईंची इच्छा होती. पण दिपकने नकार दिला. माईंनीच त्याला वाढवलं होतं, आणि त्यांना सोडून कुठेही जाण्याची त्याची तयारी नव्हती. मात्र मिशनर्‍यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दिपक, माई आणि अनाथाश्रमातील मुलांसकट चिखलदर्‍यातून बाहेर पडला. आणि कुंभारवळण या सासवडजवळ असलेल्या गावात, आजोबांनी नावे करून दिलेल्या जमिनीवर ‘ममता बाल सदन’ उभं राहिलं.

आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत. १०४२ मुलं तिथे राहतात. काही वर्षांपूर्वी माई चिखलदर्‍यास परतल्या, आणि तिथे मुलींचं वसतीगृह सुरू केलं. आज १०० मुली तिथे राहून शिक्षण घेतात. माईंना आज सुमारे १५०० मुलं आहेत. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळीच त्यांची मुलं. विधवा, परित्यक्ता, मनोरुग्ण या त्यांच्या लेकी. माईंच्या मुलींचं आडनाव साठे, तर मुलांचं आडनाव सपकाळ असतं. माईंना ४०० सुना आणि २०० जावई आहेत. बरीचशी मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. ‘माझी मुलं डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत’, हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. मागे एकदा माईंकडे गेलो होतो, तर ‘माझी मुलगी एम फील झाली’ असं म्हणून माईंनी पेढे दिले. माईंच्या मुलांची, नातवंडांची लग्नं, बारशी तर नेहमीचीच असतात. शिकून, नोकरीला लागून मुलं दूर गेली, तरी माईंच्या ओढीनं ती परत येतात. माईंशिवाय आयुष्य जगणं, त्यांच्यासाठी संभवत नाही.

याशिवाय वर्धा जिल्ह्यात एक वृद्धाश्रम, गोरक्षण केंद्र आणि परित्यक्तांसाठी चिखलदर्‍याला वसतीगृह माईंनी सुरू केलं आहे. त्या सांगतात, “सर्वांनी, जन्मदात्या आईनंही पाठ फिरवली तेव्हा गोठ्यातल्या गाईनं मला संरक्षण दिलं. म्हणून मी गायीलाच माझी माय मानलं. तुझ्या ऋणातून उतराई होईन, असं मी तिला वचन दिलंय.” वर्ध्याच्या गोरक्षण केंद्राच्या रूपानं माईंनी आपलं वचन पाळलं. आज रस्त्यावर सोडलेल्या भाकड गायींचा, कावळ्यांनी डोळे फोडून जखमी केलेल्या गायींचा सांभाळ या केंद्रात केला जातो. ३० वर्षं राज्यभर हिंडून, भीक मागून, भाषणं करून, कविता म्हणून माईंनी त्यांचा हा संसार उभा केला आहे.

गाण्यानं, कवितेनं माईंना जगवलं, आणि आजही कविताच त्यांचा आधार आहे. बहिणाबाई, सुरेश भटांच्या कवितांचं ऋण त्या मान्य करतात. ‘या साहित्यिकांनी मला दु:खातून बाहेर काढलं आणि सांगितलं, व्रण जपत रहा, गात रहा, पुढे जात रहा. साहित्य माणसाच्या पायात बळ देतं, जखमा पुसतं, बेभान करतं, उन्मत्त करतं. कवितांमुळेच माझ्या वेदना मी विसरू शकले’, असं माई नेहमी सांगतात. त्या स्वतः उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या कवितेतही ही वेदना असते. “वेदनेशिवाय कविता निर्माण होत नसते. वेदनेतून निर्माण झालेली कविता काळजाशी नातं जोडते”, माई सांगतात

माईंनी आता साठी ओलांडली आहे. दिपक आणि ममता ही त्यांची मुलं त्यांचं बरचसं काम आता सांभाळतात. ममताने एम एस डब्ल्यू केलं आहे. ‘सख्खी आई जिवंत असताना अनाथाश्रमात नेऊन टाकलं, आणि इतरांच्या मुलांना सांभाळलं’, म्हणून आपली मुलगी आपल्याला बोल लावेल, याची माईंना सतत भीती वाटत असे. पण ममताला आपल्या आईने केलेल्या त्यागाचं मोल ठाऊक आहे. माईंनी उभ्या केलेल्या पसार्‍याचा तिला प्रचंड अभिमान आहे.

माईंची मुलगी ममता

ममताप्रमाणेच आपल्या इतर मुलींनी शिकावं म्हणून माई झटत असतात. ‘स्त्री कधीही हरणार नाही. कारण तिला वेदना म्हणजे काय, ते ठाऊक असतं. विदर्भात इतक्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. पण एकातरी शेतकर्‍याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं आहे ? ती कधीही या जगातून पळ काढणार नाही. कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवते. स्त्रीचं आयुष्य कसं ? मंदिरात ठेवाल तर नंदादीप, मुठीत धराल तर आग. पण तरीही स्त्रीच कायम वेठीस धरली जाते. रमाबाई, पुतळाबाईंपासून ते रूपकंवरपर्यंत असंख्य स्त्रिया सती गेल्या. समाजात आजवर एक तरी ‘सत्या’ झाला आहे का ?’

विलक्षण नाट्यमय आयुष्य जगलेल्या माई  ‘वेदनांची कीव करून त्यांचा पराजय कसा करायचा’, हे असं सहजपणे सांगून जातात. ‘चिखल आणि पाण्याचं जे नातं, ते दु:खाचं माझ्याशी आहे. या चिखलातच, म्हणजे ओल्या मातीतच बीज अंकुरतं. पण असा ओलावा मला कधीच मिळाला नाही. मी खडकावरच रुजले. पण म्हणून माझी मुळं पक्की, चिवट आहेत. मी कधीच मोडून पडणार नाही.’

माईंनी केलेल्या संघर्षाची पावती म्हणून त्यांना आजवर १७२ पुरस्कार मिळाले आहेत. पण ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी बेघर व्हावं लागलं, त्या पिंपरीमधीच्या गावकर्‍यांनी माईंचं कौतुक केलं, आणि त्यांना आश्चर्यच वाटलं. माईंनी छेडलेल्या आंदोलनामुळेच आज गावकर्‍यांना शेणासाठी महिना हजार रुपये तरी मिळतात. आपल्या गावातील एक स्त्रीने देशात नाव काढलंय, याचा त्या गावकर्‍यांना अभिमान आहे. ‘जो गाव माझ्यावर थुंकला, तोच गाव माझ्या नावाने आज जयजयकार करतो. माझं नाव झाल्यावर माझे पतीही माझ्याकडे आले. त्यांना सांभाळणारं कोणीच नव्हतं. मी त्यांना सांगितलं की मी तुमची आई होऊ शकेन, पत्नी मात्र कधीही नाही. पटत असेल तर रहा. माझ्या आश्रमातली मुलं त्यांचा नीट सांभाळ करतात’.

‘हे निखारे मी स्वतःहून पदरात बांधून घेतले आहेत. जिवंत असेपर्यंत मी त्यांची राख होऊ देणार नाही,’ असं म्हणत न थकता माई काम करत असतात. कसल्यातरी विवंचना सतत असतातच. जिंतूरचे एक डॉक्टर गेल्या महिन्यात माईंकडे एका १० वर्षाच्या मुलाला घेऊन आले. या मुलाच्या हृदयात दोष आहे. डॉक्टरांना तो रस्त्यावर भीक मागताना सापडला. त्यांनी त्याला माईंकडे आणून सोडलं. परवा माईंकडे गेलो तेव्हा या लहानग्याला भेटलो. निलेश त्याचं नाव. अतिशय तल्लख. अफाट स्मरणशक्तीचा धनी. आणि तितकाच समजूतदार. योग्य उपचार झाले नाहीत, तर तो फार जगेल असं डॉक्टरांना वाटत नाही. उपचारांसाठी लाख-दोन लाख रुपये कुठून आणायचे, याच चिंतेत आता माई आहेत.

‘मला १७२ पुरस्कार मिळाले. पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही’. म्हणून माई आजही लोकांसमोर पदर पसरतात. चारपैकी एकाच अनाथाश्रमाला सरकारी अनुदान मिळतं. सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना माईंची दमछाक होते. ‘गाना नही तो खाना नही, भाषण नही तो राशन नही’, असं म्हणत, आपल्या मुलांना दोन वेळ जेवायला मिळावं म्हणून त्या महाराष्ट्रभर हिंडत असतात.

माईंनी अनाथ मुलं वाढवली, त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. ‘निराश्रित’, ‘बेवारस’ असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्याची जाण आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं, तेच इतरांनाही मिळावं, म्हणून त्यांची धडपड सुरू असते. ‘देवा, आम्हांला हसायला शिकव. परंतु आम्ही कधी रडलो होतो, याचा विसर पडू देऊ नकोस’, हे माईंनी त्यांना शिकवलं आहे.

माईंच्या पायात अजून चप्पल नाही. कोणी पाच रुपये दिले की आजही त्यांना तितकाच आनंद होतो. माईंची वणवण आजही सुरू आहे. पदर पसरून त्या गात असतात,

निखार्‍यावरी दुर्दैवाच्या, पडली चिमणी पिलं,
कवटाळूनी हृदयासी त्यांना मी आईचं प्रेम दिलं,
सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी,
चार घास मागाया आले, तुमच्या दारामधी

– लेखन : चिनूक्स
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. अतिशय उत्तम लेख…माईंचा पूर्ण जीवनपट उलगडला. किती कठीण प्रसंगांना तोड दिले या माउलीने. भावपूर्ण आदरांजली

  2. अनाथांची माय, “माई” ना “भावपूर्ण श्रद्धांजली” स्वतः अतिशय काबाडकष्ट करून अनाथ मुलांना वाढवलं चांगले संस्कार दिले, त्या अनाथांची आई झाली. देवाने सुद्धा किती परीक्षा घेतली आणि सतत परीक्षा घेतली पण माई सतत उत्तीर्ण होत गेल्या. संकट आणि कष्ट हे त्यांचं रोज च जीवन आहे ,असंच त्यांच्या जीवन जगण्या वरून वाटते कष्ट सोसण्याची किती प्रचंड ताकद त्यांच्यात होती. त्यावेळच्या व्यवस्थेनुसार त्यांनी समाजाला किती धैर्याने तोंड दिले डोंगरा एवढी हिंमत त्यांच्यात दिसून येते माई कडून सर्वांनी हीच प्रेरणा घेऊन आपले जीवन व्यतीत करावे हीच खरी त्यांच्याप्रती श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद

  3. अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सकपाळ यांच्या निधनामुळे त्यांची मुले पुन्हा एकदा अनाथ झाली. स्वतःच्या व स्वतःच्या मुलीच्या पोटा पाण्यांची भ्रान्त असताना हजारो अनाथ मुलांचे पालन पोषण केले. नुसतेच पालन पोषणच केले नाही तर त्यांना शिक्षण दिले. स्वतःच्या पायावर उभे केले. संसार थाटून दिला. मुक्या गायी ची सेवा करत आहेत. त्यांनी चालू केलेल्या कार्याला सलाम. हे परमेश्वरा त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभू दे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹

  4. अनाथांची माय..उत्तम लेख.डोळ्यात पाणी आणणारा!

    माईंची ममतेची ताकद पाहून आपण थक्क होतो.

  5. अनाथांची माय या शीर्षकाखाली ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानिमित्त प्रकाशित केलेला प्रेरणादायी जीवनपट वाचून मन आगळ्यावेगळ्या विश्वात गेला आहे. सिंधुताई व्याख्यान लेखात सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीचा यांच्या मुलीचे छान या यादीत मध्येच मुलीचे छायाचित्र आणि ममता बाल सदन आची पाटील दाखवून आपण फार मोठे काम केले आहे. या छायाचित्रांमुळे या छायाचित्रांमुळे लेखाला चे महत्व फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
    सिंधुताई सपकाळ यांच्या 2-3 कार्यक्रमांना मी प्रत्यक्षात उपस्थित राहिलो आहे .सरोदे परिवारा मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा