भारत सरकारच्या माहिती सेवेतील निवृत्त अधिकारी श्री मधुसूदन आडे यांनी निवृत्तीनंतर ध्यास घेतला आहे, तो दिवंगत राज्यमंत्री डॉ श्रीकांत जिचकार यांनी मिळविलेल्या २८ पदव्यांचा विक्रम मोडण्याचा. आतापर्यंत त्यांनी १३ विषयांमध्ये पदव्युत्तर पदव्या प्राप्त केल्या असून आणखी दोन पदव्या त्यांना लवकरच मिळणार आहे. शासकीय कामकाजामुळे आमची १९९२ साली ओळख झाली आणि पुढे ती मैत्रीत परावर्तित होत गेली.
आज जरी आडे साहेबांनी इतक्या पदव्या प्राप्त केल्या आहेत तरी कुणाला जर असे सांगितले की ते नवव्या व दहाव्या वर्गात, त्यानंतर पदवी परीक्षेत तीनदा नापास झाले होते, तर हे खरे वाटणार नाही. पण पाच वेळा नापास होऊनही खचून न जाता त्यांनी शिक्षण सुरूच ठेवले. वडील रेल्वे विभागात वर्धा येथे नोकरीला असल्यामुळे तेथील यशवंत महाविद्यालयातून तिसऱ्या प्रयत्नात ते बी ए झाले.
आडे साहेब पदवी प्राप्त केल्यानंतर स्पर्धा परीक्षांकडे वळले. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत यशस्वी होऊन ते तिकीट कलेक्टर म्हणून भारतीय रेल्वे मध्ये जानेवारी, १९७८ मध्ये रुजू झाले. ही नोकरी करीत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला. त्यामुळे भारत सरकारच्या पर्यटन खात्यात निवड होऊन रेल्वेतील दोन वर्षांच्या नोकरी नंतर ते मद्रास येथे पर्यटन अधिकारी म्हणून रुजू झाले. पण परत ते स्पर्धा परीक्षा देत राहिले आणि त्याचे फळ म्हणून भारतीय माहिती सेवा ही परीक्षा उत्तीर्ण होऊन भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या महाराष्ट्र कॅडरमध्ये त्यांची निवड झाली. या सेवेत पत्र सूचना कार्यालय (PIB) पुणे येथे ते १९८३ साली माहिती अधिकारी म्हणून रुजू झाले. तिथे ४ वर्षे काम केल्यावर त्यांची बदली नागपूर येथे क्षेत्रीय प्रचार अधिकारी म्हणून झाली. १९९२ ते १९९६ या काळात मुंबई आकाशवाणी केंद्रात ते वृत्त संपादक होते.पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि आकाशवाणी, नागपूर केंद्र येथेही त्यांनी सेवा बजावली आहे. पुढे पदोन्नती मिळून ते नागपूर आकाशवाणी केंद्रातून उपसंचालक (वृत्त विभाग) या पदावरून २०११ साली निवृत्त झाले.
निवृत्तीनंतर गप्प न बसता आडे साहेब आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा समाजातील उपेक्षित घटकांना व्हावा या दृष्टिकोनातून सतत प्रयत्नशील आहेत. आजही आपल्या भारतीय समाजातून अज्ञान, अंधश्रद्धा आणि कुप्रथांचे पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही, त्यामुळे समाजातील सजग नागरिकांनी समाजाच्या भौतिक, आर्थिक विकासाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, मानसिक दृष्ट्या परिपक्व समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे, असे ते म्हणतात आणि केवळ म्हणतच नाही तर, स्वतःही त्या दृष्टीने प्रयत्नशील असतात. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारूनच आपला देश प्रगतीपथावर राहील, असे त्यांना वाटते. समाजाचे प्रबोधन करणाऱ्या विचारांचा अधिकाधिक प्रसार व्हावा या हेतूने ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकार्याचा त्यांचावर मोठा प्रभाव असून त्या दृष्टिकोनातून ते सामाजिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत असतात. पाच वेळा नापास होऊनही आपण सकारात्मक विचार स्वीकारले त्यामुळे मी यशस्वी होऊ शकलो, असे ते अभिमानाने सांगतात.
कौटुंबिकदृष्ट्याही आडे साहेब समाधानी आहेत. पत्नी लता या सेंट्रल रेल्वे स्कूल, भुसावळ येथून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. तर तिन्ही मुले उच्च शिक्षित असून विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्येष्ठ मुलगा मंझिल हा २००९ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत निवडला गेला. त्याची नेमणूक भारतीय तटरक्षक दलात झाली. सेवा कालावधीत त्याला दोनदा बढती मिळाली. २०१५ मध्ये तो डेप्युटी कमांडंट पदावर पदोन्नत झाला. त्याची नियुक्ती सध्या मुरुड जंजिरा, जिल्हा रायगड येथे आहे. एका जहाजाचा, ACHOO के ओव्हेटा तो प्रमुख असून ४० अधिकारी आणि नाविक त्याच्या हाताखाली कार्यरत आहेत.
दुसरा मुलगा साहिल युनियन बँक ऑफ इंडिया, कर्जत शाखेत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तर सर्वात धाकटा मुलगा सफल हा कल्याणमध्ये फेडरल पंप व्यवसाय करीत आहे. हे सर्व योग्य आणि सकारात्मक विचार यामुळे घडू शकले आहे असे आडे साहेबांना वाटते.
प्रत्येक कुटुंबाचा विकास झाला म्हणजे समाजाचा, पर्यायाने देशाचा विकास होत असतो. काळानुसार सामाजिक परिवर्तनवादी विचार सर्वानी स्वीकारले पाहिजेे हा आग्रह धरणारे आडे साहेब, म्हणजे निवृत्तीनंतरचे आपले जीवन कसे समाधानी राहील, त्याच बरोबर समाजाच्या, देशाच्या विकासासाठी ते कसे सहाय्यभूत ठरू शकते, याचा एक उत्तम आदर्श आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि विशेषत: २९ पदव्या प्राप्त करून एक नवा विक्रम प्रस्थापित करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा निश्चितच पूर्ण होवो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
श्री. मधुसूदन आडे यांची शिक्षणाविषयी असलेली तळमळ, पदवी प्राप्त करण्याचे त्यांचे प्रयत्न हे खरोखर त्यांच्या अर्थपूर्ण ज्येष्ठत्वाला आकार देत आहेत. तरुणांनीही यापासून खरं तर प्रेरणा घ्यायला हवी!