थोर शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी, २७ सप्टेंबर १९९२ रोजी निधन झालं आणि एका पर्वाचा अंत झाला.
अनुताईंच्या आजच्या स्मृतिदिनामुळे त्यांच्या सहवासात घालवलेले अमूल्य क्षण मला आज आठवत आहेत. मी तेव्हा दूरदर्शन मध्ये होतो. निर्माते सुधीर पाटणकर यांच्या बरोबर मी सादरीकरण विभागात निर्मिती सहायक म्हणून काम करत होतो. जोडीला काही कार्यक्रमांची निर्मिती आम्हाला करावी लागत असे. त्यातील एक कार्यक्रम होता, “तुफानातील दिवे”. या कार्यक्रमात आम्ही समाजाच्या जडण घडणीत महत्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींवर कार्यक्रम करीत असू.
साधारण १९८८ साल असावे. त्या दरम्यान अनुताई वाघ यांनी लिहिलेले “कोसबाडच्या टेकडीवरून” हे पुस्तक माझ्या वाचनात आले. या पुस्तकाने मी झपाटून गेलो. एका साधारण कुटुंबात १७ मार्च १९१० रोजी अनुताईंचा जन्म झाला. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. पण दुर्दैवाने सहाच महिन्यात त्यांच्या पतीचे निधन झाले. त्या विधवा झाल्या. पण या प्रसंगाला त्यांनी धैर्याने तोंड दिले. आईच्या मैत्रिणीच्या मदतीने त्या अकोल्याच्या राष्ट्रीय शाळेत शिकल्या. इगतपुरीला फायनलच्या परिक्षेत नाशिक जिल्ह्यात प्रथम आल्या. चार वर्ष नाशिकला नोकरी केली. त्यानंतर पुण्याला येऊन त्या हुजूरपागा शाळेत रुजू झाल्या. वडील थकल्यामुळे त्यांच्या भावंडांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. अनुताईनी हुजुरपागेत तेरा वर्ष नोकरी केली.
अनुताई नोकरी करत असतानाच नाईट स्कूल मध्ये शिकून १९३८ मध्ये चांगले गुण मिळवून मॅट्रिक झाल्या. पुढे त्यांनी वयाच्या एकावन्नव्या वर्षी उत्तम गुणांनी पदवीही प्राप्त केली. त्या वेळेस त्यांना मोतीबिंदू झाला होता, दुसरा वाचक घेऊन त्यांनी अभ्यास केला होता.
थोर शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्याशी अनुताईंची १९४५ साली एका शिबिरात गाठ पडली. ताराबाई मोडक यांच्या विचार व कार्यामुळे अनुताई खूपच प्रभावित झाल्या. त्यांनी सर्व सुख सोयी असलेले पुणे सोडले आणि ताराबाईंसमवेत ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे आल्या. तिथे त्यांनी बालवाडी सुरू केली. अनेक अडचणीना तोंड देत त्यांची विकासवाडी उभारी धरू लागली. पण अजूनही आदिवासी यापासून कोसो दूर होते, म्हणून ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ या दोघींनी आपला मुक्काम कोसबाड येथे एका खोपटेवजा घरात हलवला. तिथेच त्यांनी शाळा सुरू केली. त्याला ‘अंगणवाडी’ असे नाव दिले.
“मुलं शाळेत येत नसतील तर शाळेने मुलांपर्यंत गेले पाहिजे” ही अंगणवाडी सुरू करण्यामागची संकल्पना होती. जुन्या नव्याचा समन्वय साधत अनुताईंनी ताराबाई मोडक यांची स्वप्ने सत्यात उतरवली. पारंपारिक चौकटीच्या बाहेर जाऊन आधुनिक पद्धतीने शिक्षणाची क्रांती घडवली. त्यांची आपल्या कामावर अत्यंत निष्ठा होती. या शाळेत त्यांनी मुलांना आंघोळीपासून सर्व स्वच्छता शिकवली.
अनुताईंनी वारली आदिवासींच्या मुलींना शिक्षण दिले. अनुताईंच्या थोर कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार, दलित मित्र पदवी, सावित्रीबाई फुले पुरस्कार, तसेच आंतरराष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हे पुरस्कार मिळाल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मला केवळ एवढ्याचसाठी बरे वाटले की, संस्थेची कामे आता भराभर होतील. बाकी कोणत्याही मानाने हुरळून जायचे माझे वय नाही आणि सेवाव्रती माणसाला कोणत्याही लाभाची व नावाची अपेक्षा नसते.’’ यातून त्यांची सेवाभावीवृतीच ध्वनित होते. ‘शिक्षणपत्रिका’ व ‘सावित्री’ ही मासिके, तसेच ‘बालवाडी कशी चालवावी’, ‘विकासाच्या मार्गावर’, ‘कुरणशाळा’, ‘सहज शिक्षण’ ही पुस्तके यांच्या माध्यमातूनही त्यांनी आपल्या शैक्षणिक विचारांचा प्रसार केला.
अशा या अनुताईंचे ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हे आत्मवृत्त वाचून मी खूपच प्रभावित झालो आणि “तुफानातील दिवे” या कार्यक्रमात आपण अनुताई वाघ यांना बोलावू या, अशी कल्पना पाटणकर साहेबांना सुचवली. त्यांनाही ती कल्पना आवडली.
त्यावेळी माझा एक मित्र किरण कुलकर्णी हा नुकताच नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेतून कोर्स पूर्ण करून मुंबईत करिअर घडवायला आला होता. तो मला भेटायला दूरदर्शनमध्ये आला असता, त्याला मी “कोसबाडच्या टेकडीवरून” हे पुस्तक वाचायला दिले आणि या कार्यक्रमासाठी पटकथा लिहायचं सुचविलं. पुस्तक वाचून झाल्यावर किरण ने सुचविले की आपण एकदा समक्ष कोसबाड येथे जाऊन तेथील वातावरण, कार्य प्रत्यक्ष पाहून येऊ या. म्हणजेच टिव्ही च्या भाषेत “लोकेशन सर्वे” करून या. त्या प्रमाणे आम्ही दोघेही कोसबाड ला गेलो. दोन दिवस राहून तेथील सर्व कामकाज, अंगणवाड्या, तिथे येणारी आदिवासी मुलं, त्यांच्यासाठी बनविला जाणारा खाऊ, अनुताईंशी सततची चर्चा अशात दोन दिवस निघून गेले. अर्थात आम्ही त्याच वेळी चित्रीकरणाच्या तारखा निश्चित करून आलो.
पुस्तक वाचून आणि तेथील प्रत्यक्ष कार्य पाहून किरण ने सुंदर शूटिंग स्क्रिप्ट तयार करून दिले. ठरलेल्या तारखांना पाटणकर साहेब, मुलाखतकार अशोक चिटणीस सर, मी, किरण कुलकर्णी, आमचा कॅमेरामन, साऊंड इंजिनियर, त्याचा सहायक आणि वाहन चालक अशी ७/८ जणांची टीम तिथे पोहोचली.
खरं म्हणजे, अशा दुर्गम भागात चित्रीकरण असूनही, जेवण साधेसुधे, राहण्याची व्यवस्था ही साधीसुधी असून देखील तेथील सात्विक वातावरणामुळे सर्व चित्रीकरण पथकाने जीवतोड मेहनत घेतली. दुर्गम भाग असल्याने कितीतरी अंतर पायी चालून जावे लागे. सर्व चित्रीकरण साहित्य घेऊन डोंगरदऱ्या चढाव्या, उतराव्या लागत. पण सर्व जण आनंदाने काम करत राहिले.
अनुताई वाघ एव्हढ्या थोर समाजसेवक असून ही मिश्किल स्वभावाच्या होत्या. गुडघ्याच्या त्रासामुळे त्यांना गाडीतून चटकन उतरता येत नसे किंवा बसता येत नसे. अशा वेळी त्या मला हाक मारून म्हणत, “अहो भुजबळ, तुमच्या बळाचा वापर, जरा माझ्यासाठी करा बरं” असे म्हणताच मी चटकन पुढे हात देऊन त्यांना गाडीतून उतरवून घेत असे. मग एक हात माझ्या खांद्यावर ठेवून त्या तशाच चित्रीकरण स्थळी पोहोचत असत. अशा प्रकारे चार दिवस चित्रीकरण पूर्ण करून आम्ही परतलो.
पुढे या कार्यक्रमाचे संकलन होऊन ४० मिनिटांचा कार्यक्रम तयार झाला. नियोजित वेळी तो दूरदर्शन वर प्रसारित करण्यात आला आणि काय आश्चर्य, साठाव्या वर्षी विधवा झालेल्या एका महिला प्रेक्षकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर २५ हजार रुपयांचा धनादेश अनुताई वाघ यांच्या संस्थेसाठी म्हणून चिटणीस सरांकडे नेऊन दिला. पुढे तो त्यांनी त्यावेळचे दूरदर्शन चे संचालक यांच्या हवाली करून अनुताई यांच्याकडे पोचता केला गेला.
त्यावेळी मधुवंती सप्रे या लोकसत्तासाठी “दर्शनरंग” हे दूरदर्शनाच्या कार्यक्रमावर आधारीत साप्ताहिक कॉलम लिहीत असत. हा कार्यक्रम पाहून त्या इतक्या भारावून गेल्या की, लोकसत्ता च्या १४ मे च्या अंकात दर्शनरंग मध्ये ‘आजच्या काळातल्या संत अनुताई वाघ’ असा ठळक मथळा देऊन त्यांनी या कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
स्वतःचे व्यक्तिगत दुःख विसरून, त्याचा अजिबात बाऊ न करता अनुताईंनी जे महान कार्य केले त्याचेच फळ म्हणजे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या अंगणवाडी संकल्पनेनुसार आज गावोगावी अंगणवाडी शाळा सुरू केल्या आहेत. हजारो अंगणवाडी सेविका लाखो मुलांचे भवितव्य घडविण्यात मोलाचे योगदान देत आहेत.
“मुलं शाळेत येत नसतील तर, शाळेने मुलांपर्यंत गेले पाहिजे” या अनुताईंच्या संकल्पनेला आज मूर्त रूप प्राप्त झाले आहे.
अशा या महान विभुतीचे २७ सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले. केवळ लाखो बालकांचे नव्हें तर माझे ही जीवन समृध्द करणाऱ्या अनुताईंना विनम्र अभिवादन.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अनुताई वाघ म्हणजे बालशिक्षणातील जणू वाघिणच होत्या.
गोविंद पाटील जळगाव.