जळगाव जिल्ह्य़ातील धामणगाव येथील सौ. प्रभावती पाटील या त्यांच्या “माय माती फाउंडेशन” मार्फत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवित असतात.
माय माती फाउंडेशन आणि गंमत जोडशब्दांची रीडिंग अँड लर्निंग सेंटर, धामणगाव यानी नुकतीच पुस्तक मैत्री ही अनोखी भेट घडवून आणली.पुस्तक मैत्रीच्या निमित्ताने सर्व पालक आणि ग्रामस्थांसाठी “जिवंत पुस्तकालय” म्हणजे नक्की काय, याचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा म्हणून केलेला हा एक प्रयोग होता.
“पुस्तकांशी मैत्री करू या” या कॉर्नरवरून ही सहल सुरू झाली. इथे विचार करायला लावणारे विविध विषय घेऊन उभे ठाकलेले पुस्तक मित्रांपैकी एकाची निवड करणे हे सर्वांसाठीच खरोखर कठीण झालं होतं. तर काही पालकांनी सर्वच पुस्तकांना मित्र केलं.

या प्रवासातील पुढील कॉर्नर “बालपणीची गोष्ट. ”यात प्रवेश केल्याबरोबर सगळ्यांना आपलं बालपण आठवलं.
कोणाला गल्लीतील पाय तुटलेले बाबा आम्हा सगळ्या मुलांना गोष्ट सांगायचे हे आठवलं, तर कुणाला आमच्या शेजारच्या काकू छान गोष्टी सांगायच्या हे आठवलं.
तर चक्क ७५ वर्षांच्या आजींना “मला कोणीच गोष्ट सांगत नव्हतं” याचं दुःखही झालं.

या सहलीतील पुढील कॉर्नर म्हणजेच “आपलं मूल कट्ट्यात काय शिकतं?”
वाचायला, विचार करायला, प्रश्न विचारायला, आपलं मत मांडायला, ऐकायला, आयुष्याच्या चित्रात रंग भरायला आणि बरंच काही …….
या सहलीतील शेवटचा कॉर्नर “नात्यांची उब” साहित्याद्वारे नात्यांची वीण कशी घट्ट होत जाते, हे सांगणाऱ्या पात्रांची ओळख मुलांनी आपल्या पालकांना करून दिली.
अशा विविध कॉर्नरच्या माध्यमातून पुस्तकातील आणि गोष्टीतील पात्रांसोबत पालकांचा भन्नाट प्रवास झाला.आणि हा प्रवास घडवून आणणारे होते आपले छोटे मित्र. आपल्या बोलीभाषेतून, प्रत्येकाच्या वेगळ्या शैलीतून, प्रत्येक पात्र जिवंत करत या छोट्या बालमित्रांनी पुस्तकालयातील आपल्या जगाची सुंदर ओळख पालकांना करून दिली.

या कार्यक्रमाच्या साक्षीदार झालेल्या आपल्या प्रमुख पाहुण्या सविता भोळे यांनी मुलांना “अभ्यास कसा करावा” याबाबत मार्गदर्शन करून “आपल्या मुलांसोबत आपले नाते कसे असावे” या विषयावर पालकांशी संवाद साधला.
असे हे उपक्रम ठिकठिकाणी होत राहण्याची नितांत गरज आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
