“पाणिनी” या ऑनलाइन मासिकांत प्रकाशित झालेली “अनोखी वटपौर्णिमा” ही विनोदी शैलीतील पण अंतर्मुख करणारी कथा लेखिका लीना फाटक यांच्या इच्छेनुसार आणि पाणिनीच्या सौजन्याने आपल्यासाठी येथे सादर करीत आहे.
– संपादक
कालनिर्णयकडे लक्ष गेले आणि लक्षात आले की वटपौर्णिमा नुकतीच होऊन गेलीय.
मला माझी मैत्रीण सरला व तिचे यजमान शशीकांत यांची आठवण झाली. ते दोघं व आम्ही दोघं, आमची खुप छान जवळची मैत्री झाली आहे. त्यां दोघांचा स्वभाव हंसरा, बोलका, मनमोकळा. आमच्यात खांण्या-पिण्यांसकट बऱ्याच आवडी-निवडी, विचांरात साधर्म्य. वयानी पण समवयस्क. त्यामुळे हसत खेळत, एकमेकांना चिडवत आमच्या गप्पा खुप रंगतात.
माझ्या मिस्टरांचा, प्रभाकरांचा उत्स्फुर्तपणे शब्दकोट्यां करण्यांत हांतखंडा. त्यामुळे सगळ्यांची हंसुन हंसुन पुरेवाट होते. शिवाय सरलाची व माझी जुनी ओळख. त्यामुळे मैत्रीत एक वेगळीच आपुलकी आहे. ते आमच्याजवळच, म्हणजे १५/२० मैलावरच राहात असल्याने आमचे एकमेकांकडे खुप जाणे-येणे सुरू असते.
एकदा त्यांच्या आग्रहाच्या बोलवण्याप्रमाणे, ठरल्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे गेलो. गेल्यांवर नेहेमीप्रमाणे तोंडभरून हंसत स्वागत झाले नाही. नाहीतर ५/१० मिनीट उशीर झालेला असला तरी “अग, के~वढा उशीर केलांत” अशी सरलाची प्रेमळ तक्रार असायची. आजच बोलवलं होतं ना ? असा मला प्रश्न पडला. पण घरभर मसाला वांग्याच्या भाजीचा मस्त घमघमाट दरवळला होता. सरला स्वयंपाकांत सुग्रण. फोनवर याच भाजीची कृती मी नुकतीच विचारल्यांने, तिनी माझी आवडती भाजी केल्याचा मला आनंदच झाला. कोट, शुज काढुन “काही मदत हवी आहे का ?” असं विचारत मी तिच्यामागे स्वयंपाक घरांत गेले.
माझे लक्ष सरलानी मांडलेल्या वटपौर्णिमेच्या पुजेकडे गेले. परदेशांत वड ? मला आश्चर्यच वाटले. कुतुहलानी नीट निरखून पाहील्यावर लक्षांत आले की सरलानी तिच्यांच बागेतल्यां वडासारख्यां दिसणाऱ्या ३/४ छोट्या फांद्या फुलदाणीत ठेवून, त्याला फुलांचा हार, सुतांची माळ बांधुन वडासारखा सजवून त्याची सुंदर पुजा केली होती.मला तिच्या कल्पकतेचे व श्रद्धेचे कौतुक वाटले.
वटपौर्णिमेचा विषय आधी कधी बोलण्यांत आलाच नव्हता. त्यामुळे मला हा अनुभव नविन होता. सरलाला जेवणाचे टेबल लावायला मदत करत मी तिला विचारले “सरला, तु दरवर्षी वटपौर्णिमेची पुजा करतेस का ?” “हो, अग, सासुबाईंनी लग्न झाल्यावर सांगीतले होतं, म्हणून आता ती सवयच झालीय ना, म्हणून करते ग ही पुजा”, सरलानी उत्तर दिले. पण तिची पुजेच्या बाबतीतली नाखुशी मला जाणवली. “पण खरं सांगू का कुंदे ?,” सरलानी पुढे म्हटले, “का~ही अर्थच वाटत नाही या पुजेत. उलट त्या देवाचा ना रागच येतो. स्वभाव, आवडी-निवडी, विचार, सगळं सगळं पुर्णपणे विरूद्ध असलेल्या दोघांच्याच, तो देव, नवरा-बायको म्हणून जोड्या जमवतो आणि देतो भांडणं लावून त्यांच्यात, आणि स्वर्गांतून, वरती, मस्त मजा बघत बसतो. असा राग येतो की नाही त्या देवाचा.” सरला खुप तावातावांनी बोलत होती.
वातावरण नेहेमीसारखं खेळीमेळीच नव्हते हे लक्षांत आले होतेच “हा सगळा नवऱ्यावरचा राग देवावर निघतोय बहुतेक” मी मनाशी म्हणाले. शशीकांत तिथेच त्यांच्या व प्रभाकरांच्या ग्लांसांत त्यांचे ‘आवडीचे पेय’ भरत होते. कांहीतरी बिनसल्यांचे त्यांच्या पण चेहेऱ्यांवर दिसतच होते. सरलाचे बोलणे एैकल्यावर त्यांना पण राग अनावर झाला. “अगदी खरं आहे,” शशीकांतांनी आपली बाजू मांडायला सुरूवात केली. माझ्याकडे बघत, हातवारे करत ते म्हणाले “हे, हे, हेच ते, कुंदा, ही तुझी मैत्रीण, मला इतकी छळत असते की बस्, आम्ही दोघांनीही ठरवुन टांकलय” त्यांच्या रागांचा चढलेला पारा प्रत्येक शब्दातून जाणवत होता. ताण कमी करण्यांसाठी मी हंसत हंसत, “काय ठरवलय ?” विचारले. “पुढच्या जन्मी आम्हीच दोघांनी एकमेकांशी लग्न करायचं. पण मी बायको होणारं आणि सरलाला ती मला आत्ता जश्शी छळतीय ना अगदी तस्सच तिला छळणार”. प्रत्येक शब्दांवर जोर देत शशीकांत म्हणाले. “हो, आणि मी सुद्धा नवरा होऊन ते मला जस्सा त्रास देतात तस्सांच त्रास मी त्यांना देणार”. आपल्या पुढच्या जन्माचा बेत सरलानी पण आम्हांला सांगुन टाकला. ‘म्हणजे, ही कालची पुजा एवढ्यासांठीच होती की काय, मग, दोघांनी केली असणार’ माझ्यांच या गंमतशीर विचारांनी येणारं हंसू मी कसंतरी आवरलं.
सरलाची तक्रार पुढे चालुच होती. “कामांवरून ते आले की झालं, त्यां टी.व्ही. च्या खोक्यापुढे बसायचं आणि”, शशीकांतांची नक्कल करत ती म्हणाली, “मस्तपैकी खांयला कर, चहा कर, पाणी दे ना, अशा नुसत्यां ऑरडर्स सोडायच्या. शिवाय काम करून दमल्यांचे कौतुक, जसकांही तेच एकटे काम करतात. बाकीचे लोक बघा, लाईफ कसं मस्त एन्जॉय करतात.” सरलाच्या रागांचा पारा उफाळून आला होता. तिची तक्रार सुरूच होती. “मी मात्र घरातली, बाहेरची, सग्गळी कामे करायची. शिवाय ह्यांची तैनात संभाळायची. ह्यांना ना कसली म्हणजे कसलीच आवड नाही. ना नाटक, सिनेमा, ना गाण्याचे कार्यक्रम, कांहीच आवडत नाही. प्रवासाची तर अज्जिबातच आवड नाही. काल मी ह्यांना म्हणाले, ह्या सुट्टीत आपण इटलीला जाऊया का ? तिथली हिस्टरी, कल्चर खुप पहाण्यांसारखे आहे. तर म्हणाले, इथल्यासारख्यांच दगड, विटांच्या इमारती तिथे, त्यांत काय पहायच ?”
हे एैकुन मात्र, शशीकांतांची अरसिकता पाहून, मनांतल्या मनांत मी कपाळालाच हात लावला. हे एैकल्यावर शशीकांत गप्प कसे बसणार, चिडून ते म्हणाले “हांच, हांच आमच्यांतला फरक. सरलाच्या सारख्या हज्जार मागण्यां सुरू असतात. अमक्यांसारखे हे नाहीतर ते घेऊया म्हणत असते. गेल्याच वर्षी ऑस्ट्रीयाला गेलो होतो. आता इटलीचे टुमणे लावलय. पैसे काय झाडाला लागतात का ?”. हे एैकल्यावर मात्र तणावाचे कारण कळले.
प्रभाकरांनी व मी एकमेकांकडे पाहीलं. माझे विचार त्यांना समजले. नवरा-बायकोतलं हे चहाच्या कपांतले वादळ शांत कसे करावे हा प्रश्न मला पडला. सरलानी पुढच्या जन्मांत दोघांनी विरूद्ध भुमिका करून, ह्या जन्माचे उट्टे, पुढच्या जन्मात एकमेकांवर कांढायचे परंत एकदा जाहीर करताच माझा प्रश्न सुटला. हंसत मी सरलाला म्हणाले “जपुन बोल हं सरला, तुला माहिती आहे, जमाना, समाज बदलतोय. आजकालच्या तरूण पिढीतले नवरे बघ, कित्तीतरी घरातली कामे करतात, लहान मुलांच्या नॅपीज् बदलण्यापांसुन सग्गळ काही करतात. ते काही आपल्या पिढीतल्या नवऱ्यांसारखे नाहीत.” मी मुद्दाम प्रभाकरांकडे बघत म्हणाले. सरलानी तिच्या आजुबाजुच्या तरूण पिढीत शोध घेतला असावा. “खरंय ग बाई” म्हणत मांझ्याशी ती सहमत झाली. “हो ना, मग,पुढच्या जन्मांत तु नवरा होईपर्यंत सगळे पारडेच उलटे झाले असेल. आणि नवरा म्हणून तु हे सगळं परत करत बसशील हं”, ताण कमी व्हावा म्हणून मी हंसत, हंसत सरलाला सावध केले. त्यांतला नर्म विनोद दोघांच्या लक्षांत आला व दोघेहि हंसले.
तणाव थोडा सैल झाल्यासारखे वाटले. इतक्यावेळ प्रभाकर शांतपणे सगळ एैकत होतै. उत्स्फुर्तपणे आमच्या दोघींकडे बघत ते म्हणाले “पुढच्या जन्मी तुम्हांला आम्ही नवरे म्हणून नको असेल तर त्या वडाला उलट्या प्रदक्षिणा घाला आणि हा नवरा पुढच्या जन्मी मला अज्जिबात नक्को अशी प्रार्थना करा. म्हणजे झालं, सोप्पं आहे”. हे एैकल्यावर मात्र दोघेहि खुप मनांपांसुन हंसले. वातावरण बरेचसे निवळलं.
मग सरलानी माझ्यांकडेच मोर्चा वळवला. “कुंदा, तु करत नाहीस का ग ही पुजा”? मला विचारले. “छे ग बाई, तुला नाहीत नाही, लग्नांत सप्तपदीच्या वेळेसच प्रभाकरांनी मला सांगीतले आहे की हा आपला सातवा म्हणजे शेवटचा जन्म आहे. मग मी कशाला पुजा करू ?” माझे हे उत्तर शशीकांतांना आवडले. ते मोठ्यांदा हंसले. सरलाचा पण राग पुर्ण उतरला होता. सहानुभुतीने तिनी मला विचारले “त्यावेळेस तुला खुप वाईट वाटले असेल नाही का ?” माझे उत्तर तयार होतंच. “अग सरला, मोठ्या तोऱ्यांत, ‘फारच उत्तम, मला आनंदच आहे’ असं मी प्रभाकरांना सांगीतले होतं. पण खरं सांगू का, मनातून खुप वाईट वाटले होते. आपण मुली, स्वत:च्या लग्नात किती हळुवार, भावनाविवश झालेल्या असतो नाही का ? त्यांत भरीला ह्यांनी असं म्हटल्यावर नाही कां ग वाईट वाटणार मला !” मुद्दाम अतिशयोक्ती करत मी सांगीतले.
इकडे, हे दोन्ही नवरे, एकमेकांकडे बघत ‘झालं, या दोघींचे भावनांचं तुणतुण सुरू झालय’ असं म्हणत व्हाॅयोलीन वाजवल्यांसारखे हातवारे करत होते. त्यांच्याकडे पुर्ण दुर्लक्ष करत मी सरलाला म्हणाले, “त्याचवेळी मी ठरवलं बर का सरला, “आधी, मी गंमत करतीय हे दर्शवण्यासाठी प्रभाकरांकडे डोळे मिचकवत पाहिले. हो, नाहीतर घरी गेल्यांवर आमच्याकडे ताणतणाव सुरू व्हायचा ! “काय बाई तु एवढे ठरवलस?” सरलानी उत्सुकतेने विचारले. “मी ठरवलय की प्रभाकरांशी इतकं~ चांगल वागायचं की- “माझे वाक्य पुर्ण व्हायच्या आधीच” तु तर नेहेमी चांगलीच वागतेस सगळ्यांशी, तुला ठरवायलाच नको” असं शशीकांत म्हणाले. त्यांना एकीकडे थॅंक्यु म्हणत, ‘बघा, शशीकांतांना तरी माझे कौतुक वाटतय, नाहीतर तुम्ही’ असं प्रभाकरांना नजरेनीच दर्शवले. “अग, पण तु काय ग एवढे ठरवलेस” सरलानी शिगेला पोचलेल्या उत्सुकतेने विचारलं. “मी ह्यांच्याशी इतकं चांगलं वागायचं ठरवलय की काही वर्षांनी प्रभाकरांनांच वटपौर्णिमेची पुजा करावी, वडाला प्रदक्षिणा घालाव्या, आणि, (प्रभाकरांची नक्कल करत), ‘देवा, पुढच्या जन्मी मला माझी कुंदाच बायको म्हणून मिळु दे’ अशी प्रार्थना कराविशी वाटल पाहिजे”. झांल, मग काय, सगळेच खुप हंसले. अगदी प्रभाकरांसकट हं. सरला तर एवढी खुश झाली, “अग, काय मस्त कल्पना आहे ही ‘अनोख्या वटपौर्णिमेची'” असं म्हणत तिनी मला जोरदार टाळी दिली.
सगळा ताण पुर्ण निघुन गेला होता. मी सरलाकडे बघीतलं तर ती शशीकांतच ‘अनोखी वटपौर्णिमेची ‘ पुजा करत आहेत या कल्पनेत खुप सुखावलेली दिसली.
डायनिंग टेबलावर, दोन तांस, हांत वाळेपर्यंत, हंसत, गप्पां मारत सरलाच्या सुग्रास स्वयंपाकाचा आम्ही मनसोक्त आस्वाद घेतला. नंतर आम्ही सगळ्यांनी मिंळून झांक-पाक, आवराआवरी केली. आणि बैठकीच्या खोलीत सोफ्यावर निचिंतपणे बसलो होतो. शशीकांतांनी लावलेल्या सरलाच्या आवडीच्या हरिप्रसाद चौरसियांची बांसरी मंद आवाजांत रिझवत होती. क्षणभर मी पण डोळे मिटले. तेवढ्यात, “सरला,” शशीकांत म्हणत होते. मी पटकन् सांवरून बसले. हंसत, तिच्यां डोळ्यांत बघत, “आज तु माझ्यावर खुप रागावली होतीस पण स्वयंपाक मस्त झाला होता हं”. सरलानी पण हंसत, नुसतंच “हं ~” म्हणत त्यांच्या खांद्यावर डोके ठेवले.
माझ्यातली ‘सायकाॅलाॅजीस्ट’ जागी झाली. प्रभाकरांच लक्ष होतंच. ड्रिंक्स घेतल्याने कारच्या किल्या मला देत “कुंदा, चल, निघुया ?” प्रभाकर म्हणाले. मी पण “हो, उशीर होईल” म्हणत, दोघंही पटकन उठून निघालोसुद्धा. नेहमीप्रमाणे, “सांवकाश कार चालव, पोचल्यावर फोन कर” अशा प्रेमळ सूचना देत दोघे दारापर्यंत आले. सरलानी एकदम माझ्यां गळ्यांत हांत टाकून खांद्यावर डोकं टेकून नि:स्तब्ध उभी राहिली. तिची ती गळांमिठी खुपस् ‘शब्दांच्या पलीकडले’ सांगून गेली. मी हलकेच तिच्यां खांद्यावर थोपटले. कार सुरू करणार इतक्यांत, “तु अशी पुजा केली असतीस ना तर मी पण तुझ्याबरोबर ही पुजा केली असती कुंदा”. प्रभाकर म्हणाले. मनांत आले, केवढी जाणीव आहे ह्यांना. प्रेमाने त्यांच्याकडे बघत, “हो, माझी खात्री आहे” असे म्हणून आम्ही निघालो. मलाहि आता घरी पोचायची ‘घाई’ झाली होती.
– लेखन : सौ. लीना फाटक, वॉरिंगटन, इंग्लंड.
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800