‘V4 आर्गन फाउंडेशन आणि स्वामी संस्था परेल’ यांच्या संयुक्त विद्यमाने देहदान आणि अवयवदान चळवळीत सहकार्य करणारे व प्रत्यक्ष सहभागी असणारे शवागार कर्मचारी, डॉक्टर्स, रोटो सोटो प्रतिनिधींना राखी बांधून ‘रक्षाबंधन सण’ साजरा करण्यात आला. प्रत्यक्ष भेटून त्यांना राखी बांधून पेढे भरवून कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी रोटो सोटोचा सर्व स्टाफ, के ई एम मुंबई येथील शवागार कर्मचारी, अॅनाटॉमी विभागातील कर्मचारी, तंत्रज्ञ, डॉक्टर्स उपस्थित होते. या विभागाचे प्रमुख डॉ. खुशाले यांनी या वेगळ्या रक्षाबंधन उपक्रमाचे कौतुक करून धन्यवाद दिले व यापुढेही अवयवदान प्रबोधन करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या संस्थाना मदत करण्याचे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे के ई एम रुग्णालयाचे प्रमुख अधिष्ठाता, उप अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर पालिकेचे उपायुक्त सुधाकर शिंदे यांनाही राखी बांधून धन्यवाद दिले व त्यांनीही महा पालिकेतर्फे अवयवदान चळवळीस संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
केईएमचे मिलिंद, बंडू पवार, मसिनाचे डॉ. पांडे, नायरचे शवागार कर्मचारी, अनॉटोमी प्रमुख डॉ. भोसले यांच्यासह बच्चू अली रुग्णालयात नेत्र पेढीतील कर्मचारी, त्वचा दानासाठी सहकार्य करणाऱ्या मसिना रुग्णालय कर्मचारी, डॉक्टर्स, नायर रुग्णालयातील शवागार कर्मचारी यांनाही राखी बांधून, त्यांच्याशी संवाद साधत भावना व्यक्त केल्या. अशी दखल आजपर्यंत कुणीही घेतली नाही असे म्हणत कृतज्ञतेबद्दल त्यांनीही आनंद व्यक्त केला.

कल्याण येथील दिवगंत किशोर मेहता यांच्या कन्या श्रीमती श्रीदेवी मेहता परिवाराने त्यांच्या वडिलांनी वीस वर्षांपूर्वी व्यक्त केलेली देहदानाची इच्छा V4 ORGAN FOUNDATION च्या सहकायाने पूर्ण केली. त्यांनीही शवागार कर्मचाऱ्यांना राखी बांधून धन्यवाद दिले.
बंगलोरहून आलेल्या नातीला या दुःखद क्षणी राखी बांधून हा अनोखा देह दानाचा सोहळा साजरा केला.
या अनोख्या हृद्यस्पर्शी रक्षाबंधनात व्ही फॉर ऑर्गन फाऊंडेशनचे व स्वामी संस्था परेलचे कार्यकर्ते, गुणवंत कामगार हिरेश चौधरी व दिलीप सावंत यांच्यासह जेष्ठ नागरिक अजय सुर्वे सहभागी झाले होते. रोटो सोटो स्टाफने त्यांनाही राख्या बांधून प्रतिसाद दिला .
अवयव दानाची ही चळवळ समाजापर्यंत पोहोचावी रुजावी, या चळवळीला बळ मिळावे यासाठी अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला होता. 24X7 सेवा मार्गदशन मदत व प्रशिक्षण मिळण्यासाठी ९८२००७८२७३ या नंबर वर संपर्फ साधण्याचे आवाहन संस्था प्रमुख श्री आपटे काका व मोहन कटारे यांनी केले आहे.

— लेखन : रवींद्र मालुसरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800