लक्ष्मी पूजनच्या निमित्ताने काही किरकोळ खरेदी साठी, आम्ही मित्र म्हणजे, नितीन, प्रशांत (बाळू) आणि मी गावांत गेलो होतो. आता ही आम्हा नाशिककर मंडळीची बोलायची खास स्टाईल, गावांत म्हणजे, शालिमार, मेनरोड, शिवाजी रोड, एम जी रोडला गेलो म्हणजे गांवात गेलो. भद्रकाली, कथडा, तिवंधा वगैरे म्हणजे जुने नाशिक.
तर आम्ही शालिमार ला पथीक हॉटेल जवळ एका सलून समोर गाडी लावली, गाडीत मी, नितीन बसून होतो. बाळू मिक्सर चे भांडे रिपेरिंग साठी गेला. ज्या सलून समोर आम्ही गाडी लावली ते मालक लगेच धावत आले, गाडी काढा, गाडी काढा करू लागले. मग आम्ही दोन मिनटात गाडी काढतो वगैरे त्यांना बोललो. वास्तविक दोन मिनटात कोणीही कधीच गाडी काढत नसल्याचा सलून मालकांना अनुभव असल्यामुळे ते अंमळ थोडं वैतागले होते. तर बाळू गेला, गाडीत बसल्या बसल्या माझीच नजर अचानक सलूनमध्ये लावलेल्या फोटो कडे गेली. मी नितीन ला म्हणालो, फोटोत बघ साक्षात कुसुमाग्रज आहेत. हे ऐकताच नितीन सरसावून बसला. त्याने त्या सलून च्या मालकांना गाडीतूनच हाक मारून बोलावून घेतलं. त्यांना त्या फोटो बद्दल विचारलं की, कुसुमाग्रज यांच्या बरोबर आपला फोटो कसा ?. इतक्या वेळ आमच्या वर वैतागलेल्या सलून मालकाची कळी एकदम खुलली. ते उत्साहाने सांगू लागले. पुढचं मी सांगतोच, पण मोठया माणसात राहिले की त्यांच्या मोठेपणा चे काही अंश आपल्यात ही येतात ह्याची आम्हाला प्रचिती आली.
सलून मालकांचे पुर्ण नाव श्री रमेश नारायण जाधव. जाधव आम्हाला उत्साहात सांगू लागले की, कुसुमाग्रज आणि त्यांची इतकी घट्ट मैत्री होती की ते रोज सकाळी सहा वाजता बरोबर फिरायला जायचे, त्यांना रोजचा डबा जाधवांच्या घरून जायचा.
कुसुमाग्रज रमेश काकांचा शब्द सहसा टाळत नसत. शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे एकदा नाशिक ला सह कुटुंब आले होते. त्यावेळी त्यांची आणि कुसुमाग्रज ह्यांची भेट रमेशजी यांनीच घालून दिली. वर भेट होईपर्यंत स्वतः जातीने तिथे थांबून काय हवे नको ते बघितले, एवढेच काय कुसुमाग्रज यांच्या सांगण्यावरून सर्वांना पेढे देखील तिथे वाटले.

विचार करा साक्षात सरस्वती ज्या कुसुमाग्रज यांच्या लेखणी मधून प्रकट होते त्या शब्दांच्या जादूगाराबरोबर मैत्री असणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. रमेश जाधव काका, नुसते सलून चालवत नाही तर ते एक सांस्कृतिक वारसा जपत आहेत. नाशिक मधील पंधरा एक संस्थाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. ते तरुणपणी रिक्षा चालवायचे. आदर्श रिक्षा चालक म्हणून त्यांना साक्षात अभिनय सम्राट दिलीप कुमार यांनी पुरस्कार प्रदान करून गौरवलं आहे. त्या प्रसंगाचा फोटो त्यांनी आम्हाला मोठया अभिमानाने दाखवला. थोरा मोठया बरोबर राहून त्यांचे विचार ही प्रगल्भ झाले आहेत. त्यांनी आपल्या शर्ट च्या खिशातून एक कार्ड काढून दाखवलं. त्यांनी मरणोत्तर देहदान करायचा संकल्प केला आहे. त्या कार्ड वर त्यांनी आपली अंतिम इच्छा लिहिली आहे की, “त्यांच्या मृत्यू नंतर, कुठलेही धार्मिक विधी करू नये, कुठलाही अनाठाई खर्च करू नये. उलट ते सर्व पैसे रिमांड होम मधील लहान बालकांसाठी दान द्यावे.”! केवढं मोठं काळीज लागतं ह्या गोष्टी ला. कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, ह्यांच्या सलूनमध्ये यायचे. केवढी भाग्याची गोष्ट !
रमेशकाका ह्या वयात ही पुर्ण देश भर शिक्षणाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी कार्यरत आहेत. श्रीनगर जवळ जवळ दीड महिना राहून त्यांनी तेथील विद्यार्थी मित्रांना शिक्षण, त्याचं त्यांच्या आयुष्यातील महत्व त्यांना पटवून दिलं. पुन्हा हे सगळं निस्वार्थी भावनेने.

२७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस जो आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो, रमेश काका स्वतः पदरमोड करून कुणाचीही मदत न घेता कविश्रेष्ठ यांचा वाढदिवस दर वर्षी न चुकता साजरा करतात. इतकी अनन्यसाधारण भक्ती आणि प्रेम त्यांच्यावर करतात. सगळं ऐकून इतक्या वेळ आम्ही गाडीत बसून त्यांच्याशी बोलत होतो, ते चटकन दोघेही उतरलो.इतक्यात बाळू पण त्याचे काम करून आला. आम्ही तिघेही सलून मध्ये गेलो. ते नको नको म्हणत असताना त्यांना वाकून नमस्कार केला, त्यांच्या बरोबर फोटो पण काढला. बोलता बोलता ते त्यांच्या आयुष्यात असलेल्या कठीण प्रसंगाना कसे हसत हसत सामोरे जातात हे ही त्यांनी सांगितलं.
आज पन्नास वर्षा पेक्षा जुने त्यांचे सलून आहे, नाशिक मधील मोठे मोठे डॉक्टर, नाशिक दौऱ्यावर आलेली नट मंडळी आवर्जून त्यांच्या दुकानात दाढी कटिंग साठी येतात हे त्यांनी मोठया अभिमानाने सांगितलं.
आज नकळत एक सांस्कृतिक खजिना आमच्या हाती गवसला, हा जपला पाहिजे.
लेखाचा शेवट कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ ह्या कवितेने करतो, कारण ती इथे मला समर्पक वाटली
*कणा*
ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहणी आली गेली घरटात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळया हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे
खिश्याकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!
– कुसुमाग्रज

— लेखन : दीपक ठाकूर. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
