काही ना काही कारणांमुळे घर सोडून आलेल्या मुलांचे समुपदेशन करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्याचे महान कार्य ठाणे येथील समतोल फौंडेशन ही संस्था करीत असते.
विशेष म्हणजे घर सोडून आलेल्या मुलांमध्ये उद्योगपती, डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी अशा घरातील मुले देखील असतात.
घर सोडून आलेली ही मुलं सहजासहजी घरी जायला तयार नसतात. यासाठी त्यांचे यथायोग्य मत परिवर्तन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे संस्थेने
“मनपरिवर्तन केंद्र” सुरू केले आहे.
या मनपरिवर्तन केंद्रात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातात. कालच येथे “लक्ष्मीपूजन” अनोख्या पद्धतीने करण्यात आले.
प्रथमतः कल्याण तालुक्यातील म्हसरूंडी येथील अदिवासी बांधवांना नमस्कार करून तेथील 8 ते 16 वयोगटातील त्या पाड्यातील सर्व मुले एकत्र करण्यात आली. नंतर त्यांना स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रात आणल्या गेले. सर्वांना समतोल च्या मुलांनीच शिलाई केलेले नवीन पँट आणि शर्ट घालायला दिले. हे नवे कपडे घातलेली सर्व मुले एकदम फुलपाखरे असल्यासारखी दिसत होती. अशा प्रकारे कपडे शिलाईने समतोलच्या मुलांनी त्यांचे कलाकौशल्य आदिवासी मुलांना दाखवून दिले
प्रथम आपले आदर्श स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून सर्वांना मिठाई वाटली. स्वामी विवेकानंद यांनी देशातील संस्कार, धर्म, संस्कृती याचे महत्त्व जगाला कसे दाखवून दिले याबाबत या मुलांना माहिती देण्यात आली.
पुढे आदिवासी मुलांनी समतोलच्या सेंद्रिय शेती या प्रकल्पात जाऊन भाताची पुजा केली. तसेच अन्न चांगले असेल तर आपण सक्षम राहु यासाठी सेंद्रिय शेती महत्वाची आहे हे लक्षात आणून दिले.
भाताच्या कापणी झालेल्या पेंढ्या कशा बांधतात ते या आदिवासी मुलांनी प्रत्यक्ष दाखवले. आपले पाळीव प्राणी मग ते गाय, बैल, कुत्रा, मांजर, घोडा सर्व काही आपल्या बरोबर असतात. त्यांचा फायदा मनुष्याला कसा होतो हे त्यांनी सांगितले.
अशा प्रकारे शहरी मुलांनी आणि आदिवासी मुलांनी आपल्याला कलांची, अनुभवांची सुंदर देवघेव केले.
समतोलच्या मनपरिवर्तन केंद्रात सर्व काही गोष्टी आहेत, त्यामुळे आम्हाला इथे खूप मजा येते, आनंद मिळतो. समतोल मध्ये सर्व समतोल आहे,
आजचे लक्ष्मीपूजन खूप छान झाले असेच व्हायला पाहिजे अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
समतोल फौंडेशनचे विजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
– देवेंद्र भुजबळ 9869484800