नमस्कार,
वाचक हो.
जर तुम्हाला एक रोमांचक यात्रा करायची असेल तर परंबिकूलम हा अप्रतिम पर्याय आहे.
इथे जाण्यास केरळ मधून पालकाड – पोलाची – परंबिकूलम हा एक मार्ग आहे. केरळमधून तामिळनाडू आणि तामिळनाडूतून पुन्हा केरळ -म्हणजे परंबिकूलमला जायचे. किंवा चालाकुडीवरूनही एक मार्ग आहे. पण आम्हाला पोलाची वरून जाणे सोयीचे आणि जवळ पडते.
सकाळी लवकर निघाल्यानंतर पोलाचीमध्ये नाष्टा, कॉफी घेऊन पुढे जायचे.
Palambikulam wildlife sanctuary – parambikulam national park हे पालकाड जिल्ह्यात चित्तूर तालुक्यात येते.
अन्नामलाई आणि निल्यामपतीच्या डोंगर रांगांमध्ये हे नॅशनल पार्क वसलेले आहे.
(Anaimalai hills – nelliampathy hills)
१९७३ मध्ये या wildlife sanctuary ची निर्मिती केली गेली आणि फेब्रुवारी २०१० पासून parambikulam wildlife sanctuary खास वाघांसाठी Parambikulam tiger reserve म्हणून घोषित केले.
हल्ली वाघ कमी होत चालले आहेत, पण २०२१ एप्रिलच्या गणनेनुसार इथे ३५ वाघ झालेत. ही नक्कीच आनंदाची बाब आहे.
इथे पोहचल्यानंतर प्रवेश तिकीट घ्यावे लागते. ते घेतल्यानंतर आपण wildlife sanctuary मध्ये प्रवेश करतो.
जरा पूढे गेल्यानंतर जंगल सफारीचे बुकिंग करून त्यांच्याच सफारीतून आपणास फिरायला नेतात.
घनदाट जंगलात निसर्ग सौन्दर्य, विविध आकर्षक पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी आणि रंगीबेरंगी सुंदर फुलपाखरे.. जणू विधात्याने बनवलेला स्वर्गच भासतो.
जंगल सफारी करताना मध्येच हत्ती आडवे जातात, हरणांचे कळप चरताना दिसतात तर मोरांचे थवे फिरताना दिसतात. वाघ महाराजांचे दर्शन झाले तर अहो भाग्यच म्हणायचे.जंगल कॅम्प, ट्रेकिंग, बांबू राफ्टिंग असे विविध प्रकारचे अनुभवही आपण बुकिंग करून घेऊ शकतो.
आपल्याला आकर्षित करणारी अजून एक गोष्ट म्हणजे tree top hut पर्यटकांसाठी झाडावरती बांधलेली छोटुकली घरे.
पानांची सळसळ, मध्येच पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे ओरडणे म्हणजे निसर्गाचे सुंदर संगीत ऐकल्यासारखंच भासतं.
इथे वेगवेगळ्या आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. खास पर्यटकांसाठी जंगल सफारी सोबत गाईड, ट्रेकर म्हणून विविध प्रकारे कार्य करत आपली उपजीविकाही चालवतात.
आवडीनुसार थोडी फार खरेदीही पर्यटक इथे करू शकतात. परंबिकूलम नदीवरती बांधलेले परंबिकूलम धरणही आपणास पाहण्यास मिळते. हे धरण केरळ मध्ये आहे तरी ते तामिळनाडू मधून चालवले जाते, त्याची देखभाल केली जाते.Thunakadavu Dam सुद्धा आपण या जंगल सफारी करताना पाहतो. जगातील सर्वात मोठे आणि जुने सागवानाचे झाड Kannimara असे त्याला म्हणतात ते या जंगलामध्ये आपणास पाहायला मिळते.
बांबू, सागवान,चंदन, रोजवूड नि इतर झाडांची दाटी, हिरवाईने नटलेले चढ उतार मध्येच स्वच्छ नितळ पाण्याचा साठा, पाणवठ्यावर पाणी प्यायला आलेला प्राणी, कडेला आराम करणारी मगर असा नयनरम्य नजारा तृप्त करून सोडतो.
स्वच्छतेच्या बाबतीत विचार केला तर हे प्रदूषण आणि प्लास्टिक मुक्त जंगल आहे. अतिशय शुद्ध आणि थंड वातावरण मन प्रसन्न करते.
क्रमशः

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
छान
मैसूर ते उटी मार्गात सुद्धा हत्तीचे कलप मृग सांबर दिसतात
खूप सुंदर माहिती मनीषा