14 फेब्रुवारी ला भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते संयुक्त अरब अमिराती ची राजधानी अबुधाबी मधे बाप्स च्या स्वामी नारायण मंदिराचे उद्धाटन होऊन आज बरोबर एक महिना होत आहे. यानिमित्ताने या मंदिराच्या उभारणीची रंजक कथा सांगताहेत आखाती देशांत गेली ३५ वर्षे राहिलेले श्री प्रशांत कुलकर्णी…
– संपादक
अबुधाबी चे मंदिर ही तिथे राहणाऱ्या भारतीय समाजासाठी आनंदाची गोष्ट आहेच पण भारतातील आणि जगभर पसरलेल्या हिंदू समाजासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे.
असे नाही की मुस्लिम देशात प्रथमच मंदीर उभारले गेलेय. यूएई च्या बाजूला लागूनच असलेल्या ओमान या देशात मस्कत मधे गेले तीन पिढ्या वास्तव असलेल्या खिमजी रामदास या भारतीय उद्योगपती ने बांधलेली दोन सुंदर मंदिरं आहेत. तसेच दस्तरखुद्द दुबई मधे 50-60 वर्षांपूर्वी समुद्रकाठच्या एका छोटेखानी इमारतीत तेव्हाच्या दुबईच्या शेख राशीद ने (सध्याचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशीद अल माकतुम यांचे वडील) मंदीर बांधायला परवानगी दिली होती. या मंदिराची इमारत अगदी जीर्ण अवस्थेत आल्यावर गेल्या वर्षी जेबल अली येथे नवीन मंदीर बांधण्यात आले आहे.
जुन्या मंदिराचे वैशिष्ट्य असे की जुन्या छोटया छोटया इमारतीच्या गल्लीबोळातून या मंदिरात प्रवेश करावा लागत असे. बोळात दोन्ही बाजूला हळद, कुंकू, हार फुले विकायची दुकाने असत. सर्व देवी देवतांच्या तसबिरी लावलेल्या असत. विशेष म्हणजे मंदिराच्या मागील बाजूस मोठी मस्जिद देखील आहे. पण कधी कोणाला एकमेकांचा त्रास झाला नाही. जवळपास दोन हजार साला पर्यंत देवाच्या मूर्ती दुकानात ठेवायला परवानगी नसे. पण नंतरच्या काळात मूर्तीही दुकानात दिसायला लागल्या.
आजच्या घडीला यूएई मधे मुख्यत: दुबई, अबुधाबी, शारजा या एमीरेट्स मधे 5 ते 8 हजार मराठी घरा-घरातून गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी गणपती च्या मूर्ती भारतीय सुपरमार्केट मधे सहजपणे मिळतात. काळाचा महिमा बघा, 70-80 च्या दशकात भारतातून येणाऱ्या वृत्तपत्रात, लोकप्रभा, चित्रलेखा सारख्या साप्ताहिकाचे गणपती विशेषांक वगैरे जेव्हा यायचे तेव्हा मुखपृष्ठावर असलेल्या देवांच्या फोटोवर काळया मार्कर ने रेघोट्या ओढून त्यांचे चेहरे काळे केलेले असायचे. ते बघून जीवाची कालवा कालव व्हायची.
पण विसावे शतक ओलांडताना एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जागतिक आर्थिक बदलाची चाहूल यूएई च्या नव्या शिक्षित पिढीलाही झाली. यूएई चे भारता बरोबरचे संबंध पहिल्यापासून चांगले होते. जवळपास पस्तीसलाख भारतीय तिथे नोकरी व्यवसाया निम्मित राहतात. यूएई च्या उभारणीत आपल्या डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, अकाउंटंट, टेकनिशियन, नर्स या शिक्षित वर्गा बरोबरच श्रमिक वर्गाचा, कुशल- अकुशल कामगारांचा मोठा हातभार लागला आहे हे तिथले नेतृत्वही जाहीर पणे मान्य करते. या अनिवासी भारतीयां कडून भारतात दरवर्षी जवळपास पंधरा बिलीयन डॉलर remittance पाठवला जातो.
भारतीयांची सचोटी व प्रामाणिकपणे खूप कष्ट करण्याच्या वृत्तीमुळे तेथील जनतेत आदराचे स्थान आहे. इथे हिंदू-मुस्लिम हा भेदभाव कुठे जाणवत नाही. आपल्या घराच्या चार भिंतीत तुम्ही तुमचा धर्म पाळू शकता. पण कुठलाही धर्म असो रस्त्यावर आणायला बंदी आहे. इथे कधी रत्यावरून मिरवणूका जाताना दिसत नाहीत. म्हणून आजवर इथे विविध धर्माचे, 193 देशाचे नागरिक गुण्यागोविंदाने राहात आहेत. धार्मिक दंगली, हिंसाचार, प्रक्षोभक भाषणे यांना इथे स्थान नाही. देशाच्या प्रगतीत वाटा उचलणाऱ्याचे इथे स्वागत आहे.
यूएई चे नवे नेतृत्व आपली संस्कृती आणि परंपरा टिकवत असताना नवीन तंत्रज्ञान, नविन्याची कास धरत आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी कटीबद्ध आहे. याच नेतृत्वाकडून 2015 ला पंतप्रधान मोदी यांच्या यूएई भेटीत BAPS च्या स्वामीनारायण मंदिराकडून मंदीर बांधण्याचा प्रस्ताव सध्याचे यूएई चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांच्या पुढे ठेवण्यात आला. पण याची सुरुवात 1997 पासूनच करण्यात आली होती. त्यावेळचे स्वामी नारायण मंदिराचे प्रमुख यांच्या मनात आखाती देशात एखादे BAPS चे मंदीर असावे अशी इच्छा झाली. त्यासाठी त्यांनी अबुधाबी ची निवड केली. त्या वेळी सध्याच्या शेख मोहम्मद चे वडील शेख झायेद बिन सुलतान अल नहयान यूएई चे प्रेसिडेंट होते. त्यावेळची परिस्थिती पाहता तिथल्या अनुभवी मंडळींनी बाप्स च्या प्रमुखांना असा सल्ला दिला की मंदिर बांधायला परवानगी मिळणे निव्वळ अशक्य आहे. कारण या देशात मूर्तिपूजेला स्थान नाही तेव्हा तुम्ही अध्यात्मिक सेंटर बांधायला परवानगी मागा. ती कदाचित मिळू शकेल. पण प्रमुखांना हे मान्य नव्हते. त्यांना विश्वास होता की बाप्स चे स्वामीनारायण मंदीर हे केवळ हिंदू धर्मा साठी नसून सर्व धर्म समभाव यावर विश्वास ठेवणाऱ्या, सकल मानव जातीचे कल्याण आणि विश्वबंधुत्वाची भावना जपणाऱ्या प्रत्येक मानवाला मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, देशाचा असेल त्याला एकात्मिकेचा संदेश देईल.
2004 साली शेख झायेद यांच्या निधना नंतर यूएई चे प्रेसिडेंट म्हणून त्यांचे जेष्ठ चिरंजीव शेख खलिफा बिन झायेद अल नहयान यांची निवड झाली. बाप्स ने आपले प्रयत्न सोडले नव्हते. पण या कार्याला खरी गती मिळाली ती शेख खलिफा यांचे बंधू शेख मोहम्मद आणि भारताचे पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यावर. बाप्स च्या मदतीने मोदी नी शेख मोहम्मद ला विनंती करायचा अवकाश की त्यांनी लगेच अबुधाबी- अल ईन रोड वर चार एकर जमीन देण्याचे आदेश दिले. पण बाप्स ला एकंदरीत देवळाचा आकार आणि एवढ्या लांब दर्शनाला येणाऱ्या भक्तांच्या गाड्यांची पार्किंग ची व्यवस्था बघता ही जागा गैरसोयीची वाटत होती. म्हणून त्यांनी शेख मोहम्मद ला दुसरी जागा देण्याची विनंती केली आणि त्यांनी देखील उदार मनाने अबुधाबी -दुबई हाय वे वर 13 एकरची जागा देण्याचे मान्य केले. पण ती देताना एक अट मात्र घातली की काहीही करून मंदिरात देवाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांच्या गाड्या ची पार्किंग ची सोय ही मंदिराच्या तळघरात न करता मंदिरा समोर करावी जेणेकरून गाडीतून बाहेर पडल्यावर सर्वप्रथम मंदिराच्या कळसाचे दर्शन त्यांना होईल.
त्या नंतर अधिक वेळ न दवडता 2019 ला मंदिराच्या बांधकामाला लगेच सुरुवात झाली. आता तेरा एकर ची जागा 27 एकर झाली होती. शेख मोहम्मद च्या या औदार्याची कृतज्ञता म्हणून बाप्स ने ठरवले यूएई हे अबुधाबी, दुबई, शारजा, अजमान, रस अल खैमा, उम अल क्वैन फुजेराह अशी एकूण सात इमिरेट्स चे मिळून बनले आहे. या सात इमिरेट्स वर सात वेगवेगळ्या घराण्याची सत्ता आहे. त्यांचे राजे वेगवेगळे आहेत. पण भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्या पाहता त्यांनी 1971 साली जेव्हा ब्रिटिश सत्ते कडून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा संरक्षण आणि परराष्ट्रीय धोरण यासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि संयुक्त अरब अमिराती ची निर्मिती झाली.
अबुधाबीच्या अल नाहयान घराण्याकडे कडे राष्ट्रपती पद आले तर दुबईच्या अल माकतूम घराण्याकडे पंतप्रधान पद आले. तेव्हा पासून हे सात इमिरेट्स स्वतःच्या राज्याची प्रगती साधत देशाच्या प्रगतीत योगदान देत आहेत. तर या एकत्र गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या सात इमिरेट्स चे प्रतीक म्हणून या मंदिराचे सात कळस बांधायचे बाप्स ने ठरवले. हे मंदीर बांधायचा खर्च 400 मिलियन दिऱ्हाम्स येणार होता. त्यासाठी बाप्स नी यूएई तील अनेक भारतीय उद्योगपती ना आवाहन केले. त्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या. सर्वसामान्य नागरिकांनकडून शंभर दिऱ्हाम मधे Bricks(विटा )च्या सेवेतून विधिवत पूजा अर्चा करून देणग्या गोळा केल्या. यासाठी बाप्स चे कार्यकर्ते यूएई तील सर्व संस्थाशी वैयक्तिक रित्या सतत संपर्कात राहिले. एक शब्द जरी आपल्या पंतप्रधानाशी टाकला असता वा तिथल्या राजा जवळ टाकला असता तर देणगी मिळणे अवघड नव्हते. पण बाप्स ने मोठ्या कौशल्याने हा मोह टाळला आणि स्वबळावर मंदिरासाठी निधी उभारला. राजस्थान, गुजरात हुन कुशल कामगार आणले आणि चार वर्षात आखाती देशातील पहिले स्वामीनारायण मंदीर मोठ्या दिमाखात उभे राहिले.
या मंदिराचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा आपण सर्वांनी पाहिला असेलच. तो पहात असताना दुबई-अबुधाबी मधे तीनचार दशक घालवलेल्या, गेल्या चार दशकातील भारतातील आणि यूएई तील स्थित्यंतरे पाहिलेल्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात मात्र एकच प्रश्न येतो की 2014 साली भारतात सत्तांतर झाले नसते तर 14 फेब्रुवारी छान दिवस आपल्याला बघायला मिळाला असता का ? यूएई ने एक मुस्लिम राष्ट्र म्हणून स्वहीत नेहमीच जपले पण एक हिंदू म्हणून या देशात आम्हाला कधीच त्रास झाला नाही. या देशाच्या जडणघडणीत, उभारणीत सर्व धर्मियांचा, सर्व देशातील नागरिकांचा महत्वाचा सहभाग आहे याची जाणीव इथल्या राजकर्त्यांना आहे. काळाबरोबर चालण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. उदारमतवादी धोरणं त्यांनी अंगीकारले आहे. आणि हेच धोरण त्यांच्या आसपास चे इतर मुस्लिम राष्ट्र आज ना उद्या स्वीकारतील. तशा बदलाची सुरुवात सौदी अरेबिया कडून होत आहेच. ओमान, बहरीन नी ही वाट पूर्वीच अंगीकारलेली आहे. कुवैत, कतार यांची काही विचार कर्मठ प्रकारात मोडत असले तरी त्यांच्या विचारांना आपल्या बाजूला परिवर्तीत करण्याची लवचिकता आपल्या परराष्ट्रीय धोरणात आहे. आपल्या आठ भारतीय अधिकाऱ्यांची कतार ने रद्द केलेली फाशीची शिक्षा हे ह्याचेच द्योतक आहे.
एकंदरीत एका मंदिराच्या उभारणीमागे दोन देशामध्ये राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक संबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत. हीच मोदीची गॅरंटी @3 मधे कामाला येणार आहे.
— लेखन : प्रशांत कुलकर्णी. अबुधाबी /पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800