पंढरीरायाने । निर्मिली पंढरी।
वैकुंठ नगरी । भूमीवरी ।।
पंढरीत राहे । विठोबा माऊली ।
कृपेची सावली । आम्हासाठी ।।
सुंदर साजिरा । विठू पंढरीचा।
कर कटेवरी। ठेवोनिया।।
युगे उभी आहे । सावळ्याची मूर्ती।
जगण्यास स्फूर्ती । देतो आम्हा ।।
तुळशीचे हार । कासे पितांबर।
रूप मनोहर। माऊलीचे।।
विठू माऊली ती । भक्तांची कैवारी।
पंढरीची वारी। पुण्य देई।।
संत मेळा मोठा । सर्वाना पावशी।
हाकेल धावशी। विठुराया।।
दळीतो कांडीतो । धाव घेतो हरी ।
कधी पाणी भरी । भक्तांसाठी।।
विठू दर्शनाची । आस लागे मनी ।
रुप मनी ध्यानी । साठविते।।
आषाढी, कार्तिकी । एकादशी करु ।
उपवास धरु । पुण्यदायी ।।
पंढरीची वारी । करु एकवार ।
भक्तीस सादर । माऊलीच्या ।।
– रचना : मानसी जोशी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹खूप छान लिहिले आपण. विठू माऊली हे आपले श्रदस्थान 🌹 वारकरी हा आपला प्रत्येक माऊली 🌹
🌹धन्यवाद मानसी जोशी मॅडम 🌹
असं वाटतं कि या वारीत आपणही त्यांच्या सोबत मिसळावं मनसोक्त आनंद घ्यावा व सर्व ताण तणाव दूर सारून यथेच्छ नाचावं व विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग व्हावं जय श्री विठ्ठल
सुंदर अभंग