भारत सरकारने मराठी भाषेला काल अभिजात भाषा म्हणून घोषित केले आणि आपल्या कवींचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यातूनच स्फुरलेल्या काही कविता पुढे देत आहे. आपली मराठी भाषा चिरायू होवो.
– संपादक
१. आनंदी आनंद
झाला आनंदी आनंद
आज मराठी मनाला
माय मराठी बोलीला
दर्जा मिळाला मिळाला !!
दर्जा मिळाला मिळाला
“अभिजात” मराठीला
न्याय भेटला गं सखे
“राष्ट्रभाषा” भगिनीला !!
राष्ट्रभाषा” भगिनीला
संशोधन प्रोत्साहन
भारतात विद्यापिठी
आता मिळाले रे स्थान !!
आता मिळाले रे स्थान
संत ग्रंथ संपदेला
यावे सुगीचे दिवसं
साहित्याला संस्कृतीला !!
साहित्याला संस्कृतीला
प्राचीन माय बोलीला
व्हावी प्रसिद्ध समृद्ध
जना चाखावे गोडीला !!
जना चाखावे गोडीला
दिनु सोनियाचा आला
झाला आनंदी आनंद
आज मराठी मनाला !!
— रचना : वासुदेव खोपडे.
सहा. पोलीस उपनिरीक्षक (सेनि) अकोला.
२. गौरव दिन
आज मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करु या
आज मराठी भाषेचा उत्सव साजरा करु या
आम्हांस अभिमान
मराठी भाषेचा
महाराष्ट्र मातीचा
मराठी जातीचा
वैभव नातीचा
आम्हांस अभिमान
मराठी नेतृत्व
मोठे कर्तृत्व
दिसे स्वकर्तृत्व
आम्हांस अभिमान
स्वाभिमानी महाराष्ट्र
करीतो सदा काबाडकष्ट
असे हितचिंतकांची वक्रदृष्ट
आम्हांस अभिमान
आम्ही मराठी बाणांचा
असे मोठ्या मनांचा
लाभे मजबूत कणांचा
आम्हांस अभिमान
अभिमान मराठी भाषेला
जपतो दुसऱ्या भाषेला
इथेच मान विविध भाषेला
आम्हांस अभिमान
असे मराठी संस्कृती
दिसे वैविध्यता पाककृती
लाभे यशाची कलाकृती
आम्हांस अभिमान
बोली मराठी भाषेची आई
आवडीने बोली शेजारची ताई
मात्र इंग्रजी लिहिण्याची घाई
आम्हांस अभिमान
वेलांटी- काना- मात्रा- उकार मराठीत लाभो,
हि इच्छाऽऽऽ !
बोला- लिहा- वाचा आणि मराठीत ऐका,
हि सदिच्छाऽऽऽ !!
आणि मराठीत व्यवहार करण्यासाठी,
मराठीत शुभेच्छाऽऽऽ !!!
–– रचना : विलास देवळेकर.
३. भाषेचा मान
मराठीला अभिजात
भाषेचा मान मिळाला,
जगात तिच्या गौरवाचा
झेंडा उंच फडकला।
शब्दांची तिची
अमोल शृंखला,
कविता, कथा, ज्ञानाचा
संपन्न प्रवाह वाहिला
शतकानुशतकांची तीनं
सांभाळली शान,
इतिहासाच्या पानांवर
कोरला अभिमान।
समृद्ध वारसा घेऊन
पुढे सरकते ती,
संस्कृतीची अमूल्य
ओळख जपते ती।
तुकाराम, ज्ञानेश्वरांच्या
अभंगातून गाजली,
कविवर्य भा. रा. तांबे
यांच्या शब्दांनी सजली
तिच्या मुखातून
निघाले अस्सल मंत्र,
मराठीच्या भूमीत
रुजले संस्कारांचे तंत्र
आता जगभरात तिचा
नवा प्रकाश पसरेल,
मराठीचा सुर्य
पुन्हा आकाशी दिसेल
अभिजाततेचा सन्मान
हा होता तिचा हक्क,
समृद्ध मराठीची आता
विश्वात दिसेल झळक
— रचना : ओमप्रकाश शर्मा.
४
आधीच मराठी अभिजात
संत परंपरा ज्ञानवंत
तरी आनंद झाला आम्हा
सरकार झाले प्रज्ञावंत.
–– रचना : गज आनन म्हात्रे. करावेगाव, नवी मुंबई.
५. अभिजात जाहली भाषा
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे कळल्यावर सर्व वर्णमाला मनामध्ये मक्याच्या दाण्याप्रमाणे तडतडली.
तिच्या फुलारलेल्या या लाह्या कवितेच्या कोनात भरून आपल्यापुढे ठेवत आहे.
अभिजात झाली भाषा !
पूर्णत्व पावली आशा |
अभिजात जाहली भाषा ||धृ||
नाचा खिदळा, गुलाल उधळा
परिसर नटवा पुन्हाच सगळा
करा हाकारा, पिटा डांगोरा
तडतड वाजवा ताशा |
अभिजात जाहली भाषा ||१||
वर्षामागुनी सरली वर्षे
आज यशाच्या पावन स्पर्शे
मने मराठी हरकली हर्षे
हो मूर्त अता अभिलाषा |
अभिजात जाहली भाषा ||२||
भाग्य उदेले तुमचे माझे
उच्चत्वी ही भाषा विलसे
सुख सुंदर हे जगात गाजे
नवाच हा श्रीगणेशा |
अभिजात झाली भाषा ||३||
— रचना : डॉ. श्रीनिवास आठल्ये.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800