भारत सरकारने मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला आहे. या विषयी मी स्वतः “मराठी भाषा : अभिजात दर्जा मिळाला. पुढे काय ?” हा लेख लिहिला. याच विषयाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या सविस्तर प्रतिक्रिया पुढे देत आहे.
– संपादक
पहिली प्रतिक्रिया आहे, डाॕ. चंद्रशेखर देशमुख, मुंबई यांची. मॕनेजमेंट मध्ये एम.बी. ए. असलेले डाॕ. देशमुख यांनी एल.एल. बी नंतर एल. एल. एम केले आहे. तसेच मॕनेजमेंटमध्ये त्यांनी पी.एचडी केली आहे. कोकियो कॕम्लीन समुहात ते एच आर आणि लिगल हेड या उच्च पदावर कार्यरत आहेत. मराठी भाषेसाठी भरीव कार्य करणाऱ्या सर्वद फाऊंडेशन चे ते सल्लागार आहेत. डॉ देशमुख यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे. तर दुसरी प्रतिक्रिया बेंगळूरू येथील आपल्या लेखिका सौ दिपाली वझे यांची आहे. या दोन्ही प्रतिक्रिया पुढे देत आहे.
१
“जाहले आम्हास भाग्य, बोलतो मराठी”
अडीच हजार वर्षाचा मराठी भाषेचा सांस्कृतिक, ऐतिहासिक व साहित्यिक वारसा जोपासणारा आपला महाराष्ट्रीय समाज ! या भाषेत असे काय होते ज्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला ? तर मराठी ही प्राचीन भाषा असून तिचे ऐतिहासिक महत्त्व आहे आणि या भाषेतील साहित्यिक संपदा वैविध्यपूर्ण आहे तसेच हे साहित्य किमान दोन हजार वर्षापूर्वीचे आहे हे सिद्ध झाले. पूर्वीची प्राचीन भाषा आणि आजची भाषा यांचा समन्वय साधला गेला आहे. मराठीला आभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने अनेक लाभ होतील. भाषेच्या संवर्धनासाठी विशेष निधी उपलब्ध होईल. साहित्याचे भाषांतरे, प्रकाशन होईल. भारतातील ४५० विद्यापिठांमध्ये ही भाषा शिकवता येऊ शकेल, भाषेच्या अध्ययन व संशोधनास गती येईल.
भाषा ही संवादाचे माध्यम तर आहेत पण संस्कृतीचा तो एक महत्वपूर्ण घटक असतो. त्यामुळे भाषेचे जतन होते, अभ्यास वाढतो. आज मराठी भाषेच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व साहित्यिक मूल्यांचे मान्यकरण झाले आहे. मराठी भाषिकांचे व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे खूप खूप अभिनंदन !!
— लेखन : डाॕ. चंद्रशेखर देशमुख. मुंबई.
२
भाषा कोणतीही असो, प्रत्येक भाषिकांसाठी आपली मातृभाषा आणि संस्कृती टिकवण्याची मौलिक जबाबदारी असते. तरीही, शासनाकडून मान्यता प्राप्त भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हे आजच्या युगातील उन्नतीकडे उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
आज ३ ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची बातमी समस्त मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची आहे. परंतु, आपली मराठी भाषा इतकी प्राचीन असूनही, संतांची वाणी, क्रांतीवीरांची भूमी आणि साहित्यिकांचा वारसा असतानाही तिला अभिजात भाषेचा दर्जा नव्हता, ही खरोखरच आश्चर्याची बाब होती.
“माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेहि पैजासी जिंके,” संत ज्ञानेश्वरांच्या या सुंदर ओळी आठवतात.
मराठी बांधवांनी आपापल्या परीने मातृभाषा आणि मराठी संस्कृती जपली आणि पुढील पिढ्यांना घडवले. तसेच, अनेक मराठी बांधवांनी मराठी सेवेसाठी आपले तन, मन, धन अर्पण केले. अग्रेसर कार्यकर्ते, मराठी शिक्षक, साहित्यिक आणि रसिक यांनी मराठी सेवेसाठी केलेले परिश्रम आज खऱ्या अर्थाने फळास आले आहेत, असे अंतःकरणातून वाटते.
बाहेरच्या जगात इंग्रजीचा प्रभाव वाढत असताना, महाराष्ट्रात काही मराठी शाळा बंद होऊ लागल्या. अलीकडे सरकारकडून अनुदान न मिळाल्याने बृहन्महाराष्ट्रातल्या ज्या एखाद दुसऱ्या मराठी शाळा होत्या त्या शाळांना सुद्धा कुलूप लागले. अशा बातम्या वाचून प्रत्येकालाच वाटले की, मराठी भाषेबरोबर मराठी संस्कृतीवर याचे विपरीत परिणाम होतील. मराठी बांधवांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल.
आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे जितके अभिमानाचे आहे, तितकेच मराठीला अधिक प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारीही महत्त्वाची आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुस्तकालयांमध्ये मराठी पुस्तके आणि वृत्तपत्रांचा समावेश होईल. तेव्हा आपल्याकडून दर्जेदार लेखन व्हायला पाहिजे. मराठी शुद्धलेखन कार्यशाळा लवकरात लवकर सुरू झाल्या पाहिजेत. इंग्रजी शब्द न वापरता प्राचीन मराठी शब्दांचा अभ्यास ताकदीने झाला पाहिजे. मराठी पुस्तके इतर भाषांमध्ये अनुवादित झाली पाहिजेत. मराठीचे भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे, याबद्दल आता कोणतीही शंका नाही.
सदैव अजरामर आपल्या मराठीसाठी मी लिहिलेल्या काही ओळी..
वृत्त : देवप्रिया
तीच माझ्या लेखणीची धार असली पाहिजे
याच गर्वाने मराठी आज शिकली पाहिजे..
संस्कृतीचे बोट धरुनी लागले चालायला
संगतीला जोडणारी माळ जपली पाहिजे..
वीर गेले धीर गेले राहिले नेते इथे
राष्ट्र उद्धारक म्हणूनी वाट धरली पाहिजे..
फ्रेंच, जर्मन शिकत जाता अन् मराठी विसरता
माय बापांच्या उराची जाण असली पाहिजे..
लांब परदेशात रमती हीच लोक आपली
मातृभाषा संस्कृतीशी गाठ जुळली पाहिजे..
— लेखन : सौ. दिपाली महेश वझे. बेंगळूरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800