शहरांमधून विविध प्रकारे भाजीपाला विकला जातो. भाजी खरेदी करण्यासाठी कुणी मंडईत जातो तर कुणी चार चाकीवरुन येणाऱ्या भाजी विक्रेत्याकडून भाजी खरेदी करतात.
विशेषकरून उच्चभ्रू वसाहतीत राहणारे लोक हमखास मंडईतच जातात. मात्र मध्यम वर्गीय आणि गरीब लोक दारावर येणार्या चारचाकी गाडीवाल्यांकडून भाजी खरेदी करतात.
मंडई व्यतिरिक्त अनेक ठिकाणी किरकोळ विक्रेते भाजी विक्रीचा व्यवसाय करीत असतात. ज्या ठिकाणी चांगला, दर्जेदार, स्वच्छ आणि किफायतशीर भाजीपाला मिळेल अशा ठिकाणी जाण्याकडे ग्राहकांचा कल असतो.
आता तर सरकारने शेतकऱ्यांना आपला शेतमाल वा भाजीपाला कुठेही विकण्यासाठी परवानगी दिली असून शेतकरी व्यापाऱ्यांऐवजी स्वत: आपला माल शहरात नेऊन विकू लागले आहेत.
मुंबईतील वांद्रे पूर्व येथे म्हाडा कार्यालयाजवळ टोलेजंग इमारती झाल्या आहेत. या इमारतींमध्ये गर्भश्रीमंत लोकच राहतात. अशाच एका इमारतीजवळ संतोष जाधव या भाजी विक्रेत्याने नवीन शक्कल लढवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजी विक्रीचा व्यवसाय करणारे जाधव यांनी रुस्तमजी ओशियाना या इमारतीजवळच्या एका कोपर्यात आपला भाजीपाल्याचा व्यवसाय थाटला असून जाधव यांनी यासाठी चक्क टेम्पोचा वापर केला आहे.
या टेम्पोमध्ये बांबूपासून तयार केलेल्या टोपल्यांचा भाजीपाला ठेवण्यासाठी आकर्षक पद्धतीने वापर केला आहे. एका टोपलीत वांगी, दुसर्या टोपलीत कोबी, भेंडी, कारली, चवळीच्या शेंगा, गवारीच्या शेंगा, पडवळ, कांदे, बटाटे, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, कोथिंबीर, लसूण, काकडी, गाजर व अन्य प्रकारच्या भाजीपाल्यासाठी स्वतंत्र टोपल्यांचा वापर करण्यात आला आहे.
भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकास प्रसन्न वाटावे, भाजी खरेदी करण्याची इच्छा निर्माण व्हावी, अशाच पद्धतीने विचार करण्यात आला आहे. त्यातही ओटा तयार करणे, चारचाकी गाडी आदी पारंपरिक पद्धतीला जाधव यांनी फाटा दिला आहे. चक्क टेम्पोत हा भाजीपाला ठेवण्यात आला असून सध्या नफा ना तोटा या तत्वावर भाजी विक्री सुरु असल्याचे जाधव यांनी सांगितले. यासाठी आधी ग्राहकांचे समाधान झाले पाहिजे. त्यातच आपले समाधान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
याठिकाणी हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु करुन जाधव यांना केवळ दिड महिना झाला आहे. सध्या ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून भाजीपाला विक्री कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज नागरिक सहकारी संस्थेचे सहकार्य लाभल्याचे जाधव यांनी सांगितले.

– लेखन : शेषराव वानखेडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800