कलाकार, लेखिका मेघना साने ‘मेघमणी‘ हा संतचरित्र, भक्तीगीते, ओव्या यांचा अभिनव कार्यक्रम सादर करीत असतात. मेघना साने यांच्या स्वरचित ओव्या हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असते.
या सर्व ओव्यांना हेमंत साने यांनी वेगवेगळ्या रागात संगीतबद्ध केले असून त्या सर्व रसिकांसमोर सादर केल्या जातात.
“मेघमणी” अखिल ऑस्ट्रेलिया संमेलनातील सिंधू व्याख्यानमालेत तसेच शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या अध्यात्मपीठातही ऑनलाइन पद्धतीने सादर झाल्यानंतर तेथील रसिकांनी गौरविला होता. हा कार्यक्रम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नवरात्रात व दिवाळी पहाट निमित्ताने आजवर सादर झालेला आहे.
नुकताच “मेघमणी” कार्यक्रम डॉक्टर दप्तरकर आयोजित पुणे येथील भुगाव नवरात्र उत्सवामध्ये संध्याकाळी पाच ते सात या वेळात महाराष्ट्रातील सर्व रसिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात मेघना साने, हेमंत साने यांच्यासह नीलिमा सबनीस, सुप्रिया महाजन, श्रुती पटवर्धन, अनुराधा आंबोळे, रुचिता कांबळी आणि नयन ठेकेदार सहभागी झाल्या होत्या.
मेघनाताईंनी संत चरित्रातील उद्बोधक गोष्टी साभिनय सादर केल्या. बुद्धकाळातील, रामायणातील फारशा माहित नसलेल्या गोष्टी तसेच ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, गोरा कुंभार, संत कबीर अशा अनेक संतांच्या चरित्रातील गोष्टी कथन करण्यात आल्या. या कथा भक्तीभावाबरोबरच सामाजिक भानही जागृत करणाऱ्या होत्या.
हेमंत साने आणि श्रुती पटवर्धन यांनी भक्तीगीते सादर केली. सर्व गीते कराओके वर सादर होत होती.
“सृष्टीस जाग आली
बीजे कशी अंकुरली
थेंबात तृण जन्मली
किमया तुझी”
या ओव्या निसर्गातूनच देवाचे अस्तित्व व्यक्त करतात तसेच समाजसेवेचा संदेशही देतात.
“साधेच असो वर्तन
देवाचे करी कीर्तन
मुक्तीचे साधन
मानवसेवा”
ओव्यांच्या गायनात सहभागी झालेल्या सर्व गायिका गायन कुशल असल्याने एकत्र सुरेल गात होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी हेमंत साने यांनी ‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ हे गीत गाऊन माणुसकीचा व प्रेमाचा संदेश दिला.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
Great Hemant and Mrs.Hemant
Keep it up