स्वातंत्र्यपूर्व कालीन भारतामध्ये अनेक अशी प्रसिद्ध स्थाने होती, ज्यांचा खूप प्राचीन असा इतिहास आपल्याला बघायला मिळतो.
हजारो वर्षांपूर्वीची संस्कृती आणि ज्ञान भारत देशाने संपूर्ण जगाला दिले. अगदी त्याही काळात उत्तम शिक्षण, शोध, कला, खगोलशास्र, शल्यशास्र, अर्थशास्र, जोतिष्य शास्र यांचा अभ्यास आणि त्यात प्राविण्य मिळवण्यात कित्येक जण प्रयत्नशील असत. त्या पैकीच एक असलेले ज्ञानाचे भांडार म्हणजे तक्षशिला विद्यापीठ.
तक्षशिला ही प्राचीन भारतात गांधार देशाची राजधानी आणि शिक्षणाचे मुख्य केंद्र होते. त्या वेळी हे हिंदू आणि बौद्ध धर्मीयांच्या अभ्यासाचे मुख्य केंद्र मानले जाई.
तक्षशिला हे सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रावळपिंडीच्या उत्तरेस १८ मैलांवर आहे. हे विद्यापीठ ज्या शहरात आहे ते श्री रामाचा भाऊ भरत यांचा मुलगा तक्ष याने स्थापल्याचे सांगितले जाते.
इ.स.पूर्व ७०० (जवळपास 2700 वर्षांपूर्वी) स्थापन झालेले हे जगातील पहिले विद्यापीठ होते. तक्षशिला विद्यापीठात जगभरातून 10,500 हून अधिक विद्यार्थी शिकत असत, तर 60 हून अधिक विषय शिकवले जात होते हे विशेष..! चीन, सिरिया, ग्रीस अशा वेगवेगळ्या देशातून त्यावेळी विद्यार्थी तक्षशिला विद्यापीठात शिकायला येत असत.
इसवी सन 326 मध्ये परकीय आक्रमक अलेक्झांडरच्या आक्रमणाच्या वेळी, हे केवळ जगातील सर्वात प्रसिद्ध विद्यापीठच नव्हते, तर त्या वेळी वैद्यकीय विज्ञानाचे ते एकमेव सर्वोच्च केंद्रही होते. तक्षशिला विद्यापीठ वेगवेगळ्या स्वरूपात विकसित झाले. त्याचे कोणतेही एक मध्यवर्ती ठिकाण नव्हते, परंतु ते विस्तृत क्षेत्रामध्ये पसरलेले होते. विविध विद्याशाखांच्या विद्वानांनी येथे आपल्या शाळा व आश्रम बांधले होते.
विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या आचार्यांकडे अभ्यासासाठी जात असत. येथील महत्त्वाच्या अभ्यासक्रमांमध्ये वेद-वेदांत, अष्टदशा विद्या, तत्त्वज्ञान, व्याकरण, अर्थशास्त्र, राजकारण, युद्धकला, शस्त्र-संचलन, ज्योतिष, आयुर्वेद, ललित कला, हस्त-विद्या, अश्व-विद्या, मंत्र-विद्या, विद्या भाषा, इत्यादी विद्यार्थ्यांना शिकायला मिळत.
प्राचीन भारतीय साहित्यानुसार पाणिनी, कौटिल्य, चंद्रगुप्त, जीवक, कौशलराज, प्रसेनजीत इत्यादी महापुरुषांनी या विद्यापीठातून शिक्षण घेतले. आर्य चाणक्य हे सुद्धा याच विद्यापीठात शिकले होते.
तक्षशिला विद्यापीठात शिकवणाऱ्या आचार्याना आजच्या सारखा पगार किंवा मानधन मिळत नसे. आणि त्या वेळी ठरलेला असा अभ्यासक्रमही नव्हता. आजच्या प्रमाणे या अभ्यासक्रमाचा कालावधीही निश्चित नव्हता आणि विशिष्ट प्रमाणपत्र किंवा पदवी दिली जात नव्हती. शिष्याची क्षमता त्यांची आवड पाहून आचार्यांनी स्वतः त्याच्यासाठी अभ्यासाचा कालावधी निश्चित केलेला असे,मात्र काही ठिकाणी काही अभ्यासक्रमांसाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती.
तक्षशिला मध्ये काही वैद्यकीय अभ्यासक्रम हे सात वर्षांचे होते. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला सहा महिने संशोधन कार्य करावे लागत असे. या संशोधन कार्यात ते काही वनौषधी शोधून काढायचे आणि नंतर पदवी मिळवायचे. बारा वर्षे अभ्यास केल्यावर येथे दीक्षा मिळायची, असे अनेक संशोधनांतून निष्पन्न झाले आहे.
जगात इ.स.पू 500 वैद्यकीय शास्त्राची परंपरा नसतांना सुद्धा तक्षशिला हे आयुर्वेद विज्ञानाचे सर्वात मोठे केंद्र मानले जात होते. परदेशी पर्यटकांच्या लेखांवरून हे समजते की, येथील पदवीधर मेंदू आणि आतड्यांवरील शस्रक्रियाही अगदी सहजपणे करत असत. साध्या आणि योग्य वापराच्या औषधी वनस्पती अनेक असाध्य रोगांवर उपचार करण्यासाठी वापरत असत.
याशिवाय सर्वांना अनेक दुर्मिळ वनौषधींचे ज्ञानही होते. शिष्य आचार्यांच्या आश्रमात राहून अभ्यास करत असत. एका शिक्षकाकडे अनेक विद्यार्थी राहत असत. त्यांची संख्या सहसा शंभरपेक्षा जास्त होती आणि कधीकधी पाचशे पर्यंत पोहचायची. अभ्यासात प्रात्यक्षिक कामाला जास्त महत्त्व दिले जात असे. विद्यार्थ्यांना त्या वेळी सुद्धा परदेशात जायला लागत असे. शिक्षण पूर्ण झाल्यावर परीक्षा घेण्यात येत असे.
तक्षशिला विद्यापीठातून पदवीधर होणे हे त्याकाळी अभिमानास्पद मानले जात होते. येथे गरीब आणि श्रीमंत अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची व्यवस्था होती. श्रीमंत विद्यार्थी आचार्यांना भोजन, निवास आणि अभ्यासाची फी भरत असत आणि गरीब विद्यार्थी शिक्षण घेताना आश्रमाचे काम करत असत. ते शिक्षण पूर्ण झाल्यावर फी भरण्याचे वचन देत असत.
प्रसिद्ध विद्वान, विचारवंत, मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ चाणक्य यांनीही आपले शिक्षण येथेच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी येथे अध्यापनाचे काम सुरू केले. इथेच त्यांनी अनेक पुस्तकांची रचना केली. पूर्व आणि पश्चिमेकडून येणारे मार्ग एकमेकांना मिळतात अश्या ठिकाणी या विद्यापीठाची जागा होती.
इसवीसन 1863 मध्ये जनरल कनिंघम यांनी या शहराचा शोध घेतला. जमिनीखाली दबलेले अवशेष शोधून काढले.
पुढे 1912 ते 1929 पर्यंत सर जॉन मार्शल यांनी उत्खनन करून ह्या शहराचा इतिहास जगासमोर मांडला.
ई . पू. 4 च्या आसपास या मार्गाने भारतावर परकीय हल्ले सुरू झाले. परकीय आक्रमकांनी या विद्यापीठाचे खूप नुकसान केले. शेवटी 6 व्या शतकात आक्रमणकर्त्यांनी ते पूर्ण उध्वस्त केले.

– लेखन : प्रकाश फासाटे. मोरोक्को
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
जगातील पहील्या विद्यापीठाचा गौरवशाली इतिहास सुरेख सांगितलाय.