आज, २१ फेब्रुवारी. हा दिवस जागतिक मातृभाषादिन साजरा करण्यात येतो. या मागचे कारण असे आहे की, धर्माच्या आधारावर भारताची फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झाले. या पाकिस्तान च्या १९४८ साली झालेल्या संविधान सभेत उर्दू भाषेला राजभाषा म्हणून घोषित करण्यात आले पण इतर भाषांना हा अधिकार/दर्जा नाकारण्यात आला. यामुळे तेव्हाच्या पाकिस्तानचा भाग असलेला, बंगाली बहुल पूर्व पाकिस्तान (आताचा बांगला देश) पेटून उठला. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी ढाका विद्यापीठातील बंगाली भाषिक विद्यार्थ्यांनी उग्र आंदोलन केले. या आंदोलक विद्यार्थ्यांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात ५ विद्यार्थी ठार झाले. पुढे याच भाषिक अस्मितेतून बांगला देश जन्माला आला.
मातृ भाषेसाठी दिल्या गेलेल्या लढ्याची आठवण म्हणून युनेस्को ने २००० साली २१ फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.
अशा या मातृ भाषा दिनाच्या निमित्ताने वाचू या, जेष्ठ कवयित्री स्वाती दामले यांची कविता.
आपणा सर्वांना मातृ भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मातृभाषा दिनाचा
बोलबाला झाला
वर्तमानपत्रांनीही
लेखा-जोखा मांडला
तरुणाईपुढे फेकल्या
प्रश्र्नांच्या कांही फैरी
पाहण्यास उत्सुक सारे,
उत्तरे काय देतात सारी ?
शहरी आणि ग्रामस्थांना
ज्ञानेश्र्वर होते ज्ञात
श्यामची आई नि सानेगुरुजीही
नव्हते हो अज्ञात
शिवकालीन मराठीची
लिपी होती मोडी
काॅलेजकन्याकुमारांना
वांड़्मयमंडळाची गोडी
युनिकोडनी आणली
इंटरनेटवर मराठी
लहानथोर सारेच
मग लिहू लागले ‘मराठी’
तरुणाईने घेतला आहे
मराठीचा ध्यास
स्पर्धा, वाचन, लेखनाद्वारे
मराठी जगविण्याची आस
इंग्रजीचा जरी वाढता रुबाब,
तरी मराठीला पर्याय नाही
समृध्द मराठी रंगभूमी
मराठी शिवाय चालणारच नाही
मराठी माणूस मायबोलीला
कधीतरी विसरेल काय ?
रक्तामध्ये ‘मराठी’ त्याच्या,
तिला अंतर देईल काय ?
पुढच्या पिढी पर्यंत आता
पोहोचवावी आपुली ‘मराठी’
म्हणून अमेरिकेत चालू केले
त्याने क्लासेस ‘मराठी’
श्र्लोक, कविता, बालगीतांनी
साधली सुंदर किमया
मराठी त्यांच्या ओठांवर
विलसली की लीलया
आतां नको उगीच खंत
कशी जगेल मायबोली
जशी भारतीय संस्कृती अमर,
तशीच मराठी अमर आपली

— रचना : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर प्रस्तुति. मातृभाषा भाषा दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा.