नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टलवर देश विदेशातील पर्यटन स्थळांविषयी नेहमी सचित्र, छान माहिती आपणास वाचावयास मिळते.
गेल्या काही दिवसातच महाराष्ट्र शासनाचे पुराभिलेख विभागाचे निवृत्त संचालक, ईतिहास संशोधक डॉ भास्कर धाटावकर, लेखिका राधिका भांडारकर यांनी अमेरिकेतील काही स्थळांविषयी लिहिलेले सुंदर लेख आपण वाचले.
आज वाचू या, अमेरिकेतील सातवे आश्चर्य अशी ओळख असलेल्या क्रेटर लेक विषयी. हे लेखन केले आहे दूरदर्शन चे निवृत्त उप महासंचालक श्री शिवाजी फुलसुंदर यांनी. या पूर्वी आपल्या पोर्टलवर आपण त्यांच्या वर लिहिलेला “आमची माती फेम शिवाजी फुलसुंदर ” हा लेख वाचल्याचे आठवत असेलच.
आज आपण त्यांचे लेखक म्हणून आपल्या परिवारात स्वागत करू या.
– संपादक
ओरेगॉन, अमेरिकेमधील “क्रेटर लेक” हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून जन्मलेलं एक नैसर्गिक आश्चर्य आहे .
हा लेक अमेरिकेच्या सात आश्चर्यांपैकी एक आहे.
हा विस्तीर्ण, निळ्या आणि नितळ पाण्याचा साठा असलेला जगप्रसिद्ध तलाव प्रत्यक्ष पाहण्यासाठी आम्ही सकाळी लवकरच निघालो.हा तलाव ओरेगॉन मधील पोर्टलंड शहरापासून नैऋत्य दिशेला 230 मैल म्हणजेच जवळपास 370 कि.मी. अंतरावर आहे. विस्तीर्ण आणि सरळ रस्त्यानं जाताना महामार्गाच्या दुतर्फा उंचच उंच झाडं आणि डोंगररांगांचं सुंदर दर्शन होतं.
साधारण चार तासांच्या प्रवासानंतर आम्ही क्रेटर लेक राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारावर पोचलो. भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वार आपलं लक्ष वेधून घेतं. आपल्याला त्याच्यासमोर सेल्फी घेण्याचा मोह अजिबात टाळता येत नाही.
क्रेटर लेक नॅशनल पार्कचे प्रवेशद्वार येथपासून तलावापर्यंतचा रस्ता कधी घनदाट जंगल तर कधी दूरवर दिसणारे निळेशार डोंगर आपलं मन उल्हसित करतात. असा हा लांबवरचा प्रवास करून आम्ही क्रेटर लेकच्या वॉचमन गेटवर पोचलो आणि समोरचा विस्तीर्ण, निळाशार तलाव पाहून मन तृप्त झालं, डोळ्यांच पारणं फिटल. जसं “निळ्या आभाळाचं रूप, विसावलं धरतीच्या माथ्यावरी.”
हा तलाव तयार होण्यापूर्वी येथे मझामा (Cascade Mountain Range) पर्वत होता. साधारणपणे 7700 वर्षांपूर्वी बारा हजार फूट उंचीच्या महाभयंकर प्रलयकारी ज्वालामुखीपासून हा क्रेटर लेक तयार झाला आहे. हा Cascade पर्वत रांगांच्या माथ्यावर पसरला असून त्याची खोली 1250 फूट इतकी आहे. तलावाचा व्यास सरासरी पाच मैल (आठ कि.मी.) पेक्षा जास्त आहे आणि पृष्ठभागापासून 2000 फुट पर्यन्त उंच खडक भिंतींसारखा वेढलेला आहे.
या तलावाचे “क्रेटर लेक राष्ट्रीय उद्यान” असे नामकरण 22 मे 1902 रोजी करण्यात आले. या तलावाच्या परिसरातील जंगलाच्या विविध छटांनी या तलावाला एक उत्कृष्ट रंगसंगती बहाल केली आहे. हे युनायटेड स्टेट्समधील नंबर एक आणि जगातील नववे, सर्वात खोल असे सरोवर आहे. येथील उत्साहवर्धक जंगल विविध वन्यजीव आणि विस्तीर्ण निळाशार लेक म्हणजे नैसर्गिक सौंदर्याची देणगी आहे.
निळाशार क्रेटर लेक तलाव पाऊस आणि बर्फ वितळल्यानं जे पाणी तयार होते यापासून बनला असल्यानं हा सर्वात स्वच्छ असा तलाव आहे. या तलावातून कोणत्याही प्रकारचे पाणी बाहेर जात नाही किंवा आत येत नाही. येथून एकही प्रवाह किंवा नदी तयार होत नाही. त्यामुळे पाऊस आणि बर्फ यापासून तयार झालेलं पाणी बाष्पीभवनाव्यतिरिक्त कुठे जातं हे एक आश्चर्य आहे. त्याचं संशोधन हे शास्त्रज्ञांपुढील एक मोठ आव्हानचं आहे.
वर्षानुवर्षे होऊन देखील या तलावाच्या तळाला गाळ जमा होत नाही म्हणूनच त्याचा निळा रंग आणि नितळ पाणी वर्षानुवर्षे असेच आहे. शिवाय हे पाणी इतके स्वच्छ आणि नितळ आहे की आपण 100 फुटपर्यंत सहज पाहू शकतो, त्याचप्रमाणे जवळपास 400 फूट खोलपर्यंत सूर्याचे किरण पोहचू शकतात.
गिर्यारोहण
क्रेटर लेक परिसर म्हणजे गिर्यारोहकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. येथे अनेक ठिकाणी नैसर्गिक वाटा (Natural Trails) असून त्यावरुन ट्रेक करणे म्हणजे एक आव्हानच असते. हिवाळ्यात प्रचंड थंडी आणि बर्फाचा पाऊस पडत असतो. त्यातून मार्गक्रमण करणे म्हणजे आपल्या सहनशक्तीची परीक्षा असते. या लेकच्या सभोवती ट्रेक करताना आपल्याला ह्या तलावाची विविध भागातून मनोहारी दृश्ये दिसत असतात. त्यामध्ये वॉचमन पीक, डिस्कवरी पॉइंट, माऊंट स्कॉट (Mt Scott), Sun Notch, Pinnacles व्हॅली Trail, Garfield Peak, Cleetwood Cove, Plaikini फॉल Trail ह्यासारख्या सौंदर्यवेधक पॉईंट्स जवळून पाहता येतात.
तलावाच्या मध्यभागी असलेल्या Wizard Island या बेटावर देखील स्वतंत्रपणे परवानगी घेवून सहल आयोजित करता येवू शकते.
“रिम रोड”
या तलावाभोवती एकूण 55 कि.मी.लांबीचा रिमरोड आहे. या रस्त्यावर वेगवेगळी 33 प्रेक्षणीय स्थळं असून या प्रत्येक पोईंटवरून आपल्याला तलावाचं विविधांगी रूप पाहता येते. या सार्या पोइंट्सना भेट देण्यासाठी गाडीनं कमीतकमी दोन तास लागतात. त्यामध्ये राखेचे उंचच उंच मनोरे, उंचावरून फेसाळत कोसळणारा विडिया धबधबा, झिजत चाललेल्या किल्ल्यासारखं रंगीबेरंगी दृश्य जे येथील ऐतिहासिक संस्कृतीची आठवण करून देते.
या तलावाचा शोध, जॉन हिलमन ह्या गिर्यारोहकाने लावला तो डिस्कवरी पॉइंट, यासारखी अनेक प्रेक्षणीय स्थळं आपल्याला या रिमरोडवरुन अनुभवायला मिळतात.
“रिम विलेज ”
क्रेटर लेकच्या नैऋत्य (साऊथ वेस्ट) दिशेला “रिम विलेज” क्रेटर लेकच्या कडेला वसलेल आहे. त्यामुळं रिम ट्रेल्स आणि व्हुपोइंट्स बध्द्ल मार्गदर्शन करण्यासाठी खूप सोईच आहे. रिम विलेजची इमारत म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमूना आहे. क्रेटर लेक नॅशनल पार्क मधील पर्यटन सेवांसाठी रिम विलेज हे मुख्य क्षेत्र आहे. येथे एक पर्यटक माहिती केंद्र देखील असून पर्यटकांना रिम विलेज मध्ये राहणे, नेचर ट्रेल, पार्किंग, क्रेटर तलावाबद्ध्लची संपूर्ण माहिती येथे पुरविण्यात येते.
“पिनाकल व्हॅली पॉइंट ”
रिमरोडच्या बाजूला साधारण अर्धा कि.मी.अंतरावर एक पायवाट आहे. येथून आपल्याला आकर्षक pinnacles म्हणजे ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेपासून बनलेले शंभर फूटापर्यंत उंचीचे “राखेचे मनोरे” पाहता येतात. ते राखाडी रंगाचे आहेत आणि ऊन, पाऊस, थंडी, बर्फ आणि प्रचंड वारा असूनही ते पहारेकर्यासारखे अखंड उभे आहेत.
येथे नोव्हेंबर ते एप्रिल पर्यन्त प्रचंड बर्फ पडतो. परिसरात त्रेचाळीस फुटांपर्यंत बर्फ जमा होतो. जास्तीत जास्त बर्फ पडणारा यूएसए मधील हा भाग आहे. क्रेटर लेकला जुलै ते सप्टेंबर हा काळ भेट देण्यास उत्तम आहे.
तलावाच्या पश्चिम दिशेचा सूर्यास्त म्हणजे एक नयनरम्य सोहळा असतो. डोंगर रांगामध्ये पाण्याच्या विस्तीर्ण पृष्ठभागावर होणारा सूर्यास्त डोळ्यांचं पारणं फेडतो. रात्रीच्या वेळी संपूर्ण नभांगन या तलावात आपली प्रतिमा पाहात असल्याचा भास होतो. आकाशगंगेसह सर्व तारे तारका आपलं प्रतिबिंब या नितळ, निळ्या पाण्यात आरश्याप्रमाणे न्याहाळत असतात.
अशी ही क्रेटर लेकची सहल आपण पुढील लिंक वर पाहू शकता.
क्रेटर लेकच्या नैसर्गिक सौंदर्याच्या आठवणी आपल्या मनावर अत्युच्च आनंदाची मोहोर उमटवतात आणि त्याच आठवणीत आपण आपला परतीचा प्रवास सुरू करतो.

– लेखन : शिवाजी फुलसुंदर.
निवृत्त दूरदर्शन उपमहासंचालक, नवी मुंबई. ह. मु.अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800
Waao excellent information We obtained. nice to see mr.fulsunder beautifuly presented all the information.. Love this