“बालाजी “
“आठवणीतील विद्यार्थी” या लेख मालेत आपण या पूर्वी महाविद्यालयीन / उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांबद्दल वाचले. आज मात्र एका शाळकरी विद्यार्थ्याबद्दल लिहित आहेत, जेष्ठ साहित्यिक, आदर्श शिक्षक तथा निवृत्त मुख्याध्यापक श्री नागेश शेवाळकर सर.
एखादा शाळकरी विद्यार्थी सुद्धा किती संवेदनशील असू शकतो हे, त्याच्याबद्दल सांगितलेल्या आठवणीवरुन दिसून येईल.
— संपादक
जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला आणि विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांनाच आनंदाचे भरते आले. सर्वत्र शाळेतील उपक्रमांची चर्चा सुरू झाली. या यशाला विविध वर्तमानपत्रानी भरपूर प्रसिद्धी दिली. शाळेची तपासणी जिल्हास्तरीय पथक करणार आणि आपली शाळा जिल्ह्यामध्ये नाव मिळविणार या गोष्टीचे गावकऱ्यांना फार अप्रूप वाटले. तालुका आणि जिल्ह्याच्या एका टोकाला असणाऱ्या ग्रामीण भागातील आपल्या शाळेने हे देदिप्यमान यश संपादन केल्याचे पाहून अनेक पालकांनी स्वयंस्फूर्तीने शाळेतील शिक्षकांचा भव्यदिव्य सत्कार घडवून आणला. प्रत्येकाने व्यक्तिशः अभिनंदन करून जिल्हा पथकासाठी शुभेच्छा दिल्या. त्यादृष्टीने करावयाच्या तयारीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन दिले.
आपुलकीने ओतप्रोत अशा सत्कारामुळे आम्हाला वेगळीच स्फूर्ती मिळाली. सर्व शिक्षक व अनेक विद्यार्थी आनंदाने तयारीस लागले. काही महिन्यांपूर्वी रंगविलेल्या आणि बोलक्या केलेल्या भिंतीना पुन्हा रंग देण्याचे काम चौथ्या वर्गातले विद्यार्थी करू लागले तर त्या भिंती सजविण्याचे काम स्वतः शिक्षक करीत होते. शालेय रेकॉर्ड हा आमच्या शाळेचा आत्मा! तो प्रत्येक क्षणी नेहमीच अद्ययावत असे. मार्च महिन्यात शाळा अर्धवेळ असूनही आम्ही सारेच दुपारी चार-पाच वाजेपर्यंत थांबून कामे करू लागलो.
जिल्हा पथकाची तारीख जाहीर झाली तशी आमची लगीन घाई सुरू झाली. अगदी झपाटून गेल्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो. त्यादिवशी दैनिक परिपाठ संपला आणि एक माता लगबगीने माझ्याजवळ आली. मला पत्रिका देऊन म्हणाली,
“गुरूजी, मुलीचं लग्न ठरलं आहे. सगळ्यांनी यायचं बरं.”
“वा ! वा ! नक्की! लग्न कधी आहे ?” मी विचारले.
“दहा तारखेला आहे.”
“दहा ? कसे जमणार ? अहो, त्यादिवशी आमचे मोठ्ठेसाहेब येणार आहेत.”
“होय. मला माहिती आहे. बालाजी हटून बसलाय…”
“त्याच्या बहिणीचे लग्न म्हटल्यावर तो येण्यासाठी हट्ट करणारच तुम्ही त्याला सोबत न्या. आमची काही हरकत नाही…”
“तसं नाही हो गुरूजी, अहो, तो लग्नालाच येत न्हाई म्हणतो, शाळेत यायचं म्हणतो.”
“काय ? बहिणीच्या लग्नाला येणार नाही ? का ?”
मी विचारत असताना आमच्यापासून काही अंतरावर घुटमळणाऱ्या बालाजी ला मी जवळ बोलावले आणि विचारले,
“बालाजी, का रे, तू बहिणीच्या लग्नाला जाणार नाहीस ?”
“नाही. सर, त्यादिवशीच आपले साहेब येणार आहेत…”
“अरे, पण…”
“सर, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीलाही गुण आहेत असे तुम्हीच सांगितले आहे. मी गैरहजर राहिलो म्हणुन एखादा गुण कमी झाला आणि शाळेचा पहिला नंबर आला नाही तर ?” त्याच्या त्या प्रश्नापुढे मी निरूत्तर झालो.
बालाजीच्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी शाळा तपासणीसाठी आलेल्या पथकाच्या निदर्शनास आम्ही ती बाब आणून दिली. पथक प्रमुखांनी बालाजीला बोलावून त्याला बक्षीस देत त्याचे कौतुक केले.
बालाजीसारखे विद्यार्थी हे आमच्या शाळेचे दैवत होते म्हणून आम्ही भरपूर यश संपादू शकलो हे निर्विवाद सत्य आहे.
— लेखन : नागेश शेवाळकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
