“सुलभा पंचवाघ”
महाराष्ट्रातली आताची, नाही पण मागची पिढी “पुलं देशपांडे” ह्या एका असामान्य व्यक्तीच्या प्रेमात पडली होती. पुलं हे अनेकांचे लाडके दैवत होते, आहे, कायम राहिलही….
अनेकांनी त्यांच्या लिखाणाची पारायणं केली असतील. सुलभा पंचवाघ ह्यांनीही केलीं. त्यांची पुलं वर भक्ती होती. त्यांना नेहमी खंत वाटायची की पुलं ची लोकप्रियता महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली. त्यांना ज्ञानपीठ मिळायला हवं होत, रविंद्रनाथ टागोरांसारखं त्यांच नांव भारतभर व्हायला हवं होतं ! अर्थात ह्या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत. मग आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार करत असता, त्यांच्या पतींनी त्यांना दिशा दाखवली आणि आता त्यांच्या पश्च्यात, त्यांच्या शब्दाखातर त्यांनी सुरू केले आहेत, पुलं च्या लेखनावरचे १ तासाचे एकपात्री, ॲानलाईन प्रयोग.
ध्येय एकच.. इतर भाषेतल्या भारतीय लोकांपर्यंत पुलंचे लिखाण पोहोचविणे !
झपाटल्यासारख्या त्या या त्यांच्या उपक्रमाच्या मागे आहेत. सुलभाताईंचा उत्साह थक्क करणारा आहे. वयाची ८० वर्ष उलटली तरी इतका उत्साह त्या कुठून आणतात ? पहा ना ..त्या आधी पुलंच्या लिखाणातला भाग निवडतात. त्याचा हिंदी अनुवाद करतात. पुलंचे लिखाण म्हणजे शब्दांच्या कोट्या आणि विनोदाची पेरणी ! ते हिंदीत इथल्या लोकांसाठी अनुवादीत करणे, पाठ करणे आणि १ तास एकट्यानीच मोबाईल वर झूम मिटींग मध्ये सादर करणे, हे अजिबात सोपे नाहीये. प्रेक्षक दिसत नाहीत. बंद खोलीत भिंतीकडे पहात १ तास अभिनय करायचा !…पण सुलभाताई ते करतात, सर्वांना आवडते. पुलं आता अनेक अमराठी लोकांना माहित झाले आहेत. ते एकत्र येऊन पुलंची जयंती, पुण्यतिथी अमेरिकेत साजरी करतात. आणि त्याचे सारे श्रेय सुलभाताईंना आहे.
सुलभाताई अनेक वर्षे अमेरिकेत जाऊन येऊन होत्या. त्यांच्या दोन्ही मुली इथे आहेत. सॅनहोजे इथे आहेत. इथे अमेरिकेतले सगळ्यात मोठे Indian Community Center (ICC) आहे. त्यांच्या तिथेच ४ शाखा आहेत. कधी प्रत्यक्ष भेटतात, कधी zoom मिटींग वर त्यांचे कार्यक्रम होतात. इथेच त्या one woman show करतात. पुलं च्या लिखाणातल्या व्यक्तीरेखा, “असा मी असा मी“, त्यांनी हिंदीत करून त्याचे अनेक प्रयोग केले आहेत. पुलंना प्रवासात भेटलेली माणसं, पुलंनी केलेलं, गंभीर चिंतन, त्यांनी केलेली प्रवास वर्णनं हेही सुलभाताईंनी हिंदीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले आहे.
सुलभाताई मुळच्या पुण्याच्या, सुलभा दळवी ! एम्ए पर्यंत त्यांनी कॅालेज मध्ये असतांना अनेक नाटकांत हौशे खातर काम केले. “लग्नाची बेडी”तली स्त्री, “एखाद्याचे नशिब” मधली ताई या भूमिका त्यांनी साकारल्या. नंतर मराठी व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी काही नाटकांत काम केले. ”दिवा जळू दे सारी रात“, “तो मी नव्हेच”, “अश्रूंची झाली फुले” “पद्मिनी” अशा अनेक नाटकांत त्यांनी काम केले .प्रभाकर पणशीकर, काशीनाथ घाणेकर, बबन प्रभू, शरद तळवलकर, चित्तरंजन कोल्हटकर यांच्या सारख्या मातब्बर नटांबरोबर काम करण्यांची त्यांना संधी मिळाली. इतकच नाही तर नाटकाचे लेखक कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, वसंत कानेटकर, हेही स्टेजवरची तालीम पहायला यायचे आणि मोठमोठे डायरेक्टर्स त्यांना लाभले होते. या सर्वांकडून त्यांना खूप शिकायला मिळाले, असे त्या आवर्जून सांगतात.
१९६४ मध्ये भारतीय विमानदलात अधिकारी असलेल्या अनंत पंचवाघ ह्यांच्याशी विवाह करून त्या दिल्लीला गेल्या. काही वर्षे तरी त्यांनी संसार सांभाळून नाटकांत काम केले. पण नंतर जबाबदाऱ्या वाढल्यावर हळू हळू त्यांनी काम बंद केले. त्यांच्या सारख्या बदल्या होत असत. तिथे त्या काही जमेल तेव्हा काही सामाजिक काम करत असत. कधी त्यांनी कॅालेजात शिकवून अवॅार्ड मिळवले, कधी ऊस तोडणीच्या कामगारांच्या मुलांसाठी साखरशाळेत काम केले, कधी पुणे आकाशवाणीवर न्यूज रिडर, अनाउन्सर म्हणून काम केले. कधी टिव्हीवर, तर कधी विविध भारतीच्या खूप जाहिराती रेकॅार्ड केल्या. कधी अंध विद्यार्थ्यांसाठी वाचन, मासिक तयार केले. काही वर्षे पुण्याच्या प्रसिध्द अलूरकर म्युझिक हाऊसच्या ॲाडिओ व्हिज्युअल एज्युकेशनल डिपार्टमेंटची डायरेक्टर म्हणूनही त्यांनी काम केले.
प्रत्येकाचा एक पिंड असतो. स्वभाव असतो, त्याची आवड असते. तो माणूस त्या क्षेत्राशीच जोडल्या जातो. अमेरिकेत आल्यावरही काही वर्षे आठवड्यातून ३ दिवस पंचवाघ दांपत्य कायझर हॅास्पिटलमध्ये व्हॅालेंटियर म्हणून जात होते. पण आता सुलभाताई सर्व जबाबदाऱ्यातून मुक्त झाल्यावर फक्त पुलं चे लिखाण यावर लक्ष केंद्रीत करून प्रयोग करत आहेत.
इतर वेळी आपल्या मुली, नाती, पतवंडांबरोबर आनंदात वेळ घालवत आहेत.
“प्रत्येक अवस्थेत सकारात्मक राहून आनंदी रहाणे महत्वाचे असे त्या मानतात. यशस्वी होण्यासाठी धावाधाव करून दुःखी होण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होऊन, आनंदी जीवन जगता येणे हे केव्हाही चांगले“ असे त्या मानतात.
त्याना पुलं चे प्रयोग करायला असाच उत्साह राहू दे अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊ यांत !
— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
आपली संस्कृती भरता बाहेर चालू ठेवणे आणि ती पण घर सौंसर चालून, आपण करत असलेल्या कार्याला आमचा प्रणाम व शुभेच्छा, मी गोरे सरांचा मित्र, कोथरूड,