Friday, December 27, 2024
Homeसंस्कृतीअमेरिकेतील क्रिसमस !

अमेरिकेतील क्रिसमस !

अमेरिकेमध्ये ऑक्टोबर च्या शेवटी येणारा हॅलोविन सण संपला की वेध लागतात थॅक्सगिव्हींगचे आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या क्रिसमसचे ! दसरा संपला की आपणही म्हणतो आली आता दिवाळी तसेच. नोव्हेंबर मधल्या तिसऱ्या आठवड्यातल्या गुरवारी थॅक्सगिव्हींग येतो. वर्षातून एकदा सर्व कुटूंबाने एकत्र येऊन आनंदात जेवण करणे आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टींबद्दल कृतज्ञता वाटते ती व्यक्त करणे अशी संकल्पना.

थॅक्सगिव्हींग संपला की मग मात्र सर्वत्र क्रिसमसचे वातावरण तयार होऊ लागते. लाल हिरव्या रंगांची सर्वत्र बरसात असते. मनमोहक रोषणाई, घराघरांसमोर उभी असलेली प्रकाशमान हरणं, सॅंटाक्लॅाज, स्नोमॅन, गिफ्ट बॅाक्सेस असं बरच काही. खरोखरी सर्वत्र सणाचं वातावरण वाटू लागतं. दुकानांमध्येही क्रिसमस चे सुमधुर संगीत मंद आवाजात सतत वाजते आणि एक प्रफुल्लित वातावरण सर्वत्र विलसू लागते.

एव्हांना थंडीने प्रचंड जोर धरलेला असतो. तापमान बऱ्याचवेळा शुन्य अंशा खालीच असतं. झाडांची पाने पूर्ण गळून काठ्या झालेल्या असतात. सूर्यदेवही कृपा करत नाही, त्यामुळे सर्वत्र धूसर वातावरण असतं. राखाडी निळसर आसमंत आणि त्यावर उभी असलेली निष्पर्ण झाडे यामुळे एकंदरीतच खूप उदास वातावरण असतं. अशावेळी काहीतरी उत्साहपूर्ण घडावं असं सर्वानाच वाटतं. प्रकाश कमी झाला की उदासी येतेच. मग त्यावर मात म्हणून सर्वत्र रोषणाई करायची, घरात क्रिसमस ट्री उभे करून त्यावरही दिव्यांच्या सुंदर रंगीत माळा सोडायच्या अशी पद्धत. शिवाय त्याला वेगवेगळे ॲारनमेंटस् लावायचे. त्याच्याखाली लाल मखमलीचे कापड अंथरून त्यावर सर्व भेटवस्तू ठेवायच्या. त्या झाडाच्या मागे लाल मोजे टांगायचे अशी सर्व तयारी घराघरातून चालू होते.

क्रिसमसच्या दिवशी आपल्याला मिळणाऱ्या भेटवस्तूंसाठी मुले खूप आतूर असतात.

कार्यालयांमधेही थोडीशी रोषणाई, टेबलावरची छोटी झाडे, एकमेकाना भेटवस्तू देणे हे चालू असते. याबाबतीत उत्साह असला तरी कामात थोडीशी शिथिलता येते. बऱ्याच लोकांचे कुठे कुठे जायचे मनसुबे असतात अशावेळी आहेत ती कामे संपवण्यावर भर जास्त असतो. नवीन सर्व, नवीन वर्षात असे एकंदर वातावरण असते.

शाळांमधे विशेषतः चौथी पर्यंतच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, अर्थात अभ्यासाचे वेळापत्रक सांभाळूनच. रेनडीअरसारखी शिंगे लेऊन इटूकली पिटूकली मुले खास लाल हिरव्या पोशाखात शाळेत समारंभासाठी हजर राहतात. गाड्यांनासुद्धा ही शिंगे बसवली जातात. उपहारगृहांमधले कर्मचारी सॅंटाच्या लाल टोप्या घालून धमाल करतात.

मुळात येशुचा जन्म हा मार्चमधला होता पण डिसेंबरमधे गोठवणाऱ्या थंडीत काही उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून हा सण तेव्हा करण्याची पद्धत सुरू झाली असं म्हणतात. मोठमोठ्या कार्यालयीन इमारतींसमोरही मोठी मोठी क्रिसमस ट्री व त्यावरील सजावट फार शोभून दिसते. सुंदर सुंदर रोषणाई तुम्ही स्वतःच्या गाडीत बसल्या बसल्या पाहू शकता अशी सोय केलेली असते. इथली माणसे महिनाभर फक्त क्रिसमसबद्दलच बोलत असतात. त्यांचा उत्साह पाहून आपणही त्यात नकळत सामील होतो. आमच्यासारखे लोक दिवाळी साठी केलेली रोषणाई वर्ष संपेपर्यंत तशीच ठेवतात, देश तसा वेष या तत्वानुसार. आपले घर सुशोभित दिसलेले कोणाला आवडणार नाही ?

मुलांसाठी विशेष गोष्टींचे आयोजन होते. मॅाल मध्ये दुकानांमधे देखावे तयार केले जातात. मुले चिमण्या हातांनी सॅंटा ला पत्र लिहून काय भेट हवी ते सांगतात आणि तिथल्याच मेलबॅाक्स मधे ते पोस्ट करतात. हि छोटी मंडळी अगदी निरागसपणे हे काम करतात ते पाहून फार गंमत वाटते. बऱ्याच ठिकाणी सॅंटाच्या रेंडीअर राईडस् असतात.

कोणी सॅंटा बनून त्यात बसलेला असतो आणि त्या घोडागाडींमधून मुलांना चक्कर मारून आणतो.त्यांच्या निरागस डोळ्यात फुलणारा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा असतो.

क्रिसमस म्हणजे खरेदीला उधाण ! तसे तर ते थॅक्सगिव्हींगच्या ब्लॅक फ्रायडे सेलपासूनच सुरू होते. सर्वत्र प्रचंड जाहिरातबाजी चालते. रस्त्यावरील होर्डींग्स, दूरदर्शनवरील जाहिराती, सर्वत्र क्रिसमसच दिसू लागतो. इतका भडीमार असतो की तुम्ही वेगळा विचारच करू शकत नाही. इथे अंतरे फार लांब आहेत त्यामुळे या काळात लोकं खरेदीला बाहेर पडले की वाहतूक नेहमीपेक्षा जरा संथ होते. दुकाने सोडून अनेक हॅालिडे मार्केटस् लागतात. यामधे विविध कलाकुसरीच्या वस्तू तसेच स्वतः हाताने बनवलेल्या वस्तूही विकल्या जातात. छोट्या विक्रेत्यांना याचा बराच फायदा होतो आपल्या कडच्या ग्राहक पेठांची आठवण होते. थंडीच्या काळोख्या दिवसात उत्साहाचे वातावरण तयार होते हे जरी खरे असले तरी या सर्वामुळे पर्यावरणाची हानी होत नाही ना याकडे थोडे पहायला पाहिजे असे राहून राहून वाटते.

लांबलांबच्या नातेवाईकांना भेटवस्तू पाठवायच्या तर तितके कागद, खोके, सेलोटेप, याचा वारेमाप वापर होतो. या निमित्ताने कागदाचा, पुठ्ठ्यांचा, प्लॅस्टीकचा प्रचंड वापर होतो. मिळालेली गिफ्टबॅगसुद्धा त्यातली भेटवस्तू काढून घेऊन कचऱ्यात फेकली जाते. कागदाच्या अती वापराचे कोणाला काहीच वाटत नाही असे दिसते. याविषयी काही पावले उचलता आली तर चांगले होईल. आपल्याकडच्या फटाक्यांना नावे ठेवताना मंडळी जेवढी उत्साहात असतात ती याविषयी काहीच बोलताना दिसत नाहीत किंवा उपाय सुचवताना दिसत नाहीत. सर्व वस्तूमधील पुष्कळशा वस्तूत प्लॅस्टीकचा वापर सढळपणे केलेला असतो. विविध समारंभात देखील फोम वा तत्सम गोष्टी वापरल्या जातात. आनंद साजरा करताना पर्यावरणपूरक बदल करता आले तर आनंद जास्त द्विगुणित होईल असं वाटतं.

एकंदरीतच वर्षातील सर्व शीण जाईल, असा हा अमेरिकेतील क्रिसमस असतो.

शिल्पा कुलकर्णी

— लेखन : शिल्पा कुलकर्णी. केंटकी, अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९