Thursday, September 19, 2024
Homeपर्यटनअमेरिकेतील गिरीप्रेमी गिरीश

अमेरिकेतील गिरीप्रेमी गिरीश

‘लाइफ इज हायकिंग ‘ म्हणणारे गिरीश देसाई एक उत्तम लेखक तर आहेतच शिवाय त्यांनी गिर्यारोहण, डोंगरवाटांमधील पदभ्रमंती याची खास आवड जोपासली आहे. 

श्री देसाई हे अमेरिकेत गेली २५-२६ वर्षे नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. पण ते स्वतःला ‘शिवाजीचा मावळा’ म्हणतात.

गिरीश यांचे लहानपणापासून महाराष्ट्रातील सह्याद्रीशी अतूट नाते निर्माण झाले आहे. पुण्यातील शाळेत शिक्षण घेताना, सहलीसाठी मुलांना गडकिल्ले पहायला नेत असतातच. ते त्यांना फार भावले. पुढे सतत गड-किल्ले चढून जाण्याचा निश्चय करून हरिश्चंद्र गड, सिंहगड, राजगड, तोरणा, विशाळगड असे जवळजवळ ४० किल्ले त्यांनी पदभ्रमण करीत पालथे घातले.

पुणे विद्यापीठातील संगणक शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर संगणक तज्ञ म्हणून ते काम करू लागले आणि अमेरिकेत जाण्याचा योग आला, तो चालून आलेल्या चांगल्या नोकरीमुळे.

अमेरिकेत प्रयाण केले, ते हृदयात सह्याद्री आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा घेऊनच. जॉर्जिया राज्याचा उत्तर भाग हा डोंगराळ असल्याने तेथेही अनेक डोंगरवाटा आहेत असे त्यांना उमजले. तेथेही गिरीश यांचे पदभ्रमण सुरू झाले.

ऍपलेशियन पर्वतरांग त्यांना खुणावू लागली. सुमारे ३५०० कि.मी. लांबीचा ऍपलेशियन ट्रेल, जॉर्जिया स्टेट येथील स्प्रिंग माउंटन येथे सुरू होतो आणि १३ राज्यांमधून वळसे घेत मेन नावाच्या राज्यात संपतो.
या ट्रेलवर सुमारे १६०० कि.मी.चालण्याचे साहस गिरीश यांनी केले. त्यामुळे त्यांचाआत्मविश्वास अधिकच वाढला.
पदभ्रमंतीसाठी जॉर्जिया अतिशय वैभवशाली आहे असे गिरीश सांगतात. येथील स्टेट पार्कस् किंवा धबधबे पाहण्यासारखे आहेत. निसर्गाचा आनंद घेण्याची अत्यंत आवड असल्यामुळे गिरीश यांनी फिरत फिरत जवळ जवळ पन्नास धबधब्यांचा आनंद घेतला आहे.

एव्हरेस्ट बेस कॅम्प

अमेरिकेतच काय, इतर देशातही जी प्रसिद्ध शिखरे आहेत ती चढून जाण्याचा निश्चय गिरीश यांनी केला. त्याप्रमाणे एकट्याने केलेला एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेल, आफ्रिकेतील अत्युच्च शिखर किलिमांजारो वरील गिर्यारोहण, पेरू देशातील अद्भुत इंका पायवाटेवरून माचू पिचू अशा अनेक शिखरांवर/डोंगरवाटांवर मजल-दरमजल करीत त्यांनी यशस्वी पदभ्रमण केले.

माचू पिचू

आफ्रिकेतील सर्वात उंच किलिमांजारो पर्वत चढण्यास अतिशय अवघड आहे. त्याची उंची ५८९५ मीटर आहे. हा डोंगर चढून जाण्यास गिरीश यांना सहा दिवस लागले.
“शिखरावर जाऊन तेथील नजारा ३६० अंशात पहाणे, हा एक सुखद अनुभव असतो. स्वतःला विसरून एक चिंतामुक्त चिंतन तेथे होऊ शकतं.” असे ते सांगतात.

किलिमांजारो शिखर

पर्वतारोहण करताना उन, वारा, पाऊस यांची गिरीश यांनी कधीच पर्वा केली नाही. आपण निसर्गाचाच एक भाग आहोत असे ते समजतात. कोसळत्या पावसातही डोंगर भ्रमंती करण्याची मजा त्यांनी अनुभवली आहे. जंगली प्राण्यांचा देखील कधी त्यांना त्रास झालेला नाही. ‘हे विश्वची माझे घर’ या नात्याने ते वागत असतात.

एप्लेशियन ट्रेल

संगणक क्षेत्रातील नोकरीमुळे गिरीश देसाई जरी आठवडाभर व्यस्त असतात, तरी त्यातील शनिवार रविवार त्यांनी भटकंती करण्यासाठी राखून ठेवलेले असतात. डोंगरवाटा आणि जंगले तुडवताना नेहमीच्या आवश्यक अशा मोजक्याच वस्तू त्यांनी बरोबर घेतलेल्या असतात. महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीने पोसलेल्या आपल्या शरीरावर त्यांचा विश्वास असतो.

लेखकाची भ्रमंती म्हटली की नेहमीच सोबत करते ती त्याची प्रतिभा ! डोंगरवाटा तुडवताना, जंगले पार करताना तेथील अनुभवांनी साहित्यातील एक वेगळी वाट गिरीश देसाई यांना मिळाली ती म्हणजे, गूढकथा आणि भयकथा यांची. त्यांचे या कथांचे पुस्तक ‘ताडोबाचे पडघम’ हे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकात भटकंतीत आलेले डोंगरदऱ्यांचे अनुभव डोकावतात आणि कल्पनेच्या भराऱ्याही जाणवतात.

शिक्षणाला विज्ञानाची जोड असल्याने गिरीश विज्ञानकथा देखील लिहू शकले आहेत. तसेच त्यांच्या सामाजिक आशय असलेल्या कथांनाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विज्ञान कथेच्या वाटेवर नव्या पिढीची वाटचाल व्हावी अशी सदिच्छा ते व्यक्त करतात आणि तरुणांना डोंगर किंवा गडकिल्ले चढून जाण्याचे साहस करायचे असेल तर मार्गदर्शन करायला सदैव तत्पर असतात.

अनेक उच्च शिखरे चढून गेल्यावरही गिरीश देसाई यांचे महाराष्ट्रातील किल्ल्यांचे आकर्षण कमी झालेले नाही. तेथे गेल्यावर शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची अनुभूती मिळते असे ते म्हणतात. देशोदेशीचे डोंगर चढताना मी मनातून त्यांना सलामी देत असतो असे ते भक्तिभावाने सांगतात.

मेघना साने

– लेखन : मेघना साने.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

श्रीकांत चव्हाण on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सुधीर थोरवे on दूरदर्शनची पासष्टी
अंकुश खंडेराव जाधव on देवेंद्र भुजबळ यांची फेर निवड
लता छापेकर on माझी जडणघडण : १६
Ravindra तोरणे on 🌺मोदक🌺