वसुंधरा पर्वते
नवरात्रीत अनेक प्रसार माध्यमातून समाजासाठी भरीव कार्य करणाऱ्या स्त्रियांची माहिती प्रसिध्द होत असते. काही ठिकाणी त्यांना पुरस्कार सुध्दा देण्यात येतात. पण बहुतेक वेळीं या नवदुर्गा महाराष्ट्रातील असतात.
पण मराठी पाऊल पुढे… या उक्तीप्रमाणे मराठी पाऊल जगात खरोखरच पुढे पडत आहे, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
जगात मराठी पाऊल खरोखरच कसे पुढे पडत आहे, याचे उदाहरण म्हणून तसेच या नवदुर्गांचा सन्मान म्हणून आपण आज पासून नऊ दिवस “अमेरिकेतील नवदुर्गा” ही लेख माला दररोज प्रसिद्ध करीत आहोत.
ही लेख माला लिहीत आहेत चित्रा मेहेंदळे. त्यांना अमेरिकेत अनेक अशा स्त्रिया भेटल्या, ज्या इथल्या प्रतिकूल परिस्थितीतही समाजासाठी काही काम करून, आपला खारीचा वाटा उचलत असतात आणि ह्या कुठल्याही प्रसिध्दी साठी न करता, एक ध्येय समोर ठेऊन, स्वतःची वेगळी वाट शोधून, आपलं काम करत असतात. ह्यात काही भारतातून निवृत्ती घेऊन मुलांबरोबर इथे रहात आहेत. तर काही आपली नोकरी सांभाळून समाजासाठी काही कार्य करीत आहेत. म्हणूनच त्यांची ओळख जगाला करून देण्याचा वसा चित्रा ताईंनी उचलला आहे, यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार आणि या नव दुर्गांच्या कार्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
– संपादक
वसुंधरा पर्वते…
“मूर्ति छोटी पण किर्ती मोठी” म्हणतात ना ..अशी ही व्यक्ती..
रूईया कॅालेजमधून गणित विषय एम ए झाल्यावर पार्ले येथील साठे कॅालेज मध्ये त्यांनी ३४ वर्षे गणित शिकवलं. खणखणीत आवाज, शिकवण्याची हातोटी आणि एक प्रकारचा दरारा..! काय बिशाद, विद्यार्थी काही गडबड करतील ! मलाही त्या शिक्षिका म्हणून होत्या, त्यामुळे अनुभवानी मी हे सांगतेय !
आता “पर्वते बाई” या “वसुंधराताई“ झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात इथे अमेरिकेत आल्यावर, त्यांच्या कर्तृत्वाचा आवाका कळला आणि त्यांच्या बद्दलचा आधी असलेला आदर शतपटीने वाढला.
वसुंधराताई मुळच्या मुंबईच्या दादरच्या, सुलभा शंकर देवधर ! प्राथमिक शिक्षक असलेल्या आईवडिलांच्या तालमीत तयार झालेल्या. संस्कार उत्तम.. मग ७ वी पर्यंतचे महापालिकेतले शिक्षण किंवा अहमद सेलर चाळीतले रहाणे …त्यानी काही फरक पडला नाही, आचरणात किंवा संस्कारात !
आवाजाची देणगी होती, शाळा कॅालेजातून वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या होत्या. त्यामुळे पुढाकार ,घेऊन भारतात त्या कायम कार्यरत होत्या. कॅालेजमध्ये असतांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय सहभाग घेऊन, परिषदेच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची “पहिला महिला सदस्य” असण्याचा मान त्यांनी मिळवला होता. सेवा निवृत्तीनंतर त्या पुण्यात रहायला आल्या.
त्याच सुमारास त्यांची दोन्ही मुलं अमेरिकेत आली होती. त्यावेळी परदेशी मुलांच्या पालकांची जी नृपो नावाची संस्था होती, त्यात, कार्यकारिणीत राहून त्यांनी संघटनात्मक काम तर केलेच, त्याच बरोबर “नृपो न्यूजजलेटर” या त्रैमासिकाची संपादक म्हणून त्यांनी ९ वर्षे काम केले.
वसुधराताईंना वाचनाची प्रचंड आवड आहे.त्यामुळे “भारतीय स्त्री जागरण“ या संघटनेत सक्रिय सभासद असतांना, तिथल्या “वाचक मंच” उपक्रमाची प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली, ते काम त्यांचे अजूनही चालू आहे.
देवधर कुलोत्पनाच्या देवधर मंडळाच्या कार्यकारिणीतही त्यांनी काम केले. अजूनही दूर राहूनही त्या मंडळाच्या संपर्कात असतात.
आधी अधूनमधून त्या अमेरिकेत यायच्या. पण २०१९ साली अमेरिकेन नागरिकत्व घेऊन आता त्या इथेच, कधी कोलंबस (ओहायो), कधी फॅास्टर सिटी (कॅलिफोर्निया) अशा, दोन्ही मुलांकडे रहात आहेत.
इतकी पूर्वपिठीका असतांना वसुंधराताईंना अमेरिकेत आल्यावर स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं.
अमेरिकेत आलेल्या पालकांच्या दोन तक्रारी असतात…
१) बाहेर जाता येत नाही आपल्या आपण, त्यामुळे कोणी बाहेर नेल्याशिवाय, बोलायला नसतं आणि
२) वेळ जात नाही.. वसुधराताईंनी ही सर्व परिस्थिती ओळखून, त्यावर मात केली आहे.
इथे त्यांनी आल्यावर, पाककलेवर ६ पुस्तकं लिहीली, सातवे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गांवर आहे.
पाककलेवर पुस्तक लिहीणे सोपे नसते. योग्य मापं हवी असतात. त्या पदार्थांचे गुणधर्म, चव, उपयोग अशी माहितीही हवी असते. म्हणून काही प्रयोग करावे लागतात. सर्व पदार्थ चांगले झाल्यावरच, त्या पदार्थाची रेसिपी लिहीता येते. विविध विषय घेऊन वसुंधराताईंनी ही पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे किती रूचकर, स्वादिष्ट, सत्कारणी वेळ, त्यांनी सुरवातीला इथे घालवला आहे, हे लक्षात येते.
डिजिटल माध्यमे कशी वापरायची हे त्यांनी शिकून घेतले आणि पंडिता रमाबाई, डॅा. आनंदीबाई जोशी, लक्ष्मीबाई टिळक यांच्या पुस्तकांवर, स्वतः लिहीलेले, एकेक तासाचे अभिवाचनाचे प्रयोग, मराठी आणि हिंदीतून, अमेरिकेत आणि भारतातही केले.
कोलंबस ओहायोमधे त्यांच्या मुलाने मराठी शाळा सुरू केली आहे. तिथे त्या दर रविवारी मुलांना शिकवायला जातात. BMM च्या अधिपत्या खाली होणाऱ्या मराठी शाळांच्या परीक्षा कमिटीत, त्यांनी चार वर्षे काम केले आहे. पुण्याच्या प्राची गुर्जर यांच्या यशोवाणी संस्थेत, त्या दृष्टीहिन मुलांसाठी पुस्तकं, ध्वनी मुद्रण करून पाठवतात. (त्यांना गणिताचे पुस्तक नुसते वाचून दाखवता येत नाही, समजावून, शिकवल्यासारखीच फोड करून ते वाचावे लागते)
जुलै २३ पासून “वाचन व्रत” ३०+३ असा एक वॅाट्सॲप ग्रूप त्यांनी सुरू केला आहे. वेगवेगळ्या पुस्तकांचे २०/२५ मिनीटाचे वाचन त्यात होते. आता ८१६ वेगवेगळ्या ठिकाणची लोकं त्यांच्या पुस्तकाचा आस्वाद घेतात. अनेक चांगली पुस्तकं, त्यांच्यामुळे ऐकायला मिळाली आहेत. आता त्यांनी स्वतःचे YouTube चॅनेलही सुरू केले आहे. Vachan Vrat 30+3 या नावानी. त्यांत काही पुस्तकांचे वाचन त्यांनी केले आहे.
BMM च्या पॅाडकास्टच्या उपक्रमांत भाग घेऊन, त्यांनी अनेक कथांचे अभिवाचन केले आहे. सध्या त्या मराठी विकिपीडियासाठी मराठी साहित्यातील पुस्तकं, ध्वनिमुद्रित करून देण्याचे कामही करत आहेत.
आवाजाचा इतका सुंदर उपयोग करून सर्वांच्या सहवासात रहाणे, ही किती सकारात्मक गोष्ट आहे ना ? मागच्या वर्षीपासून अमेरिका, कॅनडा येथे राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी, दर बुधवारी १ तास “वाचन परिक्रमा“ नावानी त्यांनी एक ग्रूप सुरू केला आहे. गुगल मीटवर भेटून साहित्यावर गप्पा, चर्चा, पाहुण्या लेखकांना भेटवणे, काही चांगले, स्वतः लिहीलेले वाचून दाखविणे असे स्वरूप ग्रूपचे असल्यामुळे, २५/३० काना कोपऱ्यातल्या आम्ही बायका, एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या आहोत. इथे बोलायला मिळत नाही, हे वसुंधराताईंनी चुकीचं ठरवलं आहे. आठवड्याच्या गप्पा त्या एक तासात आणि नंतर वॅाट्स ॲपच्या ग्रूपवर होतात. हे पण एक प्रकारचे समाजकार्यच त्या करत आहेत.
शिवाय, लेखन, वाचन, शिवणकाम, भरतकाम, कलाकुसर ह्यासाठी त्या वेळ कसा काढतात हे, त्यांच्याकडूनच शिकायला पाहिजे. वयाची ८० वर्षे ओलांडल्या नंतरही इथे, इतकं विविध प्रकारे सातत्य सांभाळत कार्यरत रहायचे, सर्वांच्या संपर्कात रहायचे, सर्वांना बरोबर घेऊन, त्यांच्यासाठी उपक्रम सुरू करायचे, हे इतके सोपे नाही. म्हणूनच त्यांचा आदर्श समोर असावा, इतरांना कळावा, असे वाटले.
त्यांना त्यांच्या पुढील सर्व उपक्रमांसाठी खूप शुभेच्छा !
— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अतिशय छान उपक्रम. परदेशात भारतीय संस्कृती जागर चालू ठेवणाऱ्या मातांचा परिचय अनेकांना प्रेरणा देवू शकतो. सर्व सहभागी मातांना हृदयपूर्वक वंदे मातरम्.
वसुंधरा ताईंची अधिक नव्याने ओळख झाली. कर्तृत्वाचे किती धुमारे असावे? फारच छान लेख चित्राताई!
मस्त माझ्या चिरतरुण काकूच्या कर्तृत्वाविषयी मला असलेलं कौतुक चित्राताईंच्या लेखामुळे द्विगुणित झालं,proud of you kaku
सुलभा बद्दल सहज सुंदर वर्णन तिच्या कार्याचा छान आढावा वाचूनआनंद झाला.माझी जिवलग सखी नवदुर्गा म्हणून सर्वांच्या कौतुकाला पात्र ठरली ही अभिमानाचीच गोष्ट आहेआम्हामैत्रिणींसाठी.चित्राचे कौतुक वआभार.
वयाची केवळ 80 वर्षेच असलेल्या तरुण वसुंधरा ताईंच्या अनेकविध उपक्रमांची आणि अत्यंत उत्साही व्यक्तिमत्त्वाची ओळख चित्राताईंनी फारच सुंदर करून दिली आहे.
अमेरिकेमध्ये इथून गेलेल्या वयोवृद्ध व्यक्तींना वेळ कसा घालवायचा, एकटेपण कसं घालवायचं हा मोठाच प्रश्न असतो. त्याच्या वरचा उपाय वसुंधरा ताईंनी स्वतःच्या कृतीतून समजावून दिला आहे.
परदेशात राहून या वयातही किती प्रकारच्या गोष्टी त्या करत आहेत हे सारं थक्क करून सोडणारं आहे.
खरोखरच त्यांचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे.त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देऊ दे ही त्याला
प्रार्थना.
चित्रा ताईंनी सहज प्रवाही भाषेमध्ये हा परिचय लेख फार सुंदर लिहिला आहे.
चित्रा तुझ्या अभ्यासपुर्ण लेखा मुळे, पर्वते मॅडम बद्दलचा आदर व कौतुक किती पटीने वाढले.
वसुंधराताईंचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. अमेरिकेतील वास्तव्यात त्यांनी चालवलेले सर्वच उपक्रम खूप वाखाणण्यासारखे आहेत. आपण त्यांना दिलेली नवदुर्गा ही उपाधी अत्यंत योग्य आहे. वसुंधराताईंची ओळख करून दिल्याबद्दल आपल्मयाला मनःपूर्वक धन्यवाद.
वसुंधराताईंनी कुशलतेने नवनवीन क्षेत्रांत प्राविण्य मिळवले ही प्रेरणादायक कथा.