मानसी पालकर
आज भारतात आणि सर्वच मराठी बांधवांना ‘मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळाला’ म्हणून आनंद होत आहे. तसाच आनंद अमेरिकेत नव्यानी आलेल्या मराठी कुटूंबाला होतो, जेव्हा त्यांना कळतं, अमेरिकेत अनेक ठिकाणी रविवारी सकाळी मुलांसाठी मराठी शाळा असतात तेव्हा !
मानसी ताईंना सियाटल मधल्या गुरुकुल संस्थेत, “मराठी भाषा रविवार शाळा“ सुरू करण्यासाठी २०११ मध्ये आमंत्रण आलं. तिथे संस्थापक सदस्य झाल्यानंतर शाळेसाठी त्यांनी ७ वर्षे मनापासून, झटून काम केले. १५/२० शिक्षकांना मार्गदर्शन करून तयार करणे, मराठीत १४ पुस्तकं लिहिणे, आपल्या भाषेच्या विकासाबरोबर सांस्कृतिक परंपरा व साहित्याची, नाटकासारख्या प्रिय कलेची उत्तम सांगड घालणे ह्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केला.
मला आश्चर्य वाटले, मला जेव्हा कळले कि अमेरिकेत “शाखा” आहेत .सियाटलमध्ये तर अशा ५ फॅमिली शाखा, वेगवेगळ्या ठिकाणी आठवड्यातून एक दिवस भरतात. मिस्टर श्रीकांत पालकर अमेरिकेच्या नॅार्थ विभागाचे संघचालक (अध्यक्ष) आहेत. मानसी ताई त्यांच्याबरोबरीने काम करतात. ही शाखा म्हणजे HSS…हिंदू स्वयंसेवक संघ.
मानसी ताई म्हणतात, ”समाजात वेगवेगळे भाषिक गट आपापल्या राज्याशी संबंधित कार्यक्रम करीत असतात. पण परदेशात अजून वेगळी, आपली धर्मसहिष्णू जीवनपध्दती, आपली ऋषी मुनींनी घालून दिलेली शास्त्रीय आधारभूत सणवार, विचार, सहज उच्च विचारांनी प्रेरित अगणित व्यक्तिमत्वे यांची देणगी कळायला नको का ? हवीच. मग आपल्या माणसांना “एकत्र माणूस“ म्हणून जोडण्याचे काम हिंदू स्वयंसेवक संघ करते. इथे अमेरिकेत फॅमिली शाखेत आई, वडिल , मुलं सगळी एकत्र जमतात. त्यांच्या बरोबर काम करत असताना अनेक संधी मिळतात. सखी संमेलन हे त्यातलेच एक. बौद्धिक, भावनिक, शारीरिक स्वास्थ्य, निखळ आनंद मिळणारे खेळ, योगासन, नृत्य प्रकार इथे होतात ! त्यामुळे इथे खूप ओळखी झाल्या आणि अनेकांशी मैत्री, या संघाच्या कामामुळे झाली”
मानसीताई माहेरच्या निवेदिता कुलकर्णी. जन्मापासून मुंबईकर. वयाच्या चाळीशी नंतर दोन्ही मुलींच्या शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत सियाटल शहरी राहायला आल्या. इथे आता सतरा वर्षे झाली. अधूनमधून राहायला, प्रवासाला येणे आणि इथे स्थायिक होणे, एक नागरीक असणे हा प्रवास खरं तर खडतरच असतो. पण घर लावणे, स्वयंपाक, गाडी चालवणे या गोष्टी त्यांनी सहजी जमवल्या आणि त्या इथे रूळल्या. मुख्य असते अमेरिकन जीवनाशी नाळ जोडली जाणे. इथे राहायचे तर त्याची समज असली पाहिजे. त्यांचे व्यवहार, समाजात वावरताना भाषा, पद्धती खूप वेगळ्या. इथे सगळ्या देशातले सगळे लोक, आपल्या त्यांचे खानपान, बोलण्या वागण्याच्या पद्धती याचा परिणाम शहरांवर, गावांवर असतो.हे लोक आपल्याशी संवाद साधताना विचारतात, तुमचे काय असते हो विशेष ? तुमची भाषा, संस्कार, तत्व काय ? मग आपल्या भारतीय धर्म आणि संस्कृती चा वारसा सांगणे आणि पाळणे आवश्यक आहे हे त्यांच्या लक्षात आले.
”इथे आलेल्या हुशार पण नव्या पिढीला अनेक “असे का ?“ची उत्तरे देता येणे कठीण होते. त्यांच्या मुलांना भाषा, अन्न, मान मर्यादा शिकविणे याची गरज समजायला लागली असावी , म्हणून weekend bhasha classes सुरू झाले. भाषा, मग सांस्कृतिक कार्यक्रम या बरोबर छान रंगीत पेहराव याने भारतीय माणसे उठून दिसली…” असे आजच्या इथल्या पिढीबद्दल मानसीताई सांगतात.
इथल्या गरजू समाजाला अन्न बनवून खायला देणे, प्रसूत मातांना डिंक लाडू, मेथी लाडू, अळीव लाडू करून देणे असे काम त्या सेवावृत्तीने करतात. कोविड काळात आपल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करणे, धीर देणे हे त्यांच्या यजमानांच्या साहाय्याने त्यांनी केले. कोविड काळात मुलांना इंग्रजी, हिंदी व मराठीत ऑनलाईन गोष्टी सांगितल्या, नंतर मराठीत त्याचे you tube Chanel झाले.
”हे करतांना खूप मजा येते अजूनही. I am a proud storyteller. माझ्या नातवंडांना, मुलींना गोष्टी ऐकवल्या आणि त्याचे सहर्ष स्वागत झाले.” असे त्या अभिमानाने सांगतात.
किती विविध गोष्टी त्या इथे करताहेत !इथे मराठी पद्धतीने पूजा अर्चना, विधी करायला आचार्य मिळत नाहीत. खूप मनात यायचे त्यांच्या म्हणून त्या भीष्म प्रतिष्ठान आयोजित पौरोहित्य शिकल्या आणि अधिकृत पौरोहित्या झाल्या. “वास्तुशांती, सत्यनारायण, भूमीपूजन असे श्रावण महिन्यापासून सुरू केले आहे. आमचे सहाध्यायी अमेरिका आणि इतर देशातून आहेत. त्याचा एक मोठा गट झाला आहे. आम्ही एकमेकांना मदत करतो. शिवाय एक हृदयाच्या जवळचे काम चालू आहे…ते म्हणजे AUM School.अमेरिकेत त्यांच्या नेहमीच्या शाळेबरोबरच सनातन धर्माचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने Aum School अनेक शहरात सुरू होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इथल्या छोट्या छोट्या मुलांबरोबर शिबिरं घेणे ! गेली तीन वर्षे आम्ही काही जण दशवतार,श्रीराम अशा संकल्पनां वर शिबिरामधून संस्कृत श्लोक, भजने, गाणी, चित्रकला, हस्तकला, योग घेतो. अनेक गोष्टीत, ”असे का करतात” ? .. ते सांगतो. नाटुकले,आयुर्वेद, तालवाद्य अशा गोष्टी मुलांना शिकवतो. पालकांचे छान सहकार्य आहे. हा व्याप वाढावा असे प्रयत्न चालू आहेत. तर असे गेल्या काही वर्षात घरचा व्याप सांभाळून, आला गेला पै पाहुणा सरबराई, वेगवेगळ्या प्रकारची नोकरी करत, समाजजीवनाचा अनुभव घेत आहे.
बागकाम करणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहेच तो पाळत, मस्त जीवनाचा आनंद घेत आहे. दर एक दोन वर्षांनी भारत भेटीचा प्रसंग येतो. मातृभूमीतील सकारात्मक ऊर्जा भरून इथे कर्मभूमी वर कार्य करत राहणे, हे ध्येय आहे”
मानसीताईंचे हे विचार ऐकून आणि त्यांचे कार्य पाहून थक्क व्हायला होते. समाजाचे आपण देणे लागतो , हे त्यांना भेटलेल्या प्रत्येकाला वाटते आणि तो त्यांच्या कार्याशी नकळत जोडला जातो. त्यांच्या पुढील सर्व उपक्रमांना खूप खूप शुभेच्छा !
— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800