Wednesday, January 29, 2025
Homeयशकथाअमेरिकेतील नवदुर्गा : ६

अमेरिकेतील नवदुर्गा : ६

“अश्विनी क्षीरसागर”

२०२४ च्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या (BMM) संमेलनात घोषणा केली गेली की पुढच्या वेळचे, म्हणजेच २०२६ च्या संमेलनाचे यजमानपद सियाटलला मिळाले आहे आणि त्यावेळी सियाटल महाराष्ट्र मंडळाची अध्यक्षा अश्विनी क्षीरसागर हिने तो मानाचा झेंडा स्विकारला !

ज्या आत्मविश्वासानी हजारो लोकांसमोर अश्विनीने तो झेंडा स्विकारला आणि छोटेसे भाषण करून “सर्वांनी २६ साली संमेलनाला या“ असे आवाहन केले, त्यावरूनच तिचे नेतृत्व लक्षांत आले. त्या आधी ती मला भेटली, तेव्हा नऊवारी साडीत होती. लावणीच्या कार्यक्रमात नाचण्यासाठी तयार झाली होती. सियाटलचा “शिवा ढोल ताशा” ग्रूप प्रसिध्द आहे. तिचे पती विनय क्षीरसागर उत्तम ढोल वाजवतात आणि वाजवायला शिकवतात. त्या शिवा ढोल ताशा पथकात अश्विनी लेझीम, झांज वाजवते. तिचा उत्साह पाहून मला वाटले तिची मुलं लहान असतील. पण कॅालेजात जाणारी तिची मुलगी आहे, हे ऐकल्यावर मला आश्चर्य वाटले. नंतर कळलं की सामामीश देसी ऱ्हिदम नावाचा हौशी मातांचा ग्रूप आहे त्याची ती सदस्या आहे. सियाटलमध्ये अनेक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये हा ग्रूप लोकनृत्य सादर करतो.

सियाटल महाराष्ट्र मंडळ (SMM) “सारथी” नावाचा दिवाळी अंक प्रसिद्ध करीत असते. तो चाळत असतांना संपादक म्हणून अश्विनाचे नांव ! आत एक लेख, कवितासुध्दा ! गेली तीन वर्षे ती संपादक आहे. मराठी भाषेची, लेखनाची, कवितेची आवड आहे. तिने मराठी बरोबर काही हिंदी आणि काही इंग्रजी कविताही केल्या आहेत. लेखनाच्या आवडीमुळे मंडळाच्या कार्यक्रमाचे अहवाल लिहीण्याच कामही ती आवडीने, चोख करते.

अश्विनी मूळची पुण्याची ! तिने पुण्यात स्टॅटिस्टिक्स मध्ये बी एससी केले, नंतर कॅाम्प्युटर मॅनेजमेंट मध्ये पोस्ट ग्रॅज्यएशन केले. २ वर्षे सॅाफ्टवेअर ट्रेनिंग मध्ये काम केल्यावर, सॅाफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये नोकरी केली.

अश्विनी २००३ मध्ये सियाटलला आली. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यावर तिने सॅाफ्टवेअर सोडून दुसरी दिशा धरली. तिने मॅान्टेसरीमध्ये जॅाब स्वीकारला. गुरूकुल संस्थेच्या शाळेमध्ये ती १५ वर्षे व्हॅालेंटियर म्हणून काम करते आहे. तिथे ५ वर्षे तिने मुलांना हिंदी शिकवले. नंतर हिंदी कमिटीमध्ये अभ्यासक्रम मदतनीस म्हणून काम करत आहे. ह्या पदावर असतांना, तिने लेव्हल ५ आणि लेव्हल ६ ची दोन पुस्तके तयार केली. नुकताच १५ वर्षाची सेवा केल्याबद्दल संस्थेने पुरस्कार देऊन तिला गौरविले. गुरूकुल मध्ये १००० ते १२०० मुलं असतात. तिथल्या कामासाठी तिला दोनदा Above And Beyond असे पुरस्कार मिळाले आहेत.

अश्विनी गेली ३ वर्षे सियाटल मंडळाच्या कमिटीत आहे. ती मंडळासाठी मिडीया कम्युनिकेशनचे काम पहात आहे. वेब साईटचे काम पहात आहे. तिने अनेक कार्यक्रमांचे सुंदर सूत्र संचालन केले, मंडळामध्ये अनेक कार्यक्रम, संगीताचे कार्यक्रम, नाटक, मराठी सिनेमा आणणे, वगैरेचे उत्तम आयोजन तिने केले. मंडळांच्या पाहुण्यांचे आदरातिथ्य केले. योग्य तयारी, योग्य नियोजन, योग्य नेतृत्व, कामाचा आवाका, मृदू, शांत पण ठाम बोलणे, सात्विक सौंदर्य ह्यामुळे सियाटल मंडळांचे अध्यक्षपद तिला मिळाले यांत नवल नाही.

अध्यक्षपद मिळाल्यापासून अश्विनी अनेक कार्यक्रम, उपक्रम राबवित आहे. तिने ॲानलाईन कार्यक्रम, कार्यशाळा घेतल्या. रूचकर उपवास स्पर्धा, महिला दिनाला बाईपणाची कथा, मदर्स डे च्या दिवशी कुटूंबासाठी डोंगराळ भागात भ्रमंती आयोजित केली.

योग शिबिर घेऊन प्रथमच योगदिन सुरू केला. भोंडला-दांडिया असे अनेक नविन उपक्रम तिने सुरू केले आहेत. ती सध्या मंडळात ५०० होऊन अधिक मराठी कुटुंबांचे प्रतिनिधीत्व आणि नेतृत्व समर्थपणे करते आहे.
तिच्या ह्या सर्व उपक्रमांना आणि तिच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बीएमएम च्या संमेलनाला मनःपूर्वक शुभेच्छा !
क्रमशः

— लेखन: चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन:देवेंद्र भुजबळ
निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. अश्विनी क्षीरसागर यांचे कर्तृत्व आभाळासारखे उत्तुंग आहे.सुरेख लेखन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments