Thursday, November 21, 2024
Homeयशकथाअमेरिकेतील नवदुर्गा - ८

अमेरिकेतील नवदुर्गा – ८

“सुधा माटे”

आता जग अनेक गोष्टीमुळे जवळ आले आहे. अमेरिकेबद्दल आता भारतातल्या अनेकांना माहिती असते. पण सुधाताई माटे मुंबईतील पार्ल्यातून, जेव्हा १९७६ साली लग्न करून अमेरिकेत आल्या, तेव्हा त्यांना फारशी माहिती नव्हती. अमेरिकेत सर्वच भव्य दिव्य ! नविन !ते आनंदानी उपभोगण्यापेक्षा आधी प्रत्येक गोष्टीची भितीच जास्त होती.

अमेरिकेत गाडी चालवता येणे ही पहिली गरज आहे. जरी भारतातून ड्रायव्हिंगचे लायसन्स असले तरी इथले सर्वच नियम वेगळे, उलट सुलट असल्यामुळे, पहिल्यापासून अनेक गोष्टींचा श्रीगणेशा करायला लागतो.
सुधाताईंना पण परत लेफ्ट राईट करत ड्रायव्हिंग शिकायला लागले. त्यांनी भारतातून जे जे हॅास्पिटल मधून मास्टर्स इन मायक्रोबायोलिजी (research) केले होते. तरी १९७६ ते १९७८ पर्यंत त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. पण ७८ मध्ये इथली डिग्री घेतल्याशिवाय जॅाब मिळणे कठीण आहे हे कळल्यावर त्यांनी ASCP (अमेरिकेन सोसायटी ॲाफ क्लिनिकल पॅथोलॅाजी) ची मायक्रोबायोलॅाजी ची डिग्री घेतली. हॅास्पिटलमध्ये काम केले. microbiologist म्हणून हॅकन्सॅक मेडिकल सेंटर मध्ये (hackensack medical ctr) त्यांचा प्रवास सुरू झाला.

त्या काळात खूप वेळ असिस्टेंट सुपरवायझर म्हणूनही सुधाताईंनी काम केले. त्यांना शिकवण्याची हातोटी आणि आवड होती. त्यामुळे १९९० पासून, त्यांच्या विषयाची ६५ लेक्चर्स घ्यायला त्यांनी सुरवात केली.
त्या सुमारास ब्लड बॅंकेत रक्ताची कमतरता असायची. सेंट्रल जर्सी ब्लडबॅंक ड्राईव्ह करत असे. त्यांना मदत करणे सुधाताईंना जरूरीचे वाटायचे. त्या आपला थोडा वेळ त्या साठी देत असत. मेडिकल एक्सप्लोअर चा एक हॅास्पिटल प्रॅाजेक्ट होता, त्यालाही त्या आठवड्यातून ४ तास मदत करण्यासाठी जात होत्या. हॅास्पिटलच्या मुलांना करियरचे मार्गदर्शन करण्याचा हा प्रॅाजेक्ट होता. वेगवेगळ्या व्यवसायातील तज्ञांना आणून त्यांना मार्गदर्शन करणे, माहिती देणे, त्यात आवड निर्माण करणे हा त्या मागचा हेतू होता. ह्या दोन्ही प्रॅाजेक्टमध्ये ५-६ जणांचा सहभाग होता. हे सर्व काम स्वयंसेवा म्हणून त्या करत होत्या. पण त्याचा त्यांना नकळत फायदा झाला. त्यांना क्लिनिकल लॅडरची हाय्यर रॅंक लवकरच मिळाली.

सुधाताईंना नविन गोष्टी शिकण्याची आवड आहे. त्यासाठी कितीही कष्ट करायची त्यांची तयारी असते. १९९९ च्या सुमारास त्यांची दोन्ही मुलं कॅालेजसाठी बाहेर गेली. त्यामुळे रिकामपण जाणवायले लागले. त्या सुमारास कॅाम्पुटर बाळसं धरायला लागला होता. अनेक क्षेत्रात त्याने शिरकाव केला होता. सुधाताईंना पण त्याची गोडी लागली. त्यांनी चक्क त्यासाठी रितसर शिक्षण घेतले. 2 वर्षाचा कोर्स सुरू केला. ते कॅालेज संध्याकाळी ६ ते रात्री १० असायचे. दिवसभर जॅाब करून, इतका वेळ कॅालेज करणे, त्यांनी जमवले. “पॅावर पॅाईंट शिकल्याचा मला खूप फायदा झाला. माझी सर्व लेक्चर्स मी पॅावरपॅाईंटवर सुरू केली. मला २००१ मध्ये अॅारलॅंडो मध्ये कॅान्फरन्स (ASM) साठी जाण्याची संधी मिळाली. तिथे पॅावर पॅाईंटवर पोस्टर तयार करून, मी सादर करू शकले, ह्याचा मला खूप आनंद झाला” असं त्या अभिमानाने सांगतात. “नंतर २०१४ च्या सुमारास नवीन सुपरवायझर आल्यावर तिला माझी सर्व तयार पॉवरपॉईंट लेक्चर्स हवी होती. मी त्यावर खूप वेळ घालून तयार केली होती. मला माझ्या प्रिंसिपलसाठी त्यावेळी खूपच झगडावं लागल. including चीफ ऑफ pathologist. फाइनली मला माझी सर्व लेक्चर्स मिळाली.” असेही काही अनुभव येतात हेही त्यांनी सांगितले.

सुधाईंचा न्यूट्रीशन हा सुद्धा जिव्हाळ्याचा विषय आहे. कॅाम्प्युटर बरोबर त्या एक वर्ष न्यूट्रीशन शिकण्यासाठी नाईट कॉलेजला गेल्या. इस्टेट एजंटचा अभ्यासक्रमही त्यांनी हौस म्हणून केला. परिक्षा दिल्या, पण त्या व्यवसायात त्या रमल्या नाहीत. त्यांना चित्रकलेची उत्तम जाण आहे. पेंटिग शिकायलाही त्या जात होत्या. विणकाम शिकून उत्तम करायला लागल्या. त्यामुळे त्या कायम बिझी रहातात. त्या सांगतात, “CHWF हा आमच्या मित्रांचा उपक्रम.. चाईल्ड हेल्थ वेलफेयर फाउंडेशन, १८ वर्षे चालू आहे. एकदा CHWF ला फंडिंगची गरज होती. तेव्हा गोल्फ आऊटिंग्ज करुन मिस्टरांच्या बरोबर रजिस्ट्रेशनसाठी वगैरे मदत करत होते. आता CHWF ने eye हॉस्पिटल वाराणसी मधे काढले आहे. तिथे गरीब लोकांच्या eye surgery होतात. शिवाय महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रमही सुरू आहे. शॉर्टहॅंड, कंप्युटर, शिवणकाम, टायपिंग, हिना वर्क बायकांना शिकवले जाते.

२०१४ मधे ज्ञानप्रबोधिनीच्या मुलांच्या कॅम्पला दहा दिवसासाठी मेडिकल केअर साठी महाराष्ट्र फाऊंडेशन तर्फे आम्ही गेलो होतो. तो अनुभव खूप छान होतां. मी मुलांचे हिमोग्लोबिन आणि चार्ट वरुन डोळे चेक करत होते, तर माझे मिस्टर डॅा. कृष्णा माटे (मुलांचे डॅाक्टर) पेडिएट्रिक चेकअप करण्यात बिझी होते.

आता ४२ वर्ष्याच्या microbiology च्या जर्नी नंतर २०२० पासून रिटायरमेंट आयुष्य सुरू झाले. ते मजेशीर enjoyable करण्यासाठी माझ्या nutrition पैशन नी पुन्हा डोके वर काढले व मी स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीचा ऑनलाइन न्यूट्रिशन कोर्स केला. त्याचा दैनंदिन आयुष्यात चांगलाच उपयोग होत आहे. दुसरी आवड म्हणजे योगा, प्राणायाम, मुद्रा आणि मेडिटेशन. त्याचेही ऑनलाईन योगा अलायन्स तर्फे सर्टिफिकेट घेतले.”

सध्या त्या सीनियर सिटिझन्सना फ्री शिकवत आहे. मिल्स ऑन व्हिल्स चे (Meals on wheels) काम झाल्यावर एक तास योग घेतात. तिथे सकाळी ७/७.३० पर्यंत त्या जातात. साधारण ४० जण तिथे जेवायला असतात व ८० जेष्ठ नागरिकांना डबे दिले जातात. जेवण करण्यासाठी, डबे भरण्यासाठी, मदत म्हणून त्या जातात. १०/१०.३० पर्यंत ते काम संपल्यावर तिथे आलेल्या जेष्ठांना त्या चेअर योग, मेडिटेशन सेवा समजून शिकवतात. त्यांच्या डेवलपमेंट मध्ये ही योगाचं फ्री क्लासेस घेतात. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चायनीज गेम majong खेळतात. तो खूपच ब्रेनला चालना देतो. टेनिस खेळतात, पोहतात.

अटलांटिक इथे जेव्हा BMM चे संमेलन झाले तेव्हा, माटे कुटूंब food कमिटीत होते. न्यू जर्सी येथील अनेक मराठी कार्यक्रमातही ते दोघे मदतीला असतात. वैद्यकीय सल्ला तर देतातच, पण इतरही कुठल्याही मदतीसाठी ते दोघे नेहमी तत्पर असतात. त्यांच्या शांत स्वभावा प्रमाणेच, त्या शांतपणे, फारसा गाजावाजा न करता आपले सेवा करण्याचे काम करत असतात.

माझ्याशी बोलतांना सुधाताई नी एक मोलाची गोष्ट सांगितली. त्या म्हणतात, ”हे सर्व काम मला खूपच आनंद देते. मला वाटतं आपली इच्छाशक्ती जोरदार असते, तेव्हा आपण काहीही करू शकतो. ह्या देशाने मला एक गोष्ट शिकवली. ती म्हणजे आपण आपल्या तत्त्वासाठी खंबीरपणे उभे राहू शकतो आणि आपली स्वप्न साकार करू शकतो. ज्यावेळी इथे आलो, तेव्हा मुलाना व्यवस्थित मार्गदर्शन करू शकू का ? हे खूप मोठे प्रश्नचिन्ह होते. आपण कठीण वेळेला मदतीशिवाय कसे राहू ? वगैरे… पण देवाच्या कृपेने आणि मित्रांच्या मदतीने सर्व ठीक झाले. पुढेही तसेच राहू दे .” सुधाताई देवाचे, मित्रांचे आभार कायम मानतात.

सुधाताई कायम अशाच कार्यरत रहाव्यात व नविन गोष्टी शिकत, शिकवत आनंदात राहोत म्हणून त्यांना खूप शुभेच्छा !
क्रमशः

— लेखन : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments