“येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा”
अशी फेर धरत मुले जेव्हा गाणे म्हणू लागतात तेव्हा पावसाळा सुरू झाल्याची लक्षणे दिसू लागतात.
पूर्वीच्या काळी जून महिना उजाडला आकाशात काळ्या मेघांनी दाटी केली की यंदाचा पावसाळा सुरू झाला असे गृहीत धरले जायचे. जून ते सप्टेंबर पाऊस भरपूर पडून नद्या, तलाव, ओहोळ दुथडी भरून वाहायचे. हेच पाणी भूपृष्ठाखाली झिरपले जायचे आणि तेच पाणी वर्षभर शेती काम व घरगुती वापरासाठी पुढच्या पावसाळ्यापर्यंत पुरवले जायचे.
हल्ली मात्र पावसाचा आणि ऋतूमानाचा काहीच धरबंध राहिलेला नाही. ‘काल झालेल्या वादळी पावसाने फळबागांचे नुकसान’ किंवा ‘परवाच्या गारपिटीने आंब्याचा मोहर गळून पडला’ अशा वर्तमानपत्रातील बातम्यांनी मन सुन्न होते. अवेळी येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. देशाला अन्नधान्य, फळफळावळ यांचा तुटवडा भासत आहे. यामुळे महागाई गगनाला भिडली आहे.यामुळे सर्वसामान्य माणूस भरडला, होरपळला जात आहे. अवेळी येणाऱ्या पावसाला, वादळी वाऱ्यासह होणाऱ्या गारपीटीला मनुष्यच जबाबदार आहे.
विज्ञानाच्या शोधामुळे आधीच मानवी लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ‘जन्मदर जास्त नि मृत्युदर कमी’ यामुळे दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तूंचा तुटवडा भासत आहे. परंतु ज्या लोकांना पुरेसे अन्नधान्य नसेल तर महागाई वाढणार व आपल्या गरजा भागवण्यासाठी परदेशातून बऱ्याच गोष्टी आयात कराव्या लागणार आणि गरीब वाढतच जाणार.
आता याचवर्षी काय झाले ? जूनमध्ये पहिल्याच आठवड्यात नेहमी येणारा पाऊस बरसलाच नाही. एकीकडे आकाशाकडे चातकाप्रमाणे डोळे लावून बसलेल्या बळीराजाचा पावसाने अपेक्षाभंग केला. पाऊस यावा म्हणून काही ठिकाणी गाढवाचे लग्न तर काही ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न करतात. पर्जन्ययागासारखे विधी केले जातात. पण अपेक्षेप्रमाणे पाऊस पडेल किंवा नाही, जेव्हा पडला तेव्हा काही शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी होत्या. काहींचे बियाणे रुजले नाही. विहिरीच्या पाण्यावर तग धरुन असणारे पिकही उद्ध्वस्त झाले.

एखाद्यावेळी वाटते की हा वरूणराजा संपूर्ण मानवजातीवरच नाराज आहे. त्यामुळे चिडून धरतीवर हल्लाच करत आहे. ‘रिमझिम झरती श्रावणधारा’ ऐवजी युद्धातील चवताळलेल्या ऐरावताप्रमाणे त्याची धून बरसत होती आणि पडणारा थेंब हा पाण्याचा नसून जणू आगीचा आहे असे वाटत होते. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्याची झोळी खाली ती खालीच……
बियाणे पेरणीसाठी काढलेले कर्ज फेडायचे सोडून त्याला त्याच्या खर्चासाठी सावकारापुढे हात पसरावे लागतात. पुन्हा एकापाठोपाठ एक आत्महत्येची भर. हडबडलेल्या संभ्रमात पडलेल्या लोकांनी जागे होण्याची गरज आहे.हा काही निसर्गाचा प्रकोप नसून मानवाने स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने मारून घेतलेली कुऱ्हाड आहे. मानवाच्या या कृष्णकृत्याचे हे फळ आहे. परंतु जोवर माणूस जागा होत नाही आणि स्वतःची चूक सुधारण्याचा प्रयत्न करत नाही, तोवर हे नैसर्गिक आपत्तीचे संकट माणसावर कोसळणार आहे. आणि त्याखाली मानव जात भरडून जाणार आहे. ही नैसर्गिक आपत्ती तरी नाहीच. मानवापुढील यक्षप्रश्न अवकाळी पाऊस, सर्वांनी एकजुटीने या समस्ये विरुद्ध प्रयत्न केला तरच हा प्रश्न सुटणार आहे. परंतु गरज भासत आहे एकतेची, कृतीची आणि समजूतदारपणाची.
ऑक्टोबर महिन्यामध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट ऐकूनच काळजात धस्स होते. जणूकाही श्रावण महिना सुरू आहे असे दृश्य जागोजागी पूर्ण भारतभर पाहायला मिळते. सर्वजण चेष्टेने म्हणत देखील होते की हा पाऊस परतून जायचे विसरले की काय ! चिमणी पाखरं तसेच सकाळी उन्ह पडले असल्यामुळे छत्र्या न घेता नोकरीसाठी घराबाहेर गेलेली लोकं रोज संध्याकाळी भिजूनच घरी परतत होती. असा हा फसवा पावसाळा! उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा अशा तीन ऋतूंचे संमिश्र दर्शन ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पाहायला मिळाले. शासनाने नोव्हेंबर मध्ये शाळा सुरू करायचे जाहीर केले आणि पावसाने पुन्हा रिपरिपीला सुरुवात केली. जागोजागी जॉक्स पसरू लागले की मुले शाळेत जात आहेत तेव्हा पावसाला वाटले की काय जून महिनाच उजाडला आहे. विनोद वगैरे जरी तात्पुरता असला तरी ग्लोबल वॉर्मिंगच्या फटक्यामुळे ऋतूमानातील हे बदल नक्कीच धोकादायक आहेत. कारण त्यामुळे पिकांचे अपरिमीत नुकसान झाले आहे. शेतकरी आधीच कोरोना काळात कंगाल झाला आहे, शेतीचे उत्पन्न काढता न आल्यामुळे हैराण झाला आहे. त्यातून पावसाचे परिवर्तन शेतीमालाचा भाव घसरून गेले, शिवाय महागाईचा आगडोंब उसळला गेला. पिकांच्या नुकसानीमुळे देशावर पुन्हां दारिद्र्याचे संकट ओढवले आहे. शेतात खते बी-बियाणे यांच्यासाठी घातलेला पैसा देखील शेतकऱ्याला मिळत नाही मग दिवसरात्र शेतात कष्ट करून उपयोग तरी काय !

मानवाने अजून तरी जागे व्हायला हवे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करायला हवे. पाण्याचा निचरा व्हावा आणि पाण्याची योग्य प्रमाणात साठवणूक व्हावी यासाठीचे प्रयत्न वाढवायला हवे. पाणी हे अनमोल आहे त्याचा वापर जपून करावा. “दहा जणाचं बाजलं, त्यावर कोण निजलं” अशी मानवी वृत्ती नष्ट व्हायला हवी. “मी आणि माझा” असा स्वभाव न ठेवता माझा देश, माझा शेतकरी आणि समाज कसा पुढे जाईल याचा विचार सर्वांकडून व्हायला हवा. तरच या पाण्याच्या दुर्भिक्षावर आणि पर्यावरणाच्या समतोलपणावर निगराणी राहील आणि देशाची भरभराट होईल. एकजुटीने सर्वतोपरी प्रयत्न व्हायला हवेत. ही जबाबदारी माझी आहे अशा वृत्तीने वागत गेले तरच देश प्रगतीच्या दृष्टीने अग्रेसर ठरेल.
मानव वरुणराजाची आराधना करीत म्हणेल,
अचपळ मेघ हे न थांबती थांबविता
तुजविण दाह होते,बरस रे बरस आता
तर काही वेळा असे म्हणावे लागेल की,
पर्वताप्रत मेघ हे न जाती घालविता
तुज चरणाशी आलो, घालव रे देवा आता
— लेखन : सौ भारती सावंत. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800