Thursday, September 18, 2025
Homeलेखअवतीभवती : 12

अवतीभवती : 12

डॉ. डाएट – डॉ. क्वाएट !

माझा पहिला वर्तमानपत्रातील लेख छापणारे वि. ना. देवधर यांच्या काही आठवणी.

देवधराना सर्वजण विसुभाऊ म्हणत. मी ही त्यांना विसुभाऊ म्हणू लागलो.

ते मूळचे कुलाबा (आता रायगड) जिल्ह्यातील पेणचे. लहान वयात रा. स्व. संघात दाखल झाले. नंतर ते पत्रकार झाले.
‘तरुण भारत‘ (पुणे आणि मुंबई) आणि निवृत्तीनंतर  ‘लोकसत्ता‘ मध्ये त्यांनी नोकरी केली. ते नवोदित लेखकांना प्रोत्साहन देणारे होते. माझ्या पहिल्या लेखाच्या निमित्तानं त्यांची ओळख झाली, ती संत साहित्याचा प्रसिद्ध लेखक वामन देशपांडे याच्यामुळे. मग त्यांनी माझे बरेच लेख ‘मुंबई तरुण भारत‘ मध्ये छापले.

त्यामुळे, लेख देण्याच्या निमित्ताने मी ‘मुंबई तरुण भारत’ च्या कार्यालयात जाऊ लागलो. ते चहा पाजायचे. गप्पा मारायचे; आठवणी सांगायचे. न कळवता मी जात असे. पण ते माझ्याशी बोलायला वेळ काढत.

ते पुण्याच्या ‘तरुण भारत’ मध्ये असताना एक दिवस त्यांच्याकडे सुमारे 75 वर्षांचे बाळासाहेब फाटक म्हणून गृहस्थ आले; त्यांनी आयुष्यभर टूरिंग टॉकीजचा व्यवसाय केला॰ त्यांनी आत्मचरित्र लिहिले होते; आणि त्यावर विसूभाऊंनी काही परिचयपर मजकूर लिहावा अशी फाटकांची इच्छा होती॰ या फाटकांची प्रकृती अतिशय उत्तम होती; आणि ते अजिबात 75 वर्षांचे वाटत नव्हते॰

हे कसे काय जमवले असे त्यांना विसूभाऊंनी विचारले॰ त्यावर त्या फाटकांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिले॰ ते म्हणाले ‘ या साठी मला दोन डॉक्टरांनी खूप मदत केली॰ एकाचे नाव आहे ‘ Dr॰ Diet ‘ आणि दुसर्‍याचे नाव आहे ‘ Dr॰ Quiet ‘ !

एकाने मला सांगितले की तू फार खाऊ नकोस; आणि दुसर्‍याने सांगितले की तू फार बोलू नकोस ! ‘

त्यामुळे, या वयातही ते सायकलवरून पुण्यात फिरत असत. त्यांची प्रकृती, ठणठणीत म्हणावी इतकी, उत्तम होती.

एकदा विसूभाऊंनी प्रख्यात समाजवादी पुढारी श्री. म. उर्फ एस. एम. ( एसेम ) जोशी आणि प्रा॰ श्री॰ म॰ माटे यांची दोघांचा मोठेपणा दर्शवणारी आठवण सांगितली.

माटे मास्तर यांनी दलित आणि उपेक्षित यांच्यासाठी भरपूर काम केले होते॰ तसेच, एसेम पण राजकारणाबरोबर जातिभेद निर्मूलन आणि कामगार चळवळीत काम करत होते॰ त्यामुळे या दोघांचे राजकीय विचार तसे परस्पर विरोधी (एसेम समाजवादी तर माटे मास्तर हिंदुत्ववादी) असूनही त्या दोघांना एकमेकांविषयी खूप आदर होता॰ 1957 ची विधान सभेची निवडणूक एसेम जिंकले॰

ही बातमी कळल्यावर माटे मास्तर विसूभाऊंना म्हणाले की अरे, मला एसेमचे अभिनंदन करण्यासाठी भेटायचे आहे; तर मी केव्हा येऊ ते त्यांना विचारून ठेव॰

विसूभाऊ पत्रकार असल्यामुळे ते एक दोन दिवसांत एसेमकडे गेले आणि त्यांना प्रा. माट्यांचा निरोप सांगितला॰

त्यावर एसेम त्यांच्या जन्मजात सभ्यतेला अनुसरून म्हणाले, ‘अरे, काही तरीच काय ? माटे मास्तर मला भेटायला येणार ? चल, आपणच त्यांच्याकडे जाऊ॰‘ असे म्हणून एसेमनी अंगात सदरा घातला, त्यावर कोट चढवला; आणि खिशातून लेंग्याला लावायच्या क्लिपा काढल्या, त्या लेंग्याला लावल्या, आणि सायकल काढत म्हणाले, ‘चल, निघू या‘ एसेम यांचा सुसंस्कृतपणा दर्शवणारी खूप छान आठवण आहे ही॰

एसेम तसे 24 तास समाजवादी नव्हते ! त्यांना चित्रपट आवडत॰ क्रिकेट आवडायचे॰ कपील देव त्यांचा आवडता खेळाडू होता॰ दिसायला ते गोरेपान, उंच आणि रुपेरी केस॰ खिशात कंगवा असायचा॰ बाहेर जाताना, भाषणाला उभे राहताना ते पटकन केस नीट नेटके करत असत॰ सगळ्यात विरोधाभास म्हणजे त्यांचे सख्खे शालक, पत्नी ताराबाईंचे भाऊ वि॰ वि॰ उर्फ अप्पा पेंडसे हे कट्टर ससं संङ्घीय॰

या अप्पा पेंडशांनीच नंतर पुण्यात ‘ज्ञान प्रबोधिनी‘ ची स्थापना केली॰ या मुळे सरसंघचालक गोळवलकर गुरुजीं त्यांच्यावर नाराज झाले !

मात्र, अप्पांनी या ‘ज्ञान प्रबोधिनी‘ च्या उपाध्याक्षपदी एसेम जोशी, शंतनुराव किर्लोस्कर, आंतरारष्ट्रीय कीर्तीचे संख्या शास्त्रज्ञ आणि आहारतज्ज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे, ‘स्वस्तिक‘चे वसंतराव वैद्य अशा नामवंत व्यक्तींची नेमणूक केली.

‘ एस॰ एम॰ – अखेरचे पर्व ‘ ( रामकृष्ण बाक्रे ) हे  ‘साधना‘ ने प्रकाशित केलेले पुस्तक मी मागेच घेतले होते॰ नंतर त्यांचे आत्मचरित्र ‘मी – एस॰ एम०’ हे ही मी विकत घेतले॰

एसेमच्या अखेरच्या आजारपणात महाराष्ट्र शासनाने त्यांच्या आजारपणाच्या खर्चासाठी रु॰ 20,000 /-  सहाय्य केले होते॰ ते त्यांनी अत्यंत नम्रपणे परत केले ! शिवाय, एसेम इतके साधे आणि निगर्वी की एकदा  ‘वसंत व्याख्यानमाले‘ त एसेमचे भाषण ठरले होते॰ विसूभाऊ ‘माले’ चे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या घरी गेले आणि म्हणाले की टांगा आणू की रिक्शा आणू ? एसेम म्हणाले, ‘कुठे वाहनाचे अवडंबर माजवतोस ? ठिकाण जवळ तर आहे; चल, चालतच जाऊ; ‘ असे म्हणून विसूभाऊंच्या खांद्यावर हात टाकून ते निघालेसुद्धा !

प्रा. माटे हिंदुत्ववादी असल्याने त्यांचा तसा नेहरूंवर रागच होता॰ त्यातच नेहरू आणि एडविना माऊंटबॅटन यांच्यातले कथित संबंध ! त्यामुळे त्या संबंधात त्यांनी वर्तमानपत्रात काही मजकूर लिहिला; तेव्हा, तरुणांत अफाट लोकप्रिय असलेले नेहरूप्रेमी काँग्रेसचे तरुण एव्हढे चिडले की, पुण्यात माटे एकदा टांग्यातून चालले असतांना त्यांना बाहेर खेचून शारीरिक चोप दिला आहे !

पं. नेहरू आणि एडविना यांच्यातील संबंधांनी लोकांना सतत संभ्रमात टाकलेले आहे ! सध्या, दुर्दैवानं, पं. नेहरू यांना वाईट दिवस आले आहेत. त्यामुळे सोशल मिडीयावर या संबंधांत काहीही लिहून येत आहे !

मात्र, या प्रकरणावर प्रतिभा रानडे यांनी 2002 च्या  ‘ऋतुरंग‘ च्या दिवाळी अंकात एक इतका अप्रतिम लेख लिहिला आहे की, तो लेख महाविद्यालयात अभ्यासाला लावावा असा आहे॰

हा लेख त्यांच्या ‘अबोलीची भाषा‘ या पुस्तकात संग्रहित केला आहे॰

जाता जाता …..
‘ डॉ. डाएट ‘ आणि ‘ डॉ. क्वाएट ‘ ही आठवण विसूभाऊ मला सांगत होते; ती ऐकून मी अचानक म्हणालो की विसूभाऊ, या दोन्ही डॉक्टरांचा ‘ जिभेशी ‘ घनिष्ट संबंध आहे !

विसूभाऊंना ते पटले॰
ते म्हणाले की ही गोष्ट इतके दिवस माझ्या लक्षात आली नव्हती॰

माझी पत्नी लीना शाळेत शिकवताना अधून मधून मुलांना काही चुटके, आठवणी, प्रसंग सांगत असे॰ त्यांत तिनं एकदा ही आठवण सांगितली. त्यामुळे, नंतर विद्यार्थी – विद्यार्थिनी कधी फार गलका करू लागले की ती त्यांना Dr॰ Quiet ची आठवण करून द्यायची !

प्रसिद्ध फौजदारी वकील बाबाराव भिडे हे रा. स्व. संघातील ज्येष्ठ व्यक्ती. अप्पा पेंडसे यांनी गोळवलकर गुरुजी आणि बाबाराव भिडे यांच्याशी वैचारिक, आजच्या भाषेत, ‘ पंगा ‘ घेतला ! त्यांनी ‘ज्ञान प्रबोधिनी’ ‘ची स्थापना केल्यामुळे, ‘आजपासून एकादशीला कांदा — लसूण वर्ज्य असतो ; तसे तुम्ही संघाला वर्ज्य ! ‘ असे सांगून आप्पांना संघातून काढून टाकले.

डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी अप्पा पेंडसे यांचे ‘एक अदम्य, उत्कट चैतन्य‘ या शीर्षकाचं वाचनीय चरित्र लिहिलं आहे.

प्रकाश चांदे.

– लेखन : प्रकाश चान्दे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा