Thursday, September 18, 2025
Homeलेखअवतीभवती : 7

अवतीभवती : 7

काही गमती जमती
‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या शंभराव्या महोत्सवी प्रयोगाला पाहुणे म्हणून आलेल्या आ॰ अत्र्यांनी ‘अशी कट्यार मराठी रसिकांच्या काळजात वारंवार घुसली पाहिजे’ असे उद्गार काढले होते.

मात्र, असा अनुभव येतो की पहिल्याची सर दुसर्‍याला येत नाही॰ वासंती मुजुमदारांच्या ‘नदीकाठी’ या ललित रम्य आत्मकथनाची सर नंतर तशाच प्रकारच्या लिहिलेल्या ‘झळाळ’ पुस्तकातील लेखांना आली नव्हती !

या ‘नदीकाठी’ पुस्तकाला त्यावेळचा सोलापूरचा ‘भैरु रतन दमाणी’ पुरस्कार मिळाला होता.

मात्र, 1950 आणि 60 च्या दशकांत आकाशवाणीवरच्या ‘प्रपंच’ या कौटुंबीक श्रुतिकांच्या मालिकेला इतकी लोकप्रियता लाभली की ती प्रथम बंद केल्यावर लोकाग्रहास्तव परत ‘पुन्हा प्रपंच’ नावाने सुरू करावी लागली ! ती सुद्धा बंद झाल्यावर ‘आंबट गोड’ नावाने परत सुरू करावी लागली॰

वि॰ आ॰ बुवा यांनी या मालिकेसाठी काही शेकड्यांत श्रुतिका लिहिल्या ! त्याची पुस्तके करावयास आकाशवाणीने परवानगी दिली असती तर बुवांच्या नावावर आणखी दहा पंधरा पुस्तके लागली असती॰ या श्रुतिकांच्यांतला ताजेपणा टिकण्यासाठी नंतर आकाशवाणीने लिहिणारे लेखक 5 एपिसोड नंतर सतत बदलत ठेवले॰

या श्रुतिकांसाठी मी लेखन करावे असा सन्मित्र रविंद्र पिंगे यांचा आग्रह होता॰ पण माझी फॅक्टरीतील नोकरी, अनियमित तास आणि लिखाणाची ‘डेड लाईन’  यांचा मेळ बसेना॰ आकाशवाणी मानधन चांगले देते॰ चांगले पैसे मिळताहेत म्हटल्यावर व॰ पु॰ काळ्यांसारख्या लोकप्रिय लेखकानेही या 15 मिनिटांच्या अनेक श्रुतिका लिहिल्या॰

‘युसिस’ (United States Information Service) ही संस्था अमेरिकन पुस्तकांची मराठीत भाषांतरे करून घेत असे; आणि त्यासाठी चांगले द्रव्य देत असे॰ त्यामुळे पु॰ ल॰ देशपांडे, जी॰ ए॰ कुलकर्णी, मंगेश पाडगावकर यांसारख्या प्रथितयश लेखकांनीही भाषांतरे केली; असे ‘युसिस’ मध्ये नोकरी करणार्‍या आणि ही भाषांतराची कामे देण्याचा अखत्यार असलेल्या जयवंत दळवींनी लिहून ठेवले आहे॰

13 मार्च 1926 ही पिंग्यांची जयंती ! त्यांचा जन्मदिन आणि त्यांच्या नातवाचा जन्मदिनही 13 मार्चच आहे॰ त्यामुळे 13 मार्च 2026 रोजी त्यांची जन्मशताब्दी घरगुती स्तरावर तरी निश्चितच साजरी होईल, याची त्यांना खात्री होती॰ तसे त्यांनी लिहूनही ठेवले आहे॰

1993 साली वामन देशपांडे याने ‘मुलांसाठी संत तुकाराम’ हे पुस्तक लिहिले, आणि ते नुकतीच दहावी उत्तीर्ण झालेल्या माझ्या मुलीला – अदितीला — अर्पण केले॰

प्रत्यक्ष समारंभ दादरला 31 ऑगस्ट 1993 रोजी झाला; त्या वेळेस पुस्तक छापून तयार नव्हते॰ म्हणून पुस्तक छापून तयार झाल्यावर मी या पुस्तकाचा एक घरगुती प्रकाशन समारंभ केला॰ त्याला वि॰ आ॰ बुवा आणि रवींद्र पिंगे प्रमुख पाहुणे होते॰ त्यावेळेस ओळख करून देतांना मी पिंगे आणि बुवा हे दोघेही 1926 साली जन्मलेले लेखक आहेत, असा उल्लेख केला होता॰

तोच धागा पकडून पिंगे यांनी सुरवातीलाच 1926 साली जन्मलेल्या लेखकांची यादीच सादर केली॰ कारण स्वत: पिंग्यांना 1926 सालचा खूपच अभिमान होता॰ स॰ ह॰ देशपांडे, भाल पाटील, ज्योत्स्ना देवधर, सुनीता देशपांडे, द॰ मा॰ मिरासदार, यशवंत देव, म॰ द॰ हातकणंगलेकर, प्रा॰ बाळ गाडगीळ, पुरुषोत्तम दारव्हेकर, विद्याधर पुंडलिक, भाई भगत, सं॰ दि॰ रवी आणि अटल बिहारी वाजपयी इ॰.

त्यावर वि॰ आ॰ बुवांनी बोलतांना 1926 सालचा हा महिमा बघून 1925 आणि 1927 साली जन्मलेल्या लेखक आणि लेखिकांनीही आपण 1926 सालीच जन्मलो आहोत, असे सांगावयास सुरवात केली, असे सांगून बहार उडवून दिली ! (एक योगायोग म्हणजे सुनीता देशपांडे आणि वि॰ आ॰ बुवा यांची ज॰ ता॰ 4 जुलै 1926 हीच आहे ! )

या सार्‍यांची शताब्दी एकदमच येईल॰

1910 – 11 च्या सुमारास, एकाच वेळेस मराठीत नव्वदी ओलांडलेल्या प्रा॰ मं॰ वि॰ राजाध्यक्ष, प्रा॰ म॰ वा॰ धोंड, प्रा॰ वि॰ पां॰ देऊळगावकर ( हे गुलबर्गा येथे होते, आणि हे वि. आ. बुवांचे मावसभाऊ ), प्रा॰ स॰ रा॰ गाडगीळ ( नांदेड ), प्राचार्य देवदत्त दाभोळकर, मनोहर माळगावकर, श्री॰ ना॰ पेंडसे, भा॰ द॰ खेर, पु॰ ना॰ ओक, शरदचंद्र टोंगो (हे यवतमाळचे॰ 1950 च्या दशकात हे लोकप्रिय होते॰) वसुंधरा पटवर्धन, मालती बेडेकर अशा किमान, मला आठवणार्‍या 10 व्यक्ती होत्या॰ या पैकी मालतीबाईंची प्रकृती 95 – 96 वर्षे झाली तरी ठणठणीत होती॰

माझ्याशी स्नेह असणार्‍या शामला करंदीकर (या लेखिका, नाटककार गिरिजाबाई केळकरांच्या नात) यांचे मालतीबाईंकडे नियमितपणे जाणे येणे होते॰ ‘ ‘माझी प्रकृती जर इतकी ठणठणीत आहे तर मी मरणार कशी’ अशी काळजी त्या शामलाजींशी वारंवार व्यक्त करावयाच्या !

वर उल्लेख केलेले मं. वि. राजाध्यक्ष हे सारस्वत ब्राह्मण. त्यांचा उल्लेख ग॰ दि॰ मा॰ ‘ शेणवी विद्वान ‘ असा करत ! ‘महात्मा’ नावाचा एक चित्रपट मराठी, हिन्दी आणि इंग्लिश असा तीन भाषांत निर्माण होणार होता॰ मराठी पटकथा आणि संवाद ग॰ दि॰ मां.नी लिहिले होते॰ त्याचे इंग्लिश भाषांतर मं॰ वि॰ राजाध्यक्ष करणार होते॰ त्या काळात पु॰ भा॰ भाव्यांना लिहिलेल्या एका पत्रात माडगूळकरांनी मं॰ वि॰ यांचा उल्लेख ‘आंग्ल तर्जुमा राजाध्यक्ष नामक शेणवी विद्वान सिद्ध करणार आहेत’ असा केला आहे !

ग॰ दि॰ मा॰ तसे भयंकर चेष्टेखोर होते !

सुप्रसिद्ध कथाकार विद्याधर पुंडलिक ‘ (श्री॰ पु॰) भागवत संप्रदायातले ‘! आणि ‘ मौज ‘ चे कार्यालय खटाव बिल्डिंग, गिरगाव येथे॰ म्हणून माडगूळकर पुंडलिकांचा उल्लेख ‘ खटाव वाडीतील चेखाव्ह 🎂 (जागतिक दर्जाचा रशियन कथा लेखक) ‘ असा चेष्टेने करत असत !

‘ सत्यकथा ‘ मध्ये छापण्यासाठी श्री॰ पुं.कडे कथा पाठवल्यावर श्री॰ पु॰ आणि राम पटवर्धन त्या कथेची साहित्यिक ‘ चिरफाड ‘ करून ती पुनर्लेखनासाठी लेखकाकडे पाठवत असत॰ ज्या सुधारणा या दोघांना अपेक्षित असत त्या ते कळवत असत॰ या चिरफाडीच्या पत्राला ‘ सत्यकथा ‘ चे लेखक ‘ मौज pathological लॅबोरेटरीचा रिपोर्ट’ असे गमतीने म्हणत असत ! Pathologyला मराठीत  ‘विकृतीशास्त्र’ ‘ म्हणतात !

11 मार्च या दिवशी माझी मुलगी आदितीचा वाढ दिवस असतो॰

या 4 – 5 दिवसांतले वाढ दिवस बघा !

8 मार्च डॉ॰ वि. ना. श्रीखंडे, 9 मार्च डॉ. यु॰ म॰ पठाण, 10 मार्च मंगेश पाडगावकर आणि प्रा. माधव मनोहर, 11 मार्च न्या॰ मू॰ राजाभाऊ गवांदे, 12 मार्च यशवंतराव चव्हाण आणि 13 मार्च रवींद्र पिंगे !

प्रा. डॉ. यु. म. पठाण हे पाडगावकरांना वाढदिवसाचा फोन करत तेव्हा ‘ मी तुमच्यापेक्षा एक दिवसाने मोठा आहे याचे भान ठेवा ‘ असे मजेत सांगतात ! दोघेही 1930 सालचे॰

हे पठाणांनी मला एकदा सांगितले तेव्हा मी म्हणालो की ,आपण दोघे शासकीय नोकरीत असता तर ही एक दिवसाची ज्येष्ठता आपणास उपयुक्त ठरली असती!

याचे नमुनेदार उदाहरण सांगायचा मोह होतोय॰

शरद काळे आणि जे॰ डी॰ जाधव (डॉ॰ नरेंद्र जाधवांचे मोठे बंधु॰) हे दोघे भा॰ प्र॰ से॰ च्या एकाच तुकडीतले आणि एकाच वर्षी रुजू झालेले॰ नंतर 1995 — 96 च्या सुमारास मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी नेमणूक करावयाच्या वेळेस हे दोघेही लायक उमेदवार होते॰ पण शरद काळे हे जाधवांच्या अगोदर केवळ 4 दिवस भा॰ प्र॰ से॰ त रुजू झाले होते; ही सेवा ज्येष्ठता काळ्यांच्या उपयोगी पडली॰ जाधवांनी त्यांची निवड व्हावी म्हणून बरेच प्रयत्न केले॰ पण हा 4 दिवसांचा उशीर त्यांना महाग पडला !

अर्थात, नंतर जे. डी. जाधव मुंबईचे आयुक्त झालेच.

शरद काळे हे 1956 साली शालान्त परीक्षेत बोर्डात सर्व प्रथम आले॰ ते पुण्याच्या नू॰ म॰ वि॰ चे.

1933 साली नू॰ म॰ वि॰ तलेच एक काळे त्या वेळच्या मॅट्रिकच्या परीक्षेत बोर्डात प्रथम आले होते॰ म्हणून शरद काळेंचा सत्कार त्या काळ्यांच्या हस्ते करण्यात आला होता॰

हे शरद काळे आणि 1958 साली शालान्त परीक्षेत प्रथम आलेला पुण्याचा रवींद्र कुलकर्णी हे दोघेच टॉपर्स आय॰ ए॰ एस॰ मध्ये गेले॰

1952 साली शालान्त परीक्षेत पहिले आलेले आलेले मधुसूदन कोल्हटकर ( एम. आर. ) हे ही प्रशासकीय सेवेत गेले; आणि आय. ए. एस. झाले. 1957 साली पहिला आलेला रत्नागिरीचा अनंत जगन्नाथ वेर्णेकर हा Indian Postal Service (IAS ची समकक्ष परीक्षा) मध्ये गेला॰ मात्र, अन्य कोणीही बोर्डात पहिला आलेला भारतीय प्रशासकीय सेवेत गेला नाही !

नंतर जवळ जवळ 2000 सालापर्यंत गुणवत्ता यादीत आलेले कोणीही आय॰ ए॰ एस॰ मध्ये जाण्याचे नावही काढत नसे॰

आता मात्र परिस्थिती बदलेली आहे॰

जाता जाता …

वरती डॉ. यु. म. पठाण यांचा उल्लेख आला आहे. मी पाहिलेले हे पहिले गृहस्थ ज्यांनी 2 विषयांत Ph. D. केली.

अलिकडे निशिगंधा वाड या बुद्धिमान आणि दहावी / बारावीच्या परीक्षांत गुणवत्ता यादीत आलेल्या मुलीनं 3 विषयांत Ph. D. केली आहे !

शरद काळे या शालांत परीक्षेत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याचा त्याच्या आधी शालांत परीक्षेत पहिला आलेल्याच विद्यार्थ्या च्या हस्ते सत्कार केला, असा वर उल्लेख आला आहे.

1995 साली डोंबिवलीतील ‘ स्वामी विवेकानंद ‘ विद्यालयातील अपर्णा गोळे ही शालांत परीक्षेत बोर्डात पहिली आली. तिचा सत्कार कोणाच्या हस्ते करावा, याचा विचार चालू होता.

माझी पत्नी (आता दिवंगत ) लीना चांदे ही त्या शाळेत शिक्षिका होती. अपर्णा तिचीच विद्यार्थिनी होती. म्हणून त्या संस्थेचे तत्कालीन संचालक शशिकांत भाटे हे आमच्याकडे या संदर्भात बोलावयास आले होते. ते माझेही स्नेही असल्यामुळे मी त्यांना अपर्णाचा सत्कार हा डोंबिवलीलाच दंत वैद्य असलेल्या, मूळच्या पंढरपूरच्या डॉ. शिरीष पारिपत्यदार याच्या हस्ते करावा, असं सुचवलं होतं.

कारण शिरीष पारिपत्यदार हा ही 1974 साली शालांत परीक्षेत बोर्डात सर्व प्रथम आला होता.

पण भाटे यांना ही सूचना पसंत पडली नाही; आणि नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या हस्ते अपर्णाचा सत्कार झाला.
मात्र, दारव्हेकर हे ही तत्कालीन मॅट्रिक परीक्षेत बोर्डात पाचवे आले होते !

प्रकाश चांदे

– लेखन : प्रकाश चान्दे. डोंबिवली
– संपादन : देवेंद्र भुजबळ ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा