अक्षर अंधश्रद्ध!
कोणीतरी मागे असा निष्कर्ष काढला की आपले आत्तापर्यंत जे जे पंतप्रधान झाले त्यांच्या प्रत्येकाच्या नावात अक्षर R आहेच ! पं॰ नेहरू, इंदिरा गांधी, गुलजारीलाल नंदा, मोरारजी देसाई,
चरणसिंग , राजीव गांधी असे प्रत्येक पंतप्रधानाच्या नावात अक्षर R आहेच॰
त्यामुळे मग त्याचा उपसिद्धांत असा झाला की ज्याच्या नावाच्या अक्षरात अक्षर R नाही ती व्यक्ती पंतप्रधान बनू शकणार नाही॰ पहिले उदाहरण संजय गांधीचे दिले गेले; आणि दुसरे सोनिया गांधींचे.
पण हा सिद्धांत कमालीचा खोटा ठरवला तो पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी ! यांच्या नावात कुठे अक्षर R आहे ? असे गृहस्थ गांधी – नेहरू घराण्यातले नसूनही लागोपाठ दोनदा पंतप्रधान बनू शकले!
शरद पवार यांच्या नावात तर दोनदा R
अक्षर आले आहे॰ ते तर केव्हाच पंतप्रधान बनावयास हवे होते; नाही का ?
पण ते अद्याप पंतप्रधान बनले नाहीत !
सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावातही दोन R आहेत !
दुसरी कथा अक्षर I (आय) ची आहे॰ 1975 साली एक दिवसीय क्रिकेट सामन्यांची ‘ विश्व – चषक ‘ स्पर्धा सुरू झाली॰ दर चार वर्षांनी ही स्पर्धा होते॰ पहिले दोन वेळा वेस्ट इंडिज, दोनदा भारत, एकदा श्री लंका, पाकिस्तान, तीनदा ऑस्ट्रेलिया, असे विजेते होते॰ त्यावेळेस एका माणसाने सिद्धांत मांडला की ज्या देशाच्या नावात अक्षर आय नाही तो देश हा चषक जिंकू शकत नाही !
वर वर पाहता हे निरीक्षण बरोबर होते॰
मात्र, त्यामुळे इंग्लंड या देशाला हा चषक कधीच जिंकता येणार नाही; कारण त्याच्या स्पेलिंग मध्ये अक्षर आय नाही॰ यावर माझे निरीक्षण असे की इंग्लंडचे नाव यु॰ के॰ अथवा ग्रेट ब्रिटन आहे॰ या दोन्ही नावांत अक्षर आय आलेले आहे॰ इंडियाने चषक 1983 मध्ये जिंकला॰ या देशाचे नाव खरे तर भारत आहे; त्यात कोठे अक्षर आय आहे ?
श्रीलंका संघाने हा चषक एकदा (1996) जिंकला आहे॰ या देशाचे नाव अजूनपर्यंत सिलोन (Ceylon) असे होते; त्याच्या स्पेलिंग मध्ये अक्षर आय नव्हते ! केनिया हा देश या स्पर्धेत असतो; पण हा देश अद्याप लिंबू टिंबू समजला जातो॰ या संघाला पण त्याचे स्पेलिंग KENYA असल्यामुळे हा चषक जिंकण्याची संधी नाही॰ पण याचे स्पेलिंग खरे तर Keniya असे हवे; नाही का ? तसे असेल तर त्याला आशा ठेवता येईल॰
तसेच यजमान संघ हा चषक जिंकू शकत नाही, असेही निरीक्षण होते॰ मात्र, आत्ता पर्यंत 12 वेळा या स्पर्धा झाल्या. त्यांत तीनदा यजमान देशांनी हा चषक जिंकला आहे. 2011, 2015 आणि 2019 या तीन वर्षी अनुक्रमे यजमान भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांनी हा चषक जिंकला आहे !
म्हणजे यजमान देश हा चषक जिंकू शकत नाही, हे समीकरणही मोडीत निघाले !
गेल्या वेळचा (2019) चषक हा इंग्लंड या देशानं जिंकला म्हणजे ज्या देशाच्या नावात I अक्षर नाही, तो देश हा चषक जिंकू शकत नाही; हे ही समीकरण मोडीत निघालं !
चित्रपट सृष्टीतही ‘ लकी ‘ अक्षराचे फॅड आहे !
हृषिकेश मुखर्जी यांनी सुमारे 40 चित्रपट दिग्दर्शित केले. त्या पैकी A अक्षरानं सुरु होणारे ‘ अनाडी ‘, ‘ असली नकली ‘. ‘ अनुपमा ‘, ‘ आशीर्वाद ‘, ‘ आनंद ‘, ‘ आशिक ‘, ‘ अच्छा बुरा ‘, ‘ आलाप ‘, अर्जुन पंडित ‘, ‘ अनुराधा ‘ आणि ‘ अभिमान ‘ असे 11 चित्रपट दिग्दर्शित केले.
निर्माते – दिग्दर्शक जे. ओमप्रकाश यांनी 23 चित्रपटांची निर्मिती केली. त्या पैकी 21 चित्रपटांची शीर्षके A या अक्षरांनी सुरु होणारी होती ! ‘ आये दिन बहार के ‘, ‘ आप की कसम ‘, ‘ आंधी ‘ हे त्यांचे A अक्षरानं सुरु होणारे काही चित्रपट.
राकेश रोशन या अभिनेत्या – निर्मात्यानं 18 चित्रपटांची निर्मिती केली; त्या पैकी 15 चित्रपटांची शीर्षकं K या अक्षरानं सुरु झाली होती. ‘ कामचोर ‘, खून भारी मांग ‘, कोयला ‘, ‘ कृष्ण कन्हैया ‘, ‘ किंग अंकल ‘, हे त्यापैकी काही चित्रपट, ज्यांची शीर्षकं K या अक्षरानं सुरु झाली होती.
प्रत्यक्षात वयानं लहान पण या बाबतीत राकेश रोशनची मोठी बहिण ठरेल ती एकता कपूर !
तिनं कहर केला !
तिनं दूरचित्रवाणीवर 116 मालिकांची निर्मिती केली; त्या पैकी 62 मालिकांची शीर्षकं K या अक्षरानं सुरु होणारी होती ! ‘ कन्यादान ‘, ‘ कौन ‘, ‘ कश्ती ‘ आणि अर्थातच, ‘ क्यो कि सास भी कभी बहु थी ‘ या तिच्या काही ‘ ककारी ‘ मालिका !
तिनं 46 चित्रपटांची निर्मिती केली; पण यांत फक्त दहाच चित्रपटांची शीर्षकं K अक्षरानं सुरु झाली होती ! ‘ कुछ तो है ‘, ‘ कोई आप सा ‘ हे तिचे ‘ क ‘ अक्षरानं सुरु होणारे 2 चित्रपट.
जाता जाता…..
2019 सालचा एक दिवशीय विश्व चषक हा यजमान इंग्लंड देशानं जिंकला. या मुळे 2 गृहितकं पुन्हा मोडीत निघाली ! एक म्हणजे यजमान देश हा चषक जिंकू शकत नाही; आणि दुसरं म्हणजे ज्या देशाच्या नावात ‘ आय ‘ I हे अक्षर नाही, तो देश हा चषक जिंकू शकत नाही !
2019 ची गम्मत अशी होती, की अंतिम सामन्यात इंग्लंड आणि न्यू झीलंड हे संघ स्पर्धेत होते. या पैकी कोणीही हा चषक जिंकला असता तरी त्या देशाच्या नावात I अक्षर नाहीच !
अभिनेता – दिग्दर्शक राकेश रोशन हा संगीत दिग्दर्शक रोशन यांचा मुलगा; आणि वर उल्लेखलेल्या निर्माते – दिग्दर्शक जे. ओमप्रकाश यांचा जामात. तर निर्माती एकता कपूर ही अभिनेता — निर्माता जीतेंद्रची मुलगी !
हिला लग्न न करताही ‘ सरोगसी ‘ तंत्राच्या आधारे एक मुलगी आहे !
2009 च्या ‘ चंद्रकांत ‘ च्या दिवाळी अंकात इंदूरच्या प्रा॰ शांता पुराणिक यांनी ‘ पान पूरके ‘ लिहिली होती॰ त्यांत या अक्षर R च्या सिद्धांताचा थोडक्यात उल्लेख केला केला होता॰ त्या बाईंना हे सर्व रामायण मी कळवले होते॰
त्या चकित झाल्या !
गम्मत –
सर्वश्रेष्ठ अभिनेता दिलीपकुमार देखील यात अडकला होता. त्याला U अक्षर हे लाभदायक आहे, असे सांगण्यात आले; म्हणून त्यानं त्याची निर्मिती असलेल्या ‘ गंगा जम्ना ‘ चं स्पेलिंग ‘ Ganga Jamna ‘ च्या ऐवजी ‘ Gunga Jumna ‘ असं केलं.
‘ गंगा जम्ना ‘ धो धो चालला !
म्हणून त्यानं एच. एस. रवैल निर्मित तो भूमिका करत असलेल्या ‘ संघर्ष ‘ चित्रपटाच्या शीर्षकाचं स्पेलिंग ‘ Sangharsh ‘ च्या ऐवजी ‘ Sunghursh ‘ असं करायला लावलं !
पण म्हणून हा सामान्य चित्रपट पडायचा तो पडलाच !

– लेखन : प्रकाश चान्दे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800