1960 साली 1 ‘ मे ’ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली; आणि जेमतेम एक – सव्वा महिन्यात मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या कसोटीचा प्रसंग उभा राहिला !
रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि पळस्पे यांच्यामध्ये असलेल्या काळुंद्री नदीवरचा पूल पावसाळ्याच्या पहिल्याच आठवड्यात कोसळला॰ आपल्याकडे शासकीय कामे किती ढिसाळपणे चालतात याचा तो नमुना होता॰
दरवर्षी सगळ्या नद्यांवरचे पूल मे महिन्यात तपासणी करून ते पावसाळ्यात टिकतील की नाही याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याने द्यायचा असतो॰
त्या प्रमाणे जूनच्या पहिल्या आठवड्यात या पुलाबद्दलही हा पूल हा पावसाळा काढू शकेल असा अहवाल देण्यात आला होता॰ त्यावेळेस कोकण रेल्वे नव्हती॰ शिवाय पळस्प्यापर्यंत मुंबई – गोवा, आणि मुंबई – पुणे – बंगलोर हा सामायिक रस्ता होता॰ ( मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे बांधला गेला नव्हता.)
या दोन्ही रस्त्यांवर प्रचंड वाहतूक असे॰ सर्वच वाहतूक ठप्प झाली॰ (मात्र, ‘ ठप्प ‘ हा शब्द तेव्हा प्रचलित नव्हता !) सर्व सामान्य लोक आणि विरोधक अशी संधी सोडणे शक्यच नव्हते॰ शिवाय, आमदार असलेले आ॰ अत्रे त्यावेळेस आपल्या मुलुख मैदान ‘ मराठा ‘ या वर्तमानपत्रासह हयात होते॰
ते काय यशवंतरावांना सोडतात ?
अशा वेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तडफदार प्रशासनाचा एक नमुना दाखवला !
यशवंतरावांनी आपले ज्ञान, कार्यक्षमता ई॰ गोष्टी पणाला लावून थेट पं॰ नेहरूंशी संपर्क साधला; आणि त्यांना संरक्षण मंत्री असलेल्या कृष्ण मेनन यांना युद्धात वापरतात तो ‘ बेली ब्रिज ‘ तेथे बांधून देण्यास सुचवले॰ त्याप्रमाणे ले॰ ज॰ शंकरराव पां. थोरात – पाटील, स्वत: कृष्ण मेनन, नेहरू, दिल्ली आणि महाराष्ट्रातील राजकीय पुढारी आणि सनदी अधिकारी यांनी असा काही नेट लावला की, विश्वास बसणार नाही !
युद्धात नदी ओलांडण्याची वेळ आली तर संरक्षण खात्याकडे तयार पुलाचा धातूचा सांगाडा असतो. तो सांगाडा वापरला की, 30 –- 32 तासांत पूल बांधून तयार होतो. अशा पुलाला ‘ बेली ब्रिज ‘ असं म्हणतात.
या काळूंद्री नदीवर केवळ 34 – 36 तासात तेथे वाहतूक करण्यास योग्य असा पूल उभा राहिला॰
खरोखर विश्वास बसणार नाही अशा कार्यक्षमतेने हे काम झाले !
यशवंतरावांनी ही जी तडफ दाखवली त्याला तोड नाही ! ती केवळ अभूतपूर्वच नाही; तर न भूतो न भविष्यतीही होती; हे त्यांच्या विरोधकांसह सर्वानाच मान्य करावे लागले॰ या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला ‘ बेली ब्रिज ‘ म्हणजे काय हे ठाऊक झाले॰ या वेळेस मी नुकताच एस॰ एस॰ सी॰ ला गेलेलो होतो॰ मी सर्व वर्तमानपत्रे बारकाईने वाचत होतो॰ मी त्या वेळेस ठाण्याला होतो॰ पण, मी मूळचा महाडचा असल्यामुळे वर्षातून एकदा तरी आमचे महाडला जाणे असायचेच॰ त्याप्रमाणे मी तो बेली ब्रिजही बघितला॰ त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राच्यामुळे काँग्रेस विरोधी वातावरण होते॰ कोकणातल्या ( त्या वेळच्या ) तीनही जिल्हयांत काँग्रेस फक्त एकच आमदार निवडून आलेला होता॰ त्याही मुळे यशवंतरावांना अशी तडफ दाखवणे आवश्यक होते॰ नंतर त्याच तडफेने त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांचा पाठ पुरावा करत तेथे केवळ एक दीड वर्षातच पक्का पूलही बांधून घेतला॰
तेव्हापासून जेव्हा जेव्हा मी या पुलावरून जातो (अगदी रात्रीसुद्धा !) तेव्हा तेव्हा मला या बेली ब्रिजची आठवण येते॰ बरोबर कोणी असेल तर त्याला मी ही कथा उत्साहाने सांगतो ! लोक काळाच्या ओघात सर्व विसरतात॰ शिवाय, सामान्य लोकांची स्मरण शक्ती अधू असते॰
एक अनोखे व्यक्तीमत्त्व असलेल्या शशी मेहता याची 2001 साली पहिली पुण्यतिथी पाळण्यासाठी आम्ही लोणावळ्याला डॉ॰ खंडेपारकर यांच्या ‘ गुलमोहर ‘ बंगल्यात जायला निघालो होतो॰ कारण येथे शशी मेहता किती तरी वर्षे एक स्मरणीय ‘ वर्षा सहल ‘ आयोजित करायचा.
या वेळेस डॉ॰ श्रीखंडे, दिनकर गांगल, उषा मेहता, अशोक दातार आणि मी असे अशोक दातार यांच्या गाडीत होतो॰ वेगवेगळ्या विषयांवर चर्चा ऐन रंगात आली होती॰ पण हा पूल आल्यावर मी गाडी एक मिनिटासाठी थांबवून या पुलाबद्दल कोणाला काही माहिती आहे का, ते विचारले॰ डॉ. श्रीखंडे, गांगल, उषा हे सर्व विसरलेच होते॰ त्यांना काहीच आठवत नव्हते॰ पण आश्चर्याची बाब म्हणजे वाहतूक तज्ज्ञ असलेले अशोक दातार यांनाही या बद्दल काहीच माहिती नव्हते असे दिसले !
मग मी सर्वांना ही कथा ऐकवली॰
सर्वांनी मोकळ्या मनाने माझे कौतुक केले॰
2010 च्या जून मध्ये या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली॰ त्यावेळेस आमचा परम मित्र रविप्रकाश कुलकर्णी हा ‘ रविवार सकाळ ‘ मध्ये ‘ खबरबात ‘ या नावाचे साप्ताहिक सादर लिहीत असे॰ त्यात विविध क्षेत्रांतल्या स्मरणीय घटनांची नोंद तो करत असे॰ या घटनेबद्दल काही लिहावयास हवे, असे मी सुचवताच त्याने माझ्या नावासकट एक स्फुट लिहिले॰ या स्फुटात त्याने माझा तर उल्लेख केलाच; शिवाय, उषा मेहता, डॉ. श्रीखंडे, दातार आणि गांगल यांचा ही उल्लेख केला. त्यात आपला उल्लेख आलेला पाहून उषा मेहताने रविप्रकाश भेटल्यावर आपला आनंद व्यक्त केला !
या निमित्ताने हल्ली वर्तमानपत्रांत भूतकाळ कसा झपाट्याने विसरला जात आहे याची नोंद कराविशी वाटते.
या बेली ब्रिजला 50 वर्षे झाली; त्याची दखल कोणत्याही वर्तमान पत्राने घेतली नाही. 1961च्या जून महिन्यात घाटकोपर आणि कुर्ला यांच्यामध्ये ‘ विद्याविहार ‘ नावाचे रेल्वे स्थानक सुरु झालं; आणि 1967 च्या मार्चमध्ये भांडूप आणि विक्रोळी यांच्यामध्ये कांजूरमार्ग हे स्थानक सुरु झालं. 1962 साली पहिला प्रयोग झालेल्या ‘ तो मी नव्हेच ‘ नाटकाला 8 ऑक्टोबर 2012 ला 50 वर्षे पूर्ण झाली; तसेच, 26 ऑक्टोबर 2012 रोजी ‘ रायगडाला जेव्हा जाग येते ‘ या नाटकालाही 50 वर्षे पूर्ण झाली; 2011 च्या डिसेंबर मध्ये भारतात रंगीत चित्रपटांच्या प्रोसेसिंगला (ईस्टमन कलर) 50 वर्षे पूर्ण झाली॰ पहिला ईस्टमन कलर चित्रपट ‘ जंगली ‘; हाच याची नायिका सायरा बानू हिचाही पहिला चित्रपट; हयाची कोणी म्हणजे कोणी ही दखल घेतली नाही॰
या बद्दल कुठेही एक ओळ देखील आली नाही॰
काय म्हणावे याला ?
जाता जाता :
या उलट 1948 च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हस्त लिखित स्वरूपात असलेली ‘ एल्गार ‘ ही कादंबरी शिरूभाऊ श्री. ना. पेंडसे यांनी पप्पांना ( म्हणजे प्रा॰ माधव मनोहरांना ! ) वाचून दाखवली. महत्त्वाच्या गोष्टींची नोंद ठेवणाऱ्या प्रा. माधव मनोहरांनी त्याचे अचूक स्मरण ठेऊन 25 वर्षांनी त्याच तारखेला शिरूभाऊंना न कळवता शशी मेहता आणि डॉ॰ अविनाश चांदे या स्नेह्यांना घेऊन ते भल्या सकाळीच शिरूभाऊंच्या माहिम मधल्या निवासस्थानी ‘ सेलिब्रेट ‘ करण्यासाठी थडकले !
गम्मत :
बेली नावाच्या अभियंत्यानं या पुलाच्या तंत्राचा शोध लावला. पण ज्या देशात तो शोध लागला तेथे ते तंत्र स्वीकारलं गेलं नाही. अन्य देशात मात्र ते स्वीकारलं गेलं; आणि लोकप्रिय झालं !
साधारण नोव्हेंबर 2022 पर्यंत, महाडकडे जाताना पनवेल सोडले की, काळूंद्री नदीवरचा तो मोडका पूल डाव्या बाजूला दिसत असे. मात्र, आता रस्ता चार पदरी झाल्यामुळे तो मोडका पूलही नष्ट झाला आहे !
— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
ही गोष्ट अनेक वेळा ती.चांदे काकांकडून प्रत्यक्ष ऐकलेय (ईतर अनेक रंजक सत्य कथांसोबत) आताही तीच खुमारी आहे.
सुरेख शब्दांकन. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यतत्परतेला सलाम.