Monday, July 14, 2025
Homeलेखअवती भवती : 22

अवती भवती : 22

राष्ट्रीय चारित्र्य

अख्ख्या गावाच्या राष्ट्रीय चारित्र्याचा प्रसंग इंग्लंडमध्ये दुसर्‍या महायुद्धाच्या काळात घडला॰

युद्धामुळे सर्वच गोष्टींची टंचाई जाणवत होती॰ एकदा एक ट्रक लढणार्‍या जवानांसाठी पाव घेऊन चालला होता॰ एका गावात तो बिघडला, म्हणून ड्रायव्हर मेकॅनिकच्या शोधात गावात गेला॰ लोकांना कळले की ट्रक मध्ये पाव आहेत; आणि त्याचे दार कुलूप न लावता बंद केले आहे॰

मेकॅनिक येण्यापूर्वीच गावकर्‍यांनी ट्रक रिकामा केला !

ट्रक दुरुस्त झाल्यावर निघताना, आत एकही पाव नसल्याचे आणि काय झाले असावे हे ड्रायव्हर च्या लक्षात आले॰ त्याने गावात ट्रक घेऊन फेरी मारली आणि ते पाव लढणार्‍या लोकांसाठी असल्यामुळे परत करावेत असे आवाहन केले॰ आणि काय आश्चर्य; अगदी थोड्याच वेळात जवळ जवळ सर्वच पाव लोकांनी परत केले !

नामवंत चित्रकार आणि चित्रपट कला दिग्दर्शक जे॰ डी॰ गोंधळेकर (हे ‘जे॰ जे॰’चे ‘ डीन ‘ होते॰) 1964 मध्ये माझा मोठा भाऊ अविनाश ज्या इमारतीत रहायचा त्याच इमारतीत राहत असत. त्यांच्याकडे फोन नसल्यामुळे आणि अविनाशकडे फोन असल्यामुळे ते फोन करायला अविनाशच्या घरी येत. मग माझ्या आणि त्यांच्या गप्पा होत असत.

दुसर्‍या महा युद्धाच्या काळात हे गोंधळेकर इंग्लंडमध्ये होते॰ त्यावेळेस साखर आणि तत्सम गोष्टींवरची असलेली कडक नियंत्रणे सामान्य माणूसही बिन तक्रार पाळायचा. चहात जेमतेम अर्धा चमचा साखर वापरता येत असे. त्यांनी याचे कारण ते ज्या बाईकडे रहात होते, तिला विचारले॰ तिने उत्तर दिले की अशीच नियंत्रणे पंतप्रधान चर्चिलवरही आहेत; आणि तो ही ती नियंत्रणे मनापासून पाळत आहे॰

मग आम्ही का नाही पाळायची ?

हा प्रसंग स्वत: गोंधळेकरांनी मला सांगितला आहे॰

इंग्लंड मध्ये या गोष्टींचे बाळकडू कसे दिले जाते याचा एक प्रसंग माझी मुलगी अदिती 2004 मध्ये यु॰ के॰ मध्ये असतांना तिला अनुभवता आला॰

एकदा ती आणि अजय बसच्या रांगेत उभे होते॰ त्यांचा पहिला नंबर होता॰ थोड्याच वेळात एक जोडपे त्यांच्या 5 – 6 वर्षांच्या मुलासह यांच्यामागे आले, आणि उभे राहिले॰ बस आली, आणि ती बर्‍यापैकी रिकामी होती॰ हा मुलगा रांग तोडून पुढे घुसला आणि एका जागेवर जाऊन बसला॰ ड्रायव्हरने हे पाहिले॰ तोच बसचा कंडक्टर होता॰ त्याने त्या मुलाला खाली उतरून परत बसमध्ये चढायला सांगितले॰ त्या आई वडिलांनी देखील त्या मुलाला अदिती आणि अजयची माफी मागावी असे सांगितले॰

अदिती म्हणाली की अहो, जाऊ दे मूलच आहे; शिवाय बसमध्ये जागाही भरपूर आहे॰ पण ते आई वडील त्यांच्या मुलाने माफी मागावी यावर ठाम होते॰ ते म्हणाले, ‘ हेच वय हे नीती – नियम शिकण्याचे आहे॰ तो जर हे आत्ता नाही शिकला तर नंतर केव्हाच शिकू शकणार नाही ! ‘अदिती आणि अजय थक्क झाले !

तेथल्या लोकांच्या प्रामाणिकपणाचा आणखी एक प्रसंग तिच्या अनुभवाला आला॰ त्यांना व्हिसा काढायचा होता॰ त्याची फी काही पौंड आणि नव्वदच्यावर ‘पी‘ (पेन्स) इतकी होती॰ हा ‘ पी ‘ चा आकडा रोज बदलत असतो॰ तर तेथे काम करणारा माणूस ‘ पी ‘ ची सुटी नाणी घेऊन बसत असे॰ आणि उरलेले जे काही 5 / 6 / 7 ‘ पी ‘ असतील ते प्रामाणिकपणे परत करत असे !

इंग्लंडमध्ये असं राष्ट्रीय चारित्र्य सर्वत्र पाळलं जातं. जपान, जर्मनी अशा देशांतील लोकांच्या राष्ट्रीय चारित्र्याविषयी आपण सतत चांगलं ऐकत असतो.

मात्र, आपल्याकडेही असं राष्ट्रीय चारित्र्य पाळणारे लोक आहेत. म. गांधींनी स्वातंत्र्य आणि स्वदेशीचा पुरस्कार केल्यावर कोट्यावधी भारतीयांनी तशा शपथा घेऊन आमरण त्या पाळल्या.

सध्या नव्वदी ओलांडून बिछान्यावर असलेल्या, आंतर्राष्ट्रीय कीर्तीच्या शल्य विशारद डॉ. वि. ना श्रीखंडे यांनी न्याय सेवेत असलेल्या त्यांच्या वडिलांची गोष्ट मला सांगितली होती. नागेशराव श्रीखंडे हे न्याय सेवेत असताना त्यांना लिखाणासाठी शासनाकडून झरणी ( पेन ) आणि शाई मिळत असे. त्यांच्या घरात कामाच्या मेजावर दोन झरण्या आणि शाईच्या दोन बाटल्या असत. खासगी आणि शासकीय कामांसाठी नागेशराव त्या त्या झरणी आणि शाईच्या बाटलीचा कटाक्षानं उपयोग करत !

पु. ल. देशपांडे आणि रमेश मंत्री हे एकदमच एम. ए. करत होते. विषयही एकच होता. एकदा पु.लं.नी रमेश मंत्र्यांना दिवसभर घरी अभ्यासाला आणि जेवायला बोलावले. रमेश मंत्री सकाळीच पु. लं.च्या घरी आले, आणि सुनीताबाई बाहेर निघून गेल्या. दुपारचा एक, दीड, दोन वाजले तरी सुनीताबाईंचा पत्ता नाही. मग भोजन न करताच मंत्री मनातल्या मनात चिडत घरी गेले. 2 – 3 दिवसांनी देशपांडे दाम्पत्याला मंत्री रस्त्यात भेटले. पु. लं.नी दिलगिरीच्या स्वरात मंत्रींना भोजन न करता का जावे लागले, ते सांगितलं.

ते रेशनचे दिवस होते. घरात धान्याचा एक कण नव्हता. त्या दिवशी रेशनवर धान्य येणार असल्याचं कळल्यामुळे सुनीताबाई रेशनच्या दुकानात रांकेत उभे राहण्यासाठी गेल्या. दिवसभर त्या तेथे थांबल्या; पण त्या दिवशी धान्य आलंच नाही.

काळ्या बाजारात त्या धान्य घेऊ शकल्या असत्या. पण हे पती पत्नी राष्ट्र सेवा दलाचे सैनिक असल्यामुळे आणि जयप्रकाश नारायण यांचे कट्टर अनुयायी असल्यामुळे काळ्या बाजारात धान्य घ्यायचं नाही, अशी शपथ त्यांनी घेतलेली होती.

त्यामुळे तो दिवस या पती पत्नींनी उपवास करूनच पाळला !

जाता जाता ….

तत्कालीन अखिल भारतीय जनसंघाचे अध्यक्ष पं. दीनदयाळ गुप्ता हे अविवाहित होते, आणि पक्ष कार्यासाठी सतत भारत भ्रमण करत असत. एकदा त्यांच्या एका गावातील चाहत्यांनी त्यावेळी नुकताच प्रचारात आलेला ट्रान्झिस्तर त्यांना भेट दिला; आणि सांगितलं की करमणुकीसाठी नाही वापरला तरी ते त्यावर दिवसभर बातम्या ऐकू शकतात.

त्या वेळेस भारतात रेडीओ आणि ट्रान्झिस्तर वापरण्यासाठी पोस्टात जाऊन आवश्यक ते शुल्क भरून परवाना घ्यावा लागत असे. त्याचं जानेवारी महिन्यात नूतनीकरण करावं लागत असे.

सुमारे वर्षभरानं पंडितजी त्या गावी पुन्हा गेले. चाहत्यांनी त्यांना ट्रान्झिस्तर कसा चालला आहे, असं विचारलं. तर पंडितजी म्हणाले की त्यांनी तीन चार महिने तो वापरलाच नाही. चाहत्यांनी तो का वापरला नाही, असं विचारल्यावर पंडितजी म्हणाले की, त्याच्या परवान्याचं जानेवारीत नूतनीकरण करावं लागतं. यंदा ते राहून गेलं. आता नूतनीकरण झालं नसताना मी तो ट्रान्झिस्तर कसा वापरू शकतो ? सर्व चाहते अवाक !

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments