स्मरणशक्तीचे चमत्कार !
स्वातंत्र्य पूर्व काळातील के॰ पी॰ एस॰ मेनन हे I.C.S. ( ‘ Indian Civil Service ‘ ) ही सनदी परीक्षा उत्तीर्ण झालेले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परदेशात राजदूत आणि तत्सम अधिकारी नेमण्याची गरज भासू लागली. तो पर्यंत आपल्याकडे यासाठी परीक्षा घेऊन माणसं निवडली जात नव्हती. म्हणून काही I.C.S. व्यक्तींना I.F.S. ( Indian Foreign Service ) केडर निर्माण करून त्यात सामावून घेतलं. त्यांत के. पी. एस. मेनन हे सुरवातीचे एक नामवंत. ते रशियात भारताचे राजदूतही होते॰ अत्यंत बुद्धिमान आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला अशा सनदी अधिकार्यांपैकी ते एक होते॰
ही मोठी माणसे मोठी का असतात, त्याची आणखी एक या के॰ पी॰ एस॰ मेननच्या संदर्भातील गोष्ट लिहितो॰
माझ्या पहिल्या नोकरीतील (अलिकडेच नव्वदीत निधन पावलेले ) वि॰ ना॰ करंदीकर उर्फ बाबूराव म्हणून वरिष्ठ होते॰ यांच्या पत्नी श्यामलाताई या नाटककार गिरीजाबाई केळकर ( साहित्य सम्राट न॰ चिं॰ केळकरांची वहिनी; आणि ‘ वाङ्मय शोभा ‘ चे संपादक म॰ म॰ केळकर यांच्या मातोश्री॰ ) यांची नात॰ त्यामुळे या दोघांना साहित्यिक गोष्टी आणि अन्य संबंध यांची मनापासून आवड॰ या उभयतांना भेटणे ही बौद्धिक मेजवानीच असे॰
हे बाबूराव करंदीकर 1958 साली कंपनीने पाठवले म्हणून हंगेरीमध्ये बुडापेस्टला काचेतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी गेले होते॰ तेथे एक दिवस ते एका हॉटेलमध्ये बसले असता त्यांना काऊंटरपाशी एक भारतीय स्त्री आलेली दिसली॰ म्हणून ते तिला भेटले; आणि भारतीय म्हणून बोलू लागले॰
तिने त्यांना सांगितले की त्यांचा नवरा के. पी. एस. मेनन हा रस्त्यावर कारमध्ये बसला आहे॰ मग बाबूराव मेननना भेटले॰ 5 – 10 मिनिटे गप्पा झाल्या॰
या नंतर या दोघांची बर्याच वर्षांत गाठभेट झाली नाही॰
नंतर नऊ वर्षांनी बाबूराव दिल्लीला काही कामाला गेले असतांना एका प्रदर्शनाला गेले होते॰ तिथे त्यांना हे मेनन आलेले दिसले॰ ते ओळखणार नाही याची यांना खात्रीच होती; पण त्यांनी विचार केला भेटून तर बघू या॰ म्हणून ते मेननना भेटले, आणि म्हणाले की आपली मागे एकदा भेट झाली होती; पण आपण मला ओळखले नसेल॰ तर मेनन म्हणाले की मला आपले नाव आठवत नाही; पण आपण हंगेरीत बुडापेस्टमध्ये भेटलो होतो; आणि आपण तेथे काच तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी आला होता॰
बाबूराव थक्क !
याच बाबूराव करंदीकरांना असेच परदेशी सरदार पाणिक्कर भेटले होते॰ हे स्वातंत्र्य काळातले बुद्धिमान मल्याळी पुढारी; आणि नंतर, 1950 च्या दशकात, राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य होते॰ हे ही काही वर्षांनी परत भेटल्यावर त्यांना म्हणाले, की मला तुझे नाव आठवत नाही; पण तू महाराष्ट्रीय चित्पावन ब्राह्मण आहेस !
बाबूराव परत थक्क झाले !
अब्राहम लिंकनच्या स्मरणशक्तीबद्दल एक गोष्ट सांगतात.
याची स्मरणशक्ती अफाट होती; आणि हा एकदा भेटलेल्या माणसाला विसरत नसे॰ तो अध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर एक दीड वर्षांनी याला एक माणूस भेटायला आला॰ हा माणूस लिंकनला फक्त निवडणुकीच्या काळात एकदा भेटला होता॰ लिंकन त्याला ओळखेल की नाही, याची त्याला शंकाच होती॰
तो आत गेल्यावर लिंकनने त्याला नावाने हाक मारली आणि विचारले की तो कुठल्या कामासाठी आला आहे॰ हा माणूस चकितच झाला॰ त्याने विचारले मी तुम्हाला आठवतोय ? त्यावर लिंकन म्हणाला अरे, असे काय करतोस; मी तुला प्रचाराच्या काळात भेटायला आलो होतो, आणि तू मला तुझे मत का द्यावेस, हे मी तुला पटवून देत होतो. आपण चर्चा करत होतो तेव्हा तू तुझा रेझर दगडावर घासत होतास॰
त्यावर तो माणूस म्हणाला तेव्हापासून तो दगड मला मिळत नाही॰ मी तो कुठे ठेवला हेच मला आठवत नाही॰ लिंकनने त्याला सांगितले की रेझर घासून झाल्यावर तू तो दगड दारावरच्या खोबणीत ठेवलास॰
हा माणूस घरी जाऊन बघतो तो काय; तो दगड तेथेच होता !
खुद्द आ. अत्र्यांनी नोंदवलेली ही गोष्ट दंतकथा असण्याची शक्यता नाकारता येत नाही !
आ॰ अत्र्यांचीही स्मरणशक्ती अफाट होती॰ ते 1916 / 17 सालांत पुण्याच्या फर्गंसन महाविद्यालयामध्ये शिकत असतांना त्यांच्याबरोबर एक कृ॰ रा॰ परांजपे म्हणून विद्यार्थी शिकायला होते॰ ते नंतर बेळगावला स्थायिक झाले॰ हे सर्वार्थाने सामान्य होते॰
अत्र्यांच्या अखेरच्या आजारात हे परांजपे मुंबईला आले असताना सुप्रसिद्ध लेखक आणि संशोधक स॰ गं॰ मालशेंना भेटले॰ मालश्यांची आणि अत्र्यांची ओळख आहे म्हटल्यावर त्यांना अत्र्यांना भेटण्याची इच्छा झाली॰ मधल्या 51 वर्षांत या परांजपे आणि अत्रे यांची भेट, पत्र व्यवहार असे काहीही नव्हते॰
‘ या कृ .रा. परांजपे यांना भेटायला घेऊन येऊ का ‘, म्हणून मालश्यांनी अत्र्यांना फोनवर विचारले॰ तर शरपंजरी असलेले अत्रे म्हणाले की त्यांना विचारा की ते कॉलेजमध्ये फ्लूट वाजवत असत का?
गोष्ट खरी होती !
‘ सोबत ‘कार ग. वा. बेहेरे यांनी तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मरणशक्तीची अशीच एक गोष्ट नोंदवली आहे.
1970 च्या दशकात, गोळवलकर गुरुजी एकदा बेहेरे यांच्याकडे आले होते. त्या वेळेस मुंबई आय. आय. टी. त शिकणारा बेहेरे यांचा एक तरुण विद्यार्थी नातेवाईक त्यांच्याकडे आला होता. संघाची विचारसरणी इतिहासात रमणारी असली तरी बुद्धिमान गोळवलकर गुरुजी हे आधुनिक शास्त्र, तंत्रज्ञान यांच्याबद्दल आस्था बाळगणारे होते. त्यांनी त्या तरुणाशी या बाबतीत गप्पा मारून ‘ आय. आय. टी. ‘ बद्दल माहिती घेतली. ते प्रभावित झाले आणि ही संस्था पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तो तरुणही गुरुजींच्या बुद्धिमत्तेनं आश्चर्यचकित झाला.
त्या प्रमाणे गुरुजींच्या नंतरच्या मुंबईच्या दौऱ्यात तशी व्यवस्था करण्यात आली.
बेहेऱ्यांच्या या नातेवाईक मुलानं त्याच्या 15 – 20 मित्रांशी गुरुजींच्या वार्तालापाचं आयोजन केलं.
भारताच्या वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या प्रत्येकानं आपली ओळख करून देताना आपलं नाव आणि राज्य सांगितलं. त्यानं आपलं गावाचं नाव – कितीही छोटं असलं तरी – सांगावं या साठी गुरुजी आग्रही राहिले.
त्या पैकी काही जण अगदी छोट्या छोट्या गावातून आलेले होते. पण त्या वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या प्रत्येकानं आपल्या गावाचं नाव सांगताच, गुरुजी त्या गावातील संघाच्या दोन कार्यकर्त्यांची नावं सांगत, आणि विचारत की हे कार्यकर्ते त्यांना ठाऊक होते का ?
गुरुजींनी सांगितलेली सर्व नावे बरोबर होती !
जाता जाता …
शिवशंकर मेनन I.F.S. हे भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून काही वर्षांपूर्वी निवृत्त झाले॰ हे परराष्ट्र सेवेतील ( Foreign Service ) कौतुक करावे असे अधिकारी होते. हे के. पी. एस. मेनन यांचे चिरंजीव. शिवशंकर मेनन हे परराष्ट्र सेवेत वाढलेल्या I.C.S. – सनदी अधिकारी – राम साठे यांचे जावई॰
गम्मत …
बाबुरावांच्या पत्नी श्यामलाताई या न. चिं. केळकरांची नात, याचा वर उल्लेख आलाच आहे.
बाबुराव करंदीकर यांना काही वर्षांपूर्वी भेटायला गेलो असताना भोजन करण्याचा योग आला. त्यांच्या पत्नी श्यामलाताईंनी मसाले भात बनवला होता; आणि त्यावर ओल्या नारळाचं खवलेलं खोबरं पसरलं होतं.
न. चिं. केळकर यांनी, आल्प्स पर्वतावर 1932 साली हिंडताना, सगळीकडे पसरलेला बर्फाचा चुरा पाहून वांगी भातावरच्या ओल्या नारळाच्या खोबऱ्याची आठवण येते, असं लिहून ठेवलं आहे; त्याची मला आठवण झाली.
साहित्य सम्राटांची ही आठवण श्यामलाताईंना सांगताना मला वेगळीच मजा आली !

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800