स्मरणशक्ती : आणखी थोडे…..
सार्वजनिक क्षेत्रांत वावरणाऱ्या आणि अनेकानेक लोकांशी सतत संपर्क येणाऱ्या तलाठी, मामलेदार, जिल्हाधिकारी अशा लोकांना त्यांची स्मरणशक्ती सतत जागृत ठेवावी लागते. यांना शेकडो नावे लक्षात ठेवायला लागतात.
1969 च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील (आता निवृत्त) लीना मेहेंदळे या एक कर्तबगार प्रशासकीय अधिकारी होत्या. त्यांनी 1998 च्या ‘ मौज ‘ च्या दिवाळी अंकात ‘ माझी प्रान्तगिरी ‘ म्हणून एक सुंदर, माहितीपूर्ण लेख लिहिला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत शिरणाऱ्याची अगदी पहिली नेमणूक ‘ प्रांत अधिकारी ‘ (साहाय्यक जिल्हाधिकारी) ही असते. लीना मेहेंदळे यांची पुणे जिल्ह्यात ‘ प्रांत अधिकारी ‘ म्हणून नेमणूक झाली.
त्यांच्या सुरवातीच्या काळात तत्कालिन जिल्हाधिकारी रंगनाथन (हे नंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव झाले.) हे त्यांच्या प्रगतीचा आढावा नियमितपणे घेत असत. एकदा अशा आढाव्यात रंगनाथान यांनी मेहेंदळे यांना विचारले की, तुला भेटायला येणाऱ्या लोकांचे तू नाव की काम, काय लक्षात ठेवतेस.
त्यांचे मी काम लक्षात ठेवते, मेहेंदळे यांनी उत्तर दिलं.
त्यावर रंगनाथ म्हणाले की, नाही. काम नाही लक्षात ठेवायचं; नाव लक्षात ठेवायचं. ती व्यक्ती पुन्हा भेटायला आल्यवर त्याला नावानं हाक मारल्यास त्याला आपल्याबद्दल जास्त आपुलकी वाटते. त्याला ओळख दाखवली की, मग काम थोडं उशिरा झालं; नाही झालं तरी तो रागावत नाही.
लीना मेहेंदळे यांना हा नवीनच धडा होता !
मग ही नावं कशी लक्षात ठेवायची, याच्या काही युक्त्या रंगनाथन यांनी मेहेंदळे यांना शिकवल्या.
मग लीना मेहेंदळे तसं करू लागल्या, आणि त्याचा त्यांना खूपच फायदा झाला; असं त्यांनी त्या लेखात लिहिलं आहे.
मोठ्या व्यक्तीनं ओळख दाखवल्यावर सर्वसामान्य माणसं कशी हरखून जातात, आणि कामाचं विसरतात; याची नमुनेदार आठवण ज्येष्ठ पत्रकार गंगाधर इंदूरकर यांनी त्यांच्या ‘ दिल्ली दिनांक ‘ या दिल्लीच्या अनुभवांवर लिहिलेल्या पुस्तकात दिली आहे.
इंदूरकर हे ‘ महाराष्ट्र टाईम्स ‘ या ‘ टाईम्स ‘ ग्रुपच्या दैनिकाचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी होते. त्यांना दर काही महिन्यांनी मुंबईला यावं लागायचं. मग मुंबईला आले की, ते विविध राजकारणी लोकांना भेटत असत.
असंच एकदा ते त्यांच्या कोल्हापूर भागातील लोकनेते बाळासाहेब देसाई या मंत्र्यांना भेटायला त्यांच्या मलबार हिलवरील ‘ मेघदूत ‘ बंगल्यात गेले. तेथे देसायांना भेटायला आलेल्यांची रीघ लागली होती.
बाळासाहेब देसाईंनी इंदूरकरांची दखल घेऊन तेथेच बसायला सांगितलं.
इतक्यात एक खेडूत उठला आणि म्हणाला की, साहेब, तुम्ही मला ओळखलं नसेल. असं म्हणून त्यानं त्याचं नाव सांगितलं, आणि विचारलं की, माझ्या कामाचं काय झालं ?
मुरलेले बाळासाहेब म्हणाले, गड्या, मी तुला ओळखले. कालच मी आमच्या पी. एं.ना तुझ्या कामाबद्दल आठवण करून दिली होती. असं म्हणून त्यांनी त्यांच्या पी. ए. ला हाक मारली, आणि विचारलं की, यांच्या कामाबद्दल मी काल तुम्हाला सांगितलं होतं, त्याचं काय झालं ?
तो बाळासाहेबांचाच
पी. ए. !
तो म्हणाला की, मी कालच कोल्हापूरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना यांच्या कामाबद्दल आठवण करून दिली आहे. राव, तुम्ही निवांतपणे गावी जा. तुमचं काम झालेलं असेल !
असं म्हणून त्याला चहा पाजून त्याची बोळवण केली !
तेथे बसलेले इंदूरकर हे सर्व पाहून अधिकाधिक थक्क होत गेले !
जरा वेळानं सर्व दरबार समाप्त झाला.
इंदूरकर आणि बाळासाहेब असे दोघेच उरल्यावर अचंबित झालेल्या इंदूरकरांनी बाळासाहेबांना इतक्या लोकांची नावं आणि कामं लक्षात ठेवल्याबद्दल अभिनंदन केलं !
बाळासाहेब हसले, आणि म्हणाले की, खरं म्हणजे मी या पैकी कोणालाच ओळखलं नाही. पण मी तसं सांगितलं तर मला मत देऊन, काम होत नाही म्हणून हक्कानं माझ्याकडे येणाऱ्या या माझ्या मतदारांचा हिरमोड झाला असता, त्याला अपमानही वाटला असता. म्हणून मी त्याला ओळखलं असं सांगितलं.
त्यावर इंदूरकर म्हणाले की, तुमच्या पी. ए. नी, त्यांना याच्या कामाबद्दल काहीही माहिती नसताना, त्याला खात्रीपूर्वक कसं सांगितलं की, त्याचं काम झालेलं असेल.
आणि समजा, ते काम झालेलं नसेल, तर ?
त्यावर बाळासाहेब म्हणाले, हे पहा इंदूरकर, 95% कामे त्यांच्या पद्धतीनं वेळेत होतंच असतात. एखादा नवा मुद्दा निघाला तर काम अडून राहते. कालांतरानं तो मुद्दा सुटला की ते काम होतंच.
इंदूरकर पुन्हा थक्क झाले !
बाळासाहेब पुढे म्हणाले की, समजा, इतकं करूनही काम झालेलं नसेल, तर तो खेडूत जिल्हाधिकाऱ्याला शिव्या घालेल. तो म्हणेल की, खुद्द मंत्र्यांनी सांगूनही काम होत नाही, म्हणजे हा कलेक्टरच आहे !
इंदूरकर बाळासाहेब आणि त्यांच्या पी. ए. ला दंडवत घालूनच ‘ मेघदूत ‘ बंगल्याबाहेर पडले !
ही गोष्ट 1960 च्या दशकातील.
यातील बाळासाहेबांनी म्हटलेलं ‘ 95 % कामे त्यांच्या पद्धतीनं वेळेत होतंच असतात ‘ हे वाक्य महत्त्वाचं. त्या काळात हे कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी खरंच, जनतेची कामं मन लावून करत असत.
याच बाळासाहेबांची सन्मित्र रविप्रकाश कुलकर्णी जी गोष्ट सांगतो, ती ही ऐकण्यासारखी आहे !
बाळासाहेब देसाई त्यांच्या मंत्रिपदाच्या ऐन भरात असताना जेव्हा जेव्हा त्यांच्या मतदार संघात प्रवास करत, तेव्हा तेव्हा जर एखाद्या ठिकाणी लग्न समारम्भ चालू असला तर ते सरळ त्या लग्न मंडपात जात. वधू वरांना आशीर्वाद देत. छोटासा आहेर करत.
नंतर यांच्यापैकी त्यांना कोणी ‘ त्यांच्या लग्नाला ते अचानकपणे आले होते ते आठवतं का, असं विचारलं तर ते बिनदिक्कतपणे हो म्हणत असत !
यामुळे ती अनोळखी माणसं किती सुखावतात, याचा बाळासाहेबांना अचूक अंदाज असे !
पण कितीतरी लोकप्रिय लेखक, संपादक यांना ही नावं लक्षात ठेवणं जमतंच असं नाही.
मी 1993 पासून डॉ. अविनाश चांदे आणि शशी मेहतामुळे साहित्यिक वर्तुळात वावरू लागलो. डॉ. वि. ना.श्रीखंडे, माधव गडकरी, रवींद्र पिंगे, शंकर / सरोजिनी वैद्य, अरुण दाते, श्रीनिवास पंडित, डॉ. नरेंद्र जाधव, व. पु. काळे यांच्यासारख्या विविध क्षेत्रांतील अमोज नामवंतांशी माझ्या ओळखी झाल्या; आम्ही अधूनमधून भेटू लागलो.
माझी ओळख डॉ. चांदे यांचा भाऊ, शशी मेहताचा मित्र आणि एक वाचक अशीच होत असे. त्या वेळेपर्यंत माझा एकही लेख प्रसिद्ध झाला नव्हता; ना मी कलावंत होतो.
त्यामुळे काही दिवसांनी पुन्हा यांपैकी कोणाला भेटल्यावर मी जरी ओळख दाखवली, तरी त्यांनी मला ओळखलं नसावं अशी मला क्वचित शंका येत असे. मात्र, आम्ही तुला ओळखलं नाही, असं कोणीच सांगत नसे.
मग ती व्यक्ती ‘ राउंड अबाउट ‘ गप्पा मारत असे. यावर मी लवकरच एक तोडगा शोधून काढला.
त्या व्यक्तीला भेटल्यावर मी, आपणहूनच, मला ओळखलं ना ? मी, डोम्बिवलीचा प्रकाश चांदे. डॉ. चांदे, शशी मेहतामुळे आपली नुकतीच ओळख झाली होती; असं सांगत असे.
मग त्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावर सुटकेचा नि:श्वास दिसे !
एकदा ओळख पटल्यावर मग छान गप्पा होत.
या मान्यवर व्यक्तींच्यांत सुप्रसिद्ध वास्तुरचनाकार आणि कमानशास्त्रातील जाणकार आणि लेखक फिरोझ रानडे यांच्याशी माझा विशेष स्नेह जमला. ते मला म्हणायचे की, ही तुझी पद्धत मला आवडते. प्रत्येक व्यक्तीचे नाव लक्षात ठेवणे कठीण असते. चेहेरा ओळखीचा असतो. बरं, त्याला मी ओळखलं नाही, असं सांगता येत नाही. ओळख पटेपर्यंत धड गप्पाही मारता येत नाहीत. शिवाय, आपल्या चेहेऱ्यावरचा ‘ मी याला ओळखलं नाही ‘, हा भाव काही लपत नाही !
जाता जाता ….
1993 साली संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस दादरच्या डॉ. खांडेपारकरांच्या लोणावळ्यातील ‘ गुलमोहर ‘ बंगल्यावर दोन दिवस अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला गेला. त्यावेळेस ‘ लोकसत्ता ‘ चे संपादक माधवराव गडकरी यांच्याशी माझ्या भरपूर गप्पा झाल्या.
त्यांचा शालक आर. वाय. गुप्ते, त्यांचे तेरेदेसाई हे शालेय शिक्षक, ज्येष्ठ मित्र नी. गो. पंडितराव, ‘ निर्धार ‘, दिल्लीतील नोकरी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, द्वा. भ. कर्णिकांशी असलेला स्नेह, ‘ म. टा. ‘, ‘ गोमंतक ‘, बोरकर अशा अनेकानेक आठवणी जागवल्या.
तसे माधवराव गडकरी खूप मोठे होते; आणि ते त्या मानानं वारंवार भेटत नसत. त्यामुळे ते ही भेटले की, माझी ओळख करून देऊनच बोलावयास सुरवात करत असे.
माधवरावांनी, फिरोझ रानडे यांच्यासारखं मोकळेपणानं कधी कबूल केलं नाही; पण त्यांनाही माझी ही पद्धत आवडत असे !

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800