“नाच ग घुमा“
1994 च्या मार्चमध्ये मी बेळगावला गेलो होतो. माझ्या मुक्कामात मी, तेथे रहात असलेल्या, ‘ नाच ग घुमा ‘ च्या लेखिका माधवी देसाई यांना भेटलो॰ मी हे आत्मकथन वाचले होते॰ पण माझ्या मते माधवींनी रणजित देसाई यांच्यापासून घटस्फोट का घेतला ? ते पुस्तकात नीट स्पष्ट झाले नव्हते॰ ते विचारण्यासाठी मी त्यांना त्या मुक्कामात भेटलो॰
आमची ती पहिलीच भेट असूनही त्यांनी मोकळेपणाने मला सर्व सांगितले॰ मग मी त्यांना विचारले की हे आत्मकथन त्यांना का लिहावेसे वाटले ? त्यावर त्या म्हणाल्या की, मी मोकळीच होते॰ मुलींची लग्ने झाली होती॰ घरात एकटीच॰ मग करणार काय ? शिवाय, दुसरं लग्न करून घटस्फोट घ्यावा लागलेला ! त्याचा मोठा धक्का बसलेला ! मग ठरवले आपल्या काही आठवणी लिहून काढू या, म्हणून॰ कारण लहानपणापासून माहेरी आणि दोन्ही सासरी भरपूर गोष्टी घडलेल्या॰ अनेक मोठमोठी माणसे भेटलेली॰ त्यामुळे आठवणींना तोटा नव्हता॰
मग केली सुरुवात॰
सुरवातीला सलगपणे लिहीत नव्हते॰ जसे आठवेल तसे लिहीत गेले॰ लिहिलेले वाचल्यावर स्वत:ला आणि मुलींना ते आवडू लागले॰ मग मात्र आठवणी सलगपणे लिहायचे ठरवले॰
त्या सकाळी लवकर उठून लेखन करत असत॰ त्या म्हणाल्या, की एकदा लेखन नियमितपणे करू लागल्यावर त्यांचा दिवस छान जाऊ लागला॰ कारण दिवसभर मनात तेच घोळत राहायचे॰ कुठला मजकूर / आठवण घ्यायची; कुठला टाळायचा; कशा तर्हेने लिहायचा; त्याचे अचूक तपशील, क्वचित संदर्भ; या आणि अशा गोष्टींत मन रमले की खूप शांत वाटायचे॰ शिवाय, त्या सर्व घटनांकडे आता तटस्थपणे बघितल्यावर वेगळ्याच गोष्टी जाणवू लागल्या॰ या सर्व गोष्टींत दिवस कसा जायचा ते कळत नसे॰
मला ते सर्व आवडत गेले॰ मी त्यांत गुंतत गेले॰ घटस्फोटाच्या धक्क्यातून सावरायला मला या लेखनाचा उपयोग झाला॰
या पुस्तकाच्या भराभर खपलेल्या पहिल्या काही आवृत्ती ‘ चंद्रकला प्रकाशन ‘, पुणे यांनी प्रकाशित केल्या होत्या. त्याच वेळेस माधवींनी त्यांच्या प्रकाशिका शशिकला उपाध्ये ( ‘चंद्रकला प्रकाशन ‘, पुणे ) यांच्याशी कसे मतभेद झाले; आणि प्रकाशनाचे हक्क त्यांच्याकडून काढून ‘ इंद्रायणी प्रकाशन ‘ ला का दिले, हे सांगितले॰
21 वर्षांनी, 2015 साली माझी शशिकला उपाध्ये यांच्याशी ओळख झाली॰ त्यावेळेस ‘ नाच ग घुमा ‘ चा विषय निघालाच; त्यांनी त्यांची बाजू सांगितली॰ या पुस्तकाच्या सुमारे 15 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत॰ मात्र, हे पुस्तक स्त्री वर अन्याय झाला म्हणून तिला न्याय देण्यासाठी, प्रथम ‘ ग्रंथाली ‘ ने प्रकाशित करण्याचे ठरवले होते॰ पण पुस्तकातील काही मजकुरावरून त्यांचे मतभेद झाले; मग बाईंनीच ते पुस्तक दुसरीकडून प्रकाशित करून घेण्याचे ठरवले; असे ‘ ग्रंथाली ‘च्या उषा मेहताने मला सांगितल्याचे मला आठवते॰
माधवी या भालजी पेंढारकरांच्या तीन पत्नींपैकी एकीची कन्या॰ त्यांच्या आईचे नाव मिस लीला चन्द्र्गिरी॰ त्या चित्रपटाच्या नायिका होत्या॰ भालजींशी त्यांनी लग्न करण्याअगोदर माधवींचा जन्म झालेला आहे॰ भालजींनी लीलाबरोबर माधवीचा स्वीकार तर केलाच; पण तिला आपले नाव आणि आडनावही दिले॰
या ‘ नाच ग घुमा ‘ वर नामवंत टीकाकार प्रा॰ म॰ वा॰ धोंड यांनी त्यांच्या ‘ जाळ्यातील चंद्र ‘ या गाजलेल्या पुस्तकात लिहिताना भालजींची दुसरी चांगल्या, सज्जन आणि सहृदयी माणसाची प्रतिमा अधोरेखित केली आहे॰ ती भालजींची प्रतिमा भन्नाट आहे ! प्रथम पत्नी असतांना भालजींनी दुसरा विवाह केवळ वासनेतून केला नसून मुले असणार्या एका असहाय स्त्रीला आसरा देण्यासाठी केला; हे प्रा॰ धोंडांनी फार उत्तम तर्हेने उलगडून दाखवले आहे॰
मात्र, या लेखाबद्दल माधवींनी तिसऱ्या आवृत्तीच्या मनोगतात नापसंती व्यक्त केली आहे !
15 ऑगस्ट 1974 रोजी मी भालजींना कोल्हापूरमध्ये त्यांच्या ‘ जयप्रभा स्टुडिओ ‘ मध्ये भेटलो होतो॰ मला चित्रपटसृष्टीची बर्यापैकी माहिती आहे हे कळल्यावर त्यांनी माझ्याशी सुमारे दोन तास आपुलकीने गप्पा मारल्या; त्यांच्या तिन्ही पत्नींचे एकाला एक असे लागून असणारे बंगले दाखवले; आणि स्टुडिओतून गावात जाणे वाहनाभावी गैरसोयीचे असल्यामुळे मला हॉटेलवर जाण्यासाठी वाहनही देऊ केले !
या माधवी देसाईंचे पहिले लग्न मूळचा गोव्याच्या बांदोड येथल्या सधन कुटुंबातील नरेंद्र काटकर यांच्याशी झाले॰ या नरेंद्रच्या आत्याबाईंनी मुंबईच्या ‘ ग्रँड हॉटेल ‘ च्या मालकाशी म्हणजे शापूरजी पालनजी या अत्यंत धनवान माणसाशी लग्न केले॰ त्यांना मूलबाळ झाले नाही॰ त्यांनी आपला भाचा दत्तक घेतला॰ हा भाचा पुढे व्ही॰ शांताराम यांचा जावई झाला; आणि तो ‘ग्रँड हॉटेल ‘ चा मालकही झाला. त्याचं नाव सोली.
या नरेंद्र काटकरांची गोव्यात खूप संपत्ती होती॰ यांची मोठी वहिनी, सुलोचना काटकर या गोवा काँग्रेसच्या कित्येक वर्षे अध्यक्षा होत्या॰ मी बेळगावहून गोव्याला जाणार आहे असे कळल्यावर आमची नुकतीच ओळख झालेली असूनही, मी माझ्या बहिणीबरोबर बांदोडला काटकरांकडे उतरावे; असा मनापासून आग्रह माधवी करू लागल्या॰ इतकेच नव्हे, तर त्या मुक्कामात आमच्या दिमतीला गाडी आणि ड्रायवरही देऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या॰ मात्र, आमची गोव्यात रहाण्याची सोय अगोदरच झाली होती॰ माधवी म्हणाल्या त्यांना ‘ नाच ग घुमा ‘ वर 3 बॅगा भरतील एव्हढी पत्रे आली आहेत॰ त्यांनी मला नंतर केव्हाही गोव्याला येण्याचे आणि ती पत्रे वाचण्याचे निमंत्रण दिले !
नंतर एक दोनदा मी गोव्याला कंपनीच्या कामानिमित्त गेलो होतो; पण या काटकर कुटुंबीयांना मात्र मला भेटता आलं नाही.
काही वर्षांपूर्वी साहित्यप्रेमी घनिष्ट मित्र दंपती अशोक आणि स्मिता तळेकर हे गोव्याला गेले असताना ते माधवी देसाईंना भेटले होते. तेव्हा त्यांनी ती पत्रं नष्ट केल्याचं सांगितलं !
मी हळहळलो !
जाता जाता ….
जेव्हा माधवी आपल्या पहिल्या पतीबरोबर कल्याणजवळच्या मोहोने येथे ‘ NRC ’ ( ‘ National Rayon Corporation ‘ ) च्या कॉलनीत रहात होत्या, तेव्हा, समवयस्क असलेली आणि कोल्हापूरपासून मैत्री असलेली लता मंगेशकर त्यांच्याकडे दोन दिवस राहून गेल्याचा उल्लेख आला आहे. मात्र, लताने ती तेथे आल्या आहेत हे कोणाला म्हणजे कोणाला कळवायचे नाही, अशी अटच घातली होती॰ लता त्या दोन दिवसांत अजिबात म्हणजे अजिबात घराच्या बाहेरही पडली नाही॰
त्या मुळे ती तेथे येऊन दोन दिवस राहून गेली हे कोणालाही कळले नाही !
मात्र जेव्हा हे लोकांना कळले असेल तेव्हा आसपासचे लोक किती हळहळले असतील ना ?
1952 – 53 साली महाडला ‘ भारतरत्न ‘ महर्षी धों॰ के॰ कर्वे हे त्यांच्या ‘ फर्गसन ‘ मधल्या सहकारी प्राध्यापक गो॰ चि॰ भाटे यांच्या डॉ. वि. गो. भाटे या मुलाकडे आले होते॰ या गो. चि. भाट्यांनी 1913 साली एका मराठा विधवा स्त्रीशी पुनर्विवाह केला होता॰ हा महाराष्ट्रातला ब्राह्मणातला पहिला पुनर्विवाह॰ हे भाटे सांगलीच्या ‘ विलिंगडन महाविद्यालया ‘ चे पहिले प्राचार्य॰
महर्षी कर्वे शांत॰ कोणाच्यांत आपणहून न मिसळणारे॰ ( ‘ मी मुखदुर्बळ आहे ‘ असे त्यांनी स्वत:च आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे ! ) शिवाय, ते त्यावेळेस 94 वर्षांचे झाले होते॰ पण प्रकृती ठणठणीत होती॰ त्या वयातही ते रोजचा 5 मैल चालण्याचा नियम पाळत असत॰
भाट्यांचा मुलगा चवदार तळ्यावर राहत होता॰ त्यांना 5 मैल पूर्ण करण्यासाठी 10 – 12 फेर्या माराव्या लागत॰ त्या ते मोजून मारत॰ ते 2 – 3 दिवस होते; पण त्यांना महाडमध्ये कोणीही ओळखले नाही ! ते पुण्याला गेल्यावर मग कळले॰
नंतर मात्र समस्त महाडकर खूपच हळहळले !
गम्मत….
नरेंद्र काटकर यांच्या निधनानंतर माधवींना काही वर्षांनी ‘ स्वामी ‘ कार रणजीत देसाई यांनी दुसऱ्या लग्नाचा देकार दिला. त्यांना काहीच निर्णय घेता येईना. त्यांनी अनेक नातेवाईक आणि नामवंतांचे सल्ले घेतले.
त्यांतल्या प्रख्यात विचारवंत प्रा. नरहर कुरुंदकर यांनी ‘ रणजीत हा दररोज सायंकाळी ‘ रमजित ‘ होतो ‘, हे लक्षात घेऊन निर्णय घेण्यास सुचवलं !
प्रा. कुरुन्दकरांचे मित्र हैदराबादस्थित मुख्याध्यापक कालिदास मोहोळकरांनी ही गोष्ट मला सांगितली.
महर्षी धों. के. कर्वे यांचा हा रोजचा 5 मैल चालण्याचा नियम कसा आला ?
ते रोज हिंगण्याला संस्थेचे पैसे वाचावे म्हणून, घरून चालत जात॰ त्यामुळे त्यांना दररोज 5 मैल चालण्याची सवय लागली॰ परदेशी बोटीने जाताना 21 दिवस हा नियम मोडायला नको म्हणून त्यांनी बोटीच्या डेकची लांबी मोजली, आणि 5 मैलांत किती फेर्या होतात, याचे गणित केले – ते गणिताचेच प्राध्यापक होते ! – आणि आपला चालण्याचा नियम मोडू नये म्हणून तितक्या फेर्या ते त्या डेकवर मारत असत !

— लेखन : प्रकाश चान्दे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800